जर्मनीची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे म्युनिकचे आठव्या शतकातले पहिले रहिवासी ख्रिश्चन धर्मगुरू होते.  हेन्री द लायन या राजाने येथे बाराव्या शतकात मोनेस्टरी स्थापन केल्यावर त्यावरून इथल्या वसतीचं नाव ‘मुन्शेन’ झालं. मुन्शेनचे पुढे म्युनिक.. म्युनिक सध्या बव्हेरिया प्रांताची राजधानी आहे. ११८० साली या प्रदेशात विटेल्शबाख घराण्याची सत्ता स्थापन झाली ती पुढे सात शतके, १९१८ पर्यंत टिकली. या घराण्याचा राजा मॅक्समिलीयन याने सतराव्या शतकात म्युनिकला चोख प्रशासन देऊन शहराचा विस्तार आणि विकास केला. लुई प्रथम या राजाने शहराचे व्यवस्थित नियोजन करून म्युनिकला वैभव प्राप्त करून दिले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्युनिकची संपूर्ण वस्ती रोमन कॅथलिक पंथीय होती. तिथे पुढे इतर युरोपियन देशातल्या प्रोटेस्टंट पंथीयांनी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर केले. १८५४ साली म्युनिकची लोकसंख्या एक लाख झाली. प्रोटेस्टंट स्थलांतरामुळे १९०० साली ती वाढून पाच लाखांवर पोहोचली. लुई द्वितीयला कला, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष अभिरुची असल्याने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस म्युनिक हे जर्मनीचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. म्युनिकचा संगीतकार रिचर्ड वॅगनर याचे संगीत संपूर्ण युरोपात लोकप्रिय झाल्यामुळे म्युनिकला युरोपची संगीत नगरी म्हटले जाऊ लागले. लुई तृतीय हा विटेल्शबाख घराण्याचा शेवटचा राजा. त्याची कारकीर्द १९१८ साली संपली आणि पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. या युद्धानंतर म्युनिक हेच जर्मनीतल्या राजकीय हालचालीचे प्रमुख केंद्र बनले. याच काळात अ‍ॅडॉल्फ हिटलरने म्युनिकमध्येच नाझी या राजकीय पक्षात प्रवेश केला. दुसऱ्या महायुद्ध काळात दोस्त राष्ट्रांची सरशी व्हायला लागल्यावर म्युनिक शहर हेच त्यांच्या बॉम्बफेकीचे प्रमुख लक्ष्य ठरले. त्यामुळे शहरातल्या ४० टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

रताळे

उपवास म्हटले की आपल्याला शेंगदाणे, बटाटा, रताळे यांसारख्या जमिनीखाली वाढणाऱ्या अन्नपदार्थाची आणि कंदाची आठवण येते. रताळे हा मुळांच्या टोकाचा रूपांतरित झालेला लंबाकृती, तांबूस आकाराचा पिष्टमय कंद आहे. पानांनी तयार केलेल्या शर्करायुक्त अन्नाची साठवण नेहमी फळ आणि बियांमध्ये होते, जेव्हा ही सुविधा वनस्पतींना उपलब्ध होत नाही अथवा अपुरी पडते तेव्हा तेथे सोयीनुसार पर्यायी मार्गाचा वापर केला जातो. रताळे त्याचे उकृष्ट  उदाहरण आहे. वेलवर्गामधील ही विदेशी वनस्पती आयपोमिया बाटाटाज (Ipomoea batatas) या शास्त्रीय नावाने ओळखली जाते.

बटाटा आणि रताळे या दोघांचाही उद्देश अन्नसाठवण हा असला तरी त्यांची वनस्पती कुळे भिन्न आहेत. रताळी तांबूस, पिवळसर, पांढरी या रंगाची आणि आकाराची पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये पिष्टमय पदार्थाबरोबरच तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ भरपूर असते. बटाटय़ापेक्षा रताळे पचायला हलके म्हणून लहान मुले, आजारी, अशक्त, रुग्णांना पोषक आहार म्हणून देतात. शिजवलेल्या कंदापेक्षा भाजलेल्या रताळ्यात पोषणमूल्ये जास्त टिकून राहते. या वनस्पतीस फुले येतात पण त्यामध्ये सक्षम बीजधारणा होत नाही. रताळ्याचे शाकीय पद्धतीने पुनरुत्पादन करताना रताळ्याच्या वेलाच्या परिपक्व फांद्यांचे १५ सेंटिमीटर लांबीचे तुकडे करतात, हे तुकडे जमिनीत लावतात त्यानंतर पूर्ण वाढ झालेली निरोगी रताळी भरपूर आद्र्रता असणाऱ्या जागेत ओलसर गोणपाटावर पसरून ठेवतात. काही दिवसांनी या कंदावर ठरावीक ठिकाणी लांब, तंतुमय आगंतुक मुळे फुटलेली आढळतात. त्यांना स्पीप्स असे म्हणतात. या भागास खालच्या कंदासह चाकूने वेगळे केले जाते आणि त्याचा लागवडीसाठी वापर केला जातो. चार महिन्यांत रताळी येण्यास सुरुवात होते. पाने पिवळी होऊ लागली की काढणीस तयार होते. रताळे कमी पावसात, भरपूर सूर्यप्रकाशात हवेशीर जमिनीत चांगले उत्पन्न देते. पश्चिम महाराष्ट्रात ही वनस्पती अनेक शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे उत्पन्न देत आहे.

रताळ्यातील एक जात सोनेरी पानांची असते. मोठय़ा प्रमाणात पसरणारी वनस्पती म्हणून बागेत मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आणि बागेचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाते.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

Story img Loader