मानसिक तणावामुळे शरीरात होणारे दोन बदल आपण जाणीवपूर्वक परतवू (‘रिव्हर्स’ करू) शकतो; त्यांना शिथिलीकरण तंत्रे म्हणतात. दीर्घ श्वसन आणि स्नायू शिथिलीकरण ही ती तंत्रे आहेत. शवासन करताना स्नायू शिथिलीकरण केले जाते. ‘शरीराच्या युद्धस्थिती’त स्नायूंवरील ताण वाढतो, वेगाने पळण्यासाठी किंवा लढण्यासाठी तो आवश्यक असतो. पण मनातील सततच्या विचारांमुळे हा ताण अधिक वेळ राहू लागला की सततचा थकवा, अंगदुखी, पाठदुखी असे अनेक त्रास होऊ लागतात. अशा वेळी स्नायू शिथिलीकरण तंत्र उपचार म्हणून उपयुक्त ठरते.
आधुनिक काळात डॉ. एडमंड जाकॉब्सन यांनी हे तंत्र प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन या नावाने वापरायला १९०९ मध्ये सुरुवात केली आणि या अनुभवावर आधारित याच नावाचे पुस्तक १९२९ मध्ये प्रसिद्ध केले. या तंत्रात रुग्णाला उताणे झोपवून डोक्यापासून सुरुवात करून एकेका अवयवातील स्नायू ताणायचे आणि सल सोडायचे हे शिकवले जाते. शरीरातील सर्व स्नायू शिथिल झाल्याने तणाव कमी होतो. जाकॉब्सन यांनी बायोफीडबॅक हे तंत्रदेखील विकसित केले. त्यामध्ये स्नायूंवरील ताण कमी झाला आहे की नाही हे यंत्राच्या साह्याने पाहता येते आणि स्नायू शिथिल होईपर्यंत त्या स्नायूंच्या गटावर लक्ष देता येते. झोपताना असे स्नायू शिथिलीकरण केले तर निद्रानाशाचा त्रास कमी होतो. स्नायू आखडल्यामुळे होणाऱ्या वेदना, जुनाट कंबरदुखी आणि सततच्या तणावामुळे येणारा थकवा स्नायू शिथिलीकरणामुळे कमी होतो. खेळाडूही या तंत्राचा उपयोग करून शारीरिक, मानसिक तणाव कमी करतात. या तंत्राचा उपयोग केला तर प्रसूती अधिक सुलभतेने होते.
स्नायू शिथिलीकरण करण्यासाठी आडवे झोपणेच आवश्यक आहे असे नाही. खुर्चीत बसल्या बसल्या आपण पायाचे स्नायू ताणून शिथिल करू शकतो. लंडनमधील बसमध्ये सीटच्या मागे ‘रिलॅक्स युअर लेग मसल्स’ अशी सूचना लिहिलेली असते. आपण एका जागी बराच वेळ बसलो तर स्नायूंवर ताण येतो; तो कमी करण्यासाठी अधूनमधून स्नायू ताणून सल सोडायला हवेत. कुत्रा, मांजर पाठीची कमान करून हेच करते. आपण माणसेही आळोखेपिळोखे देऊन आळस देतो त्या वेळी हेच करीत असतो. आपण चेहऱ्यावरील स्नायूंवरदेखील सतत अकारण ताण घेऊन वावरत असतो. आपले लक्ष वर्तमान क्षणात आणून हा ताण कमी करायला हवा. आळस देण्याचा आळस न करता अधूनमधून स्नायू शिथिल करायला हवेत. सजगता असेल तर हे शक्य होते.
डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com