कधी विचार केला आहेस मित्रा, माणूस जगतो कशासाठी? का खटपट आणि खटाटोप करतो जगण्याचा? स्वत:ला जगविण्याचा? का खातो पितो? मौजमजा करतो? का जातो चंद्रावर? का चालतो अवकाशात? का शोधतो महासागराचे तळ? का जातो, आक्र्टिक किंवा अंटार्टिकवर? का धडपडतो झोपडीतून फ्लॅटमध्ये जायला? दोनाच्या चार बेडरूममध्ये? किती किती काय काय करतो? का करतो हे सगळं?  मेंदू पिंजून टाकणारे प्रश्न आहेत. मनाला चेतविणाऱ्या, सुन्न करणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं शोधावीशी वाटतात, दरवेळी, रोज प्रत्येक क्षणी मनाशी हा संवाद घडतो, तुझ्याशी बोलताना, गप्पा मारताना, कट्टय़ावर चकाटय़ा पिटताना, सदोदित हे प्रश्न मनाला छेडतात.
मित्रा, इतकी वर्षे इथे मांडलेले सगळे प्रश्न मला छळायचे, त्रास द्यायचे, घाबरवायचे. मित्र-मैत्रिणींना विचारले की ते म्हणायचे ‘कायको सोचता है इतना? सोचनेका नही ना!’  एकदा ठरवलं, की आपण जगतो का? आपलं जगणं म्हणजे काय? जगण्याची व्याख्या मरणानं सुरू होते आणि तिथेच का संपते? या प्रश्नांना आता घाबरायचं नाही. त्या प्रश्नांना सामोरं जायचं. त्या प्रश्नांना बगल न देता, अस्वस्थ करणाऱ्या विचारांना भिडायचं. मग लक्षात आलं की या प्रश्नांना उत्तरं नसतात, म्हणजे नसतात असं नाही, धार्मिक पुस्तकं आणि गाथांमधून उत्तरं लिहिलेली असतात. पण ती थोर लोकांना सुचलेली, त्यांना सापडलेली. ती उत्तरं मला नको आहेत. मला माझी  उत्तरं शोधायची आहेत. ‘मरण कल्पनेशी थांबे खेळ जाणत्यांचा’, हे कवी वचन झुगारून, ‘मरण कल्पनेशी सुरू होई खेळ जाणत्यांचा..’
तशी मरणं रोज पाहतो, दारोदारी, कोणाशी तरी बोलताना, प्रत्येक वेळी तो शब्द ऐकला की ठेच लागते. माझं, माझ्या प्रियजनांचं.. सगळ्यांचं मरण मला त्यांच्या बोलण्यात दिसतं नि जाणवतं. त्या माझ्या खासगी मानसिक जाणिवेशी मी भिडलो आणि मग लक्षात आलं की मरणाचा विचार करणारा मी जिवंत आहे, माझं मन जिवंत आहे, मला जाणवतंय ते मरण नाही, मृत्यूचं भय नाही, फक्त जगण्याची जाणीव. माझा श्वास, माझं धडधडणारं हृदय, हे माझं आहे, या जाणिवा, भावना अनुभवणारा ‘मी’ आहे. हेच माझं जीवन,  माझा जगण्याचा अनुभव.
मला हा अनुभव रोज येतो. माझं मी पण प्रत्येक क्षणी जागं असतं. प्रत्येक क्षण जिवंत असतो. त्या क्षणाक्षणाला जोडणारा मी असतो. त्यात सातत्य असतं. ही जाणीव झाली ना मित्रा, तेव्हा कळलं की हे जगणं अर्थपूर्ण आहे.
जगण्याची, अनुभव घेण्याची जाणीव मरण संकल्पनेच्या चौकटीत बांधलेली आहे. त्या चौकटीतला कॅनवास माझा आहे. तो कॅनवास म्हणजे माझं जीवन, माझं लाइफ त्या कॅनवासवर मी चित्र काढतो, माझं प्रत्येक चित्र व्यंगचित्र असतं. मी जगण्यातल्या दु:खाचं, असमानतेच्या वेदनेचं  व्यंगचित्र काढतो आणि मंद हसतो, वाघासारखा.
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा