पृथ्वीमधे तिच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत झालेल्या भूवैज्ञानिक परिवर्तनांविषयी सखोल संशोधन करण्यासाठी, आणि त्यातून मिळालेल्या माहितीचे संकलन करण्यासाठी केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम इथे १९७८ साली ‘पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्र’ (सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज) ही संस्था स्थापन झाली. ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ (जिऑलॉंजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाच्या महानिदेशक पदावरून निवृत्त झालेले ख्यातनाम भूवैज्ञानिक डॉ. चेरुवारी करुणाकरन यांच्या प्रेरणेतून ही संस्था निर्माण झाली.

संस्थेच्या वाढत जाणाऱ्या कार्याची कक्षा लक्षात घेऊन १ जानेवारी २०१४ रोजी ही संस्था भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि संस्थेचे नामांतर होऊन तिचे नाव ‘राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्र’ असे करण्यात आले. जमीन, समुद्र आणि वातावरण यांच्यामधील नैसर्गिक समन्वय, आणि त्या समन्वयात मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यांच्याविषयीही ही संस्था संशोधन करते. हे संशोधन वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, आणि मानवी जीवनासाठी उपयुक्तही आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या खडकांचे शिलावरण, पाण्याचे जलावरण, सर्व सजीवांचे मिळून बनणारे जीवावरण आणि हवेचे वातावरण या चार प्रमुख; आणि इतर काही आवरणांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणाऱ्या प्रणालीला पृथ्वीप्रणाली म्हणतात. या प्रणालीचा उपयोग मानवाला कसा होतो याचे अध्ययन करणारी ही भारतातली अग्रगण्य संस्था आहे.

अंटार्क्टिका खंडाच्या पूर्व भागातल्या पाषाणांची निर्मिती आणि संरचना, तिथले वैशिष्ट्यपूर्ण वातावरण आणि विशेषत: तिथल्या हिम व सागर यांच्यातला परस्परसंबंध यांचा अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये या संस्थेने तिथे ‘भारती’ हे स्थानक उभारले आहे. ते अंटार्क्टिकाच्या पूर्व किनाऱ्यावरच्या लार्सेमान टेकड्यांच्या प्रदेशात असून त्या स्थानकावर एका अद्यायावत प्रयोगशाळेचीही स्थापना केली आहे. त्यायोगे या संस्थेने आपला ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि त्याचप्रमाणे भूगर्भातील खडकांच्या संरचनेत जिथे बदल होत आहेत, तिथले पुरासागरविज्ञान (पॅलिओओशनोग्राफी) आणि पुराहवामानविज्ञान (पॅलिओक्लायमेटॉलॉजी) यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या केंद्राने २०२१-२२ या वर्षात, एक अरबी समुद्रात आणि दुसरी बंगालच्या उपसागरात, अशा दोन वैज्ञानिक समुद्रसफरी हाती घेतल्या होत्या.

भूवैज्ञानिकांनी पृथ्वीचा इतिहास ज्या विविध कालखंडांमधे विभागला आहे त्यापैकी कॅम्ब्रियन नावाचा कालखंड ५४ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला, तेव्हापासून ते आजतागायत सह्याद्री पर्वतराजीत जे खडक निर्माण झाले, त्याचा तपशीलवार अभ्यास करून इथे कसकसे बदल होत गेले ते शोधण्याचा प्रकल्प या संस्थेने हाती घेतला आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader