मनमोराचा पिसारा.. डार्विनच्या मनाचं कोडं
चार्ल्स डार्विनची ओळख शाळेतल्या विज्ञानाच्या पाठय़पुस्तकात झाली. मग मनोविज्ञानाच्या महापुस्तकातून त्याच्या शोधनिबंधाबद्दल चर्चा वाचली. डार्विनविषयी गूढ कुतूहल मनात रेंगाळत राहिलं. ‘जिगसॉ’ कोडय़ाचे तुकडे जमा करून हळूहळू चित्राला आकार येतो तसं झालं.
विशेष म्हणजे डार्विनला काही काळ पछाडलेल्या आजाराचं स्वरूप किंवा मूळ मानसिक तर नव्हतं ना? असा प्रश्न सोडवावासा वाटला. अशा थोर संशोधक वैज्ञानिकाच्या चरित्राचा अभ्यास केला की, मानसशास्त्राविषयी विलक्षण ओढ वाटते. आपण कॉन्शस मनाच्या पातळीवर घेतलेले निर्णय कितपत जाणूनबुजून घेतो की, आपले अत्यंत महत्त्वाचे निर्णय तर्कावर घासून न घेता केवळ मन:स्फूर्तीच्या जोरावर घेतो? असे अनेक प्रश्न डार्विनने उपस्थित केले. उदा. ‘ओरिजिन ऑफ स्पिशीज्’ हे या पुस्तकाचे हस्तलिखित डार्विनने तब्बल १५ वर्षे प्रकाशित न करता कडीकुलुपात बंद ठेवले. ज्या पुस्तकाने अवघ्या जीवनाची गणितं सोडविली, प्राणी-वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाला संपूर्ण कलाटणी दिली. धर्मशास्त्रातल्या वचनांना आवाहन केलं. वैज्ञानिक संशोधनाला नवी दिशा, वेग आणि अर्थ दिला. प्रचंड उलथापालथ करणारा सिद्धांत मांडणारे पुस्तक डार्विनने लगेच का प्रसिद्ध केलं नाही? त्याच्या असंज्ञ मनानं त्याला ‘गप्प बस उगीच शानपट्टी करू नकोस!’ असे संदेश देऊन अळीमिळी गुपचळी करायला लावली का? १८३१-३५ पर्यंत बाविशीतल्या चक्रम कॅप्टन फिट्झरॉयबरोबर तो समुद्र सफरीला गेला! का तर म्हणे फिट्झरॉयला जेवताना गप्पा मारायला कोणी तरी दोस्त हवा होता! मग चार्ल्स का? तर म्हणे डार्विनचं नाक त्याला फार आवडलं? मुळात अशा कंपॅनिअनची गरज का पडली? कारण या जहाजावरच्या आधीच्या कप्तानाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. (पुढे फिट्झरॉयनेही तेच केलं!) डार्विनशी तो मनातलं हितगुज वगैरे फारसं बोलला नाही. कारण समुद्रसफर संपल्यावर फिट्झरॉयने आपल्या प्रेयसीशी लग्न केलं, त्याबद्दल डार्विनला तो चकार शब्द बोलला नव्हता. बोटीवरच्या ट्रंका आणि खोकी उतरवून त्यांचं वर्गीकरण करून डार्विनला त्याच्या नोंदवह्या मिळायला दोन र्वष लागली. मग १८४२ साली डार्विननं दोन र्वष खपून आपले निबंध लिहिले आणि त्यावर तो बसून राहिला. पुढच्या १५ वर्षांत त्यानं लग्न करून दहा मुलं पैदा केली आणि जहाजावर जमा होणाऱ्या शेवाळ, प्रवाळ, कॅल्शियम खडीवर अभ्यास करण्यात गुंग झाला. या प्रेरणा कुठून आल्या? मग त्याला विचित्र आजार जडले. चक्कर येणे, अर्धशिशी, प्रचंड थकवा, डोळ्यासमोर विचित्र ठिपके, धाप लागणे. यावर उपाय तितकेच अनाकलनीय. थंड पाण्यात बुडून राहणे. डोक्याला सूक्ष्म विजेचे धक्के, डार्विन कमालीचा एकटा एकटा राहू लागला. कानकोंडा झाला, घरकोंबडा झाला. ओरिजिन ऑफ स्पीशीज प्रसिद्ध करायला विसरला? घाबरला? टाळत होता? याचं उत्तर त्यांच्याच असंज्ञ मनाला ठाऊक. अचानक एका संशोधक मित्राचं पत्र आलं. त्यात डार्विननं मांडलेल्या संशोधनातला विषय होता. मग एकच घाई. पुस्तक प्रसिद्ध करण्याची इतकी की दहाव्या मुलाच्या दफनविधीनंतर त्यानं थेट त्याबद्दल पत्र लिहिली! डार्विननं जगाची कोडी सोडवली, पण त्याच्या मनाचं कोडं अजून सुटत नाहीये. मित्रा, मनाचा अभ्यास असा असतो.. विलक्षण, चक्रावणारा, चकित करणारा, हसवणारा, रडविणारा, पिसारा पुलविणारा!
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा