– डॉ. अजित वर्तक
खनिजविज्ञानाला भूविज्ञानाची एक शाखा म्हणून मान्यता मिळण्यास सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरुवात झाली. त्यामुळे नवीन खनिज मिळाले की त्या खनिजाला समर्पक नाव सुचवणे बंधनकारक झाले. खनिजांचे गुणधर्म अथवा रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोझिशन) वा ते खनिज कुठे सापडले, अशा काही बाबींवरून खनिजाला नाव देण्याचा प्रघात पडला. त्यातच एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ त्या व्यक्तीच्या नावावरून खनिजांना नावे दिली जाऊ लागली.
व्यक्तीच्या नावावरून खनिजाला पहिल्याप्रथम नाव दिले गेले ते १७८८ मध्ये. दक्षिण आफ्रिकेत केप ऑफ गुड होप इथे डचांची वसाहत होती. डचांनी तिथे काही फौजफाटाही ठेवला होता. त्या फौजफाट्याचे प्रमुख होते कर्नल हेंड्रिक फॉन प्रेहन. त्यांना तिथे एक हिरव्या रंगाचे, चमकदार खनिज आढळले. ते खनिज कोणते आहे, याचा त्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते खनिज कोणालाही माहिती नसल्याने त्याचे वर्णन प्रेहन यांना कुठे आढळले नाही.
शेवटी पुढे आठ वर्षांनी ते खनिज नवे आहे असा निर्वाळा जर्मन भूवैज्ञानिक अब्राहम वेर्नर यांनी दिला आणि ज्यांना ते खनिज आढळले त्या कर्नल प्रेहन यांच्या सन्मानार्थ त्या खनिजाला त्यांनी नाव दिले ‘प्रेहनाइट’. या खनिजाच्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या नमुन्यांना रत्न मानले गेले आहे. प्रेहनाइट हे खनिज महाराष्ट्रातही सापडते.
त्यानंतर व्यक्तीचे नाव खनिजाला देण्याची ही प्रथा इतकी लोकप्रिय झाली, की सध्या माहीत असलेल्या खनिजांपैकी निम्या खनिजांची नावे कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या सन्मानार्थ दिलेली आहेत. या प्रथेला अनुसरून एका रंग बदलणाऱ्या रत्नाला एका युवराजाचे नाव कसे दिले गेले त्याची माहितीही विशेष आहे.
फिनलंडमध्ये निल्स गुस्टाफ नॉर्डेनस्किओल्ड नावाचे खनिजवैज्ञानिक होऊन गेले. शेजारच्याच रशियामधल्या उरल पर्वतात त्यांना एक हिरव्या रंगाचे रत्न सापडले. ते पाचू असावे, असे त्यांना वाटले. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की, ते रत्न पाचूसारखे हिरवे आहे; पण पाचू नाही.
त्यांना मिळालेल्या रत्नाचे वैशिष्ट्य असे की, ते दिवसाच्या सूर्यप्रकाशात मोहक हिरवे, तर रात्रीच्या प्रकाशात तपकिरी लाल किंवा जांभळट लाल दिसते. त्या रत्नाविषयी ते शोधनिबंध तयार करत होते, त्या सुमारास रशियाचे युवराज द्वितीय अॅलेक्झांडर यांचा सोळावा वाढदिवस होता. युवराजांच्या सन्मानार्थ त्यांनी त्या नव्या रत्नखनिजाला ‘अॅलेक्झांड्राइट’ असे नाव दिले.