अनघा शिराळकर
फार मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला की प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते. जनजीवन विस्कळीत होते ते वेगळेच. यासाठी भूकंपविषयक सखोल संशोधन आणि तदनुषंगिक तंत्रज्ञानाचा विकास करणे अत्यावश्यक असते. म्हणूनच ऑगस्ट २०१४ मध्ये ‘भारतीय हवामान विज्ञान विभागा’तील ‘भूकंपशास्त्र कक्ष’ (साइस्मॉलॉजी युनिट, इंडियन मेटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट), आणि केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे ‘भूकंप धोका मूल्यांकन केंद्र’ (अर्थक्वेक हजार्ड असेसमेंट सेंटर) यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (नॅशनल सेंटर फॉर साइस्मॉलॉजी) स्थापन करण्यात आले. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत हे केंद्र येते. हे केंद्र देशात घडणाऱ्या भूकंपांच्या नोंदी ठेवून, त्यासंबंधीची समग्र माहिती संकलित करून त्याविषयी संशोधन करणारी अधिकृत संस्था आहे.

१८९७ मध्ये शिलाँग इथे झालेल्या भूकंपानंतर भारतातली पहिली भूकंप वैज्ञानिक वेधशाळा १ डिसेंबर १८९८ रोजी अलिपूर या कोलकाताच्या उपनगरात स्थापन करण्यात आली. हळूहळू भूकंप वैज्ञानिक वेधशाळांची संख्या वाढत गेली. आजमितीस देशात १५५ अद्यायावत भूकंप वैज्ञानिक वेधशाळा कार्यरत आहेत. १९६० च्या दशकात जागतिक स्तरावरील मानकांप्रमाणे भूकंपमापन स्थानकांचे महाजाल निर्माण करण्यात आले. त्याला देशातील सर्व भूकंप वैज्ञानिक वेधशाळा जोडलेल्या आहेत. भारतातील आणि शेजारच्या देशांतील भूकंप आणि त्सुनामी यांची माहिती ‘राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रा’ला या महाजालामार्फत २४ तास मिळत असते. हे केंद्र देशातील सर्व भूकंपमापन वेधशाळांशी सतत समन्वय ठेवत असते. तसेच देशातील भूकंपांच्या धोक्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे अधिकृत अहवालही संबंधित संस्थांना पुरवते. या केंद्राने भूकंपप्रवण क्षेत्रांची संपूर्ण माहिती देणारे नकाशे तयार केले आहेत. या नकाशांचा उपयोग भूकंपामुळे होणारी हानी कमी करण्यासाठीच्या नियोजनामध्ये होतो.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या पुढाकाराने भूकंपांमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी भारतीय मानक संस्था (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स), भवन निर्माण सामग्री व प्रौद्याोगिकी संवर्धन परिषद (बिल्डिंग मटीरियल्स अँड टेक्नॉलॉजी प्रमोशन काउन्सिल) आणि गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळ (हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांनी संयुक्तरीत्या भूकंपरोधक इमारतींच्या आराखड्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली तयार केली आहे.

या केंद्राने भूकंपांचे ठिकाण, वेळ आणि तीव्रता ताबडतोब समजण्यासाठी ‘इंडियाक्वेक’ नावाचे एक अॅप तयार करून ते जनतेसाठी उपलब्ध करून दिले आहे. तसेच भूकंपप्रवण भागातील भूकंपाचे पूर्वानुमान देणारी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचा महत्त्वाचा प्रकल्पही या केंद्राने हाती घेतला आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader