जर आपल्याला रस्त्यावरील वाहतूक कमी करायची असेल आणि ती अधिकाधिक सुरक्षित करायची असेल तर जशा मुंबईत लोकल गाडयांसाठी मोनोरेल, मेट्रोरेल यांसारख्या सोयी उपलब्ध केल्या पाहिजेत, समुद्र उपलब्ध असल्याने समुद्रावरून वाहतूक कशी करता येईल हे पाहावे लागेल, कोकण रेल्वे रेल्वेने टँकर्स नेते तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या रसायनांची वाहतूक करणारे टँकर्स कसे कमी होतील हेही पाहील, यासाठी खरे म्हणजे १०० वर्षांपूर्वीच आसाममध्ये तेलक्षेत्रापासून तेल शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइपलाइनी टाकल्या जाऊ लागल्या. त्यानंतर भारतात जसजशी नवनवीन तेलक्षेत्रे सापडू लागली तसतसे पाइपलाइनींचे हे जाळे तेलक्षेत्रे ते तेल शुद्धीकरण केंद्रे असे वाढू लागले. पाइपलाइनींमुळे जशी रस्त्यावरची गर्दी कमी होते, प्रदूषण कमी होते तसेच या वाहनांमुळे होणारे अपघातही टळतात. हे अपघात एरवी दोन वाहनांचे अपघात होतात त्यापेक्षा अधिक धोकादायक असतात. दोन वाहनांच्या अपघातात दोन-तीन माणसे जखमी होतात. (तेही वाईटच) पण रसायनांच्या अपघातात रसायन रस्त्यावर सांडल्यामुळे स्फोट, आग, प्रदूषण इत्यादी गोष्टी घडून त्याचा उपद्रव अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. या सर्व गोष्टी पाइपलाइनींमुळे टळतात शिवाय पाइपलाइनींमुळे वाहतुकीचा जेवढा खर्च येतो त्याच्या ७५ पट खर्च रस्त्यावरून टँकरमार्फत त्यांची वाहतूक करण्यामुळे येतो.
जमिनीखालून जाणाऱ्या पाइपलाइनींमधून जाणारी रसायने पंप करावी लागतात, त्यामुळे त्या पाइपलाइनी कार्बनस्टीलच्या असतात. जमिनीतील ओलाव्यामुळे त्या गंजू नयेत म्हणून त्यावर गंजविरोधक इन्शुलेशनचा थर देतात आणि तरीही ते इन्शुलेशन कालांतराने खराब होऊन पाइपलाइनी फुटतात. त्यामुळे रसायनांचा नाश होतो व प्रदूषणही होते, शिवाय ही गळती शोधणे अवघड असते. त्यासाठी स्काडा नावाची यंत्रणा वापरतात. त्यामुळे संपूर्ण पाइपलाइनीचे चित्र नियंत्रण कक्षात दिसते व जागोजागी पाइपलाइनीत किती दाब आहे, कोठे शून्य दाब झाला ते समजल्याने गळतीची जागा समजून ताबडतोब दुरुस्ती करता येते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग,चुनाभ ट्टी , मुंबई २२
office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा..- विनोद, वेदना आणि दु:ख
मित्रा, समज की तुझ्या पायात, हाडात किंवा सांध्यामध्ये खूप वेदना होत होत्या म्हणून केलेल्या लहानमोठय़ा ऑपरेशननंतर तू हळूहळू रिकव्हर होतो आहेस. तुला टीव्ही सीरियल बघण्याची मुभा आणि सोय उपलब्ध आहे. हातात रिमोट घेऊन तू सर्फिग करता करता थांबतोस, उजव्या हाताचा अंगठा रिमोट कंट्रोलवरच्या बटणावर रेंगाळतो. तू टीव्ही पाहता पाहता हसू लागतोस. खुदूखुदू हसतोस. कार्यक्रम संपतो आणि पुन्हा शरीरात कळ येते. तू चॅनेल सर्फिग करून दुसरा विनोदी कार्यक्रम पाहतोस. फिसकारून हसतोस. कळ नाहीशी होते.
मी ही असाच अनुभव घेतोय. मलाही कार्यक्रम पाहता पाहता हसू येतं आणि वेदनेचा विसर पडतो. नवल म्हणजे आपण ज्या कार्यक्रमांना हसतो, ते अगदी भिन्न असतात. तू चकटफू बाई फू करतोस नाहीतर कॉमेडी एक्स्प्रेसचं तिकीट काढतोस. मी येस प्रायमिनिस्टर पाहतो. दोघांचे शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम तेच असतात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. असे अनेक किस्से आपण ऐकतो; परंतु याला काही शास्त्रीय अधिष्ठान आहे की हा केवळ अनुभवांती आलेला निष्कर्ष आहे? अमेरिकेतल्या जेम्स रोटोन या मानसशास्त्रज्ञाने हे सिद्ध करण्यासाठी एक मजेदार मानसिक प्रयोग रचला.
एका ऑर्थोपेडिक सेंटरमध्ये त्यानं रुग्णांच्या तीन वेगवेगळ्या बॅचेस केल्या. एका बॅचला त्यांच्या आवडीचा विनोदी कार्यक्रम टीव्हीवर (रेकॉर्डेड) बघण्याची परवानगी दिली. दुसऱ्या बॅचला साधारण माहितीपर कार्यक्रम पाहायला दिला आणि तिसऱ्या बॅचला इतरांना विनोदी वाटणारे कार्यक्रम पाहायला दिले. या मंडळींवर सर्वसाधारण एकाच प्रकारची शस्त्रक्रिया केलेली होती. वय आणि इतर गोष्टी परस्पर प्रमाणित होत्या. या रुग्णांकडे स्वत:हून टोचून घेता येतील अशा स्वरूपाची वेदनाहारक औषधे होती.
प्रयोगाअंती त्यांच्या लक्षात आलं की, आपापल्या पसंतीचा विनोदी कार्यक्रम बघणाऱ्या रुग्णांना साधारणपणे ६० टक्के कमी प्रमाणात वेदनाहारक औषधांचे डोस टोचून घ्यावे लागले आणि ज्यांच्यावर तथाकथित विनोदी कार्यक्रम लादलेले होते, त्यांना इतर दोन्ही बॅचपेक्षा जास्त प्रमाणात वेदनाहारक औषधं घ्यावी लागली! तात्पर्य, विनोद छान असतो, ब्रिंग्ज स्माइल, वेदना कमी होते, पण विनोद लादता येत नाही! लादलेला विनोद वेदनाकारक असतो. मित्रा, तू म्हणशील आम्हाला माहिती असलेली गोष्ट इतक्या ओळी खर्च करून का सांगितलीस? नाही, विनोदासाठी नाही. मानसशास्त्रातल्या प्रयोगांचं स्वरूप अनुभवांती आलेल्या नि अनुमानाचा पडताळा घेणं असं असतं. पुढे त्यात बारकावे शोधता येतात.
हे सांगण्याचं कारण काय? तर विनोदाने वेदना हलकी होते, शरीरात उमटणारी कळ शमते. मनाला विरंगुळा मिळतो. औषधं घ्यावी लागत नाहीत, पण विनोदाने दु:ख मिटत नाही. विनोदाने दु:खाच्या मुळापर्यंत जाता येत नाही. विनोदाने मन हलकं होतं, पण मुळात ते जड का झालं? ते तसं होऊ नये, याचं उत्तर मिळत नाही. दु:खाचा विचार करायचा तर त्यासाठी बुद्धप्रणीत तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला हवा. चार आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग अनुसरायला हवा. ते केलंस तर पिसारा आतून फुलेल कायमचा..
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
सफर काल-पर्वाची -शीख साम्राज्याचा विलय
अफगाणिस्तानात इ.स. १८१० मध्ये राज्यक्रांती होऊन झमानशहा दुराणी व त्याचा भाऊ शहाजुदा हे रणजितसिंगच्या आश्रयाला येऊन राहिले. त्यांना मदत केल्यामुळे शहाजुदाने रणजितसिंगला कोहिनूर हिरा भेट केला. नंतर पुढे १८१६ साली झमानशहा इंग्रजांच्या आश्रयास गेला. काश्मीरमध्ये त्यावेळी पठाण राजवट होती. पठाण राज्यकर्ते काश्मीरमधील हिंदू पंडितांना अत्यंत वाईट वागणूक देत असत. त्यांच्या छळाला कंटाळून बरेच पंडित काश्मीर सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये राहावयास गेले. जम्मू येथील तीन पंडितांनी मात्र या प्रश्नाच्या बाबतीत पुढाकार घेतला. ते तडक लाहोरला गेले व तिथल्या महाराजा रणजितसिंगला भेटून काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांबद्दल सर्व माहिती त्याला सांगितली. विशेष म्हणजे त्या तीन हिंदू पंडितांबरोबर दोन मुस्लीम व्यापारीही रणजितसिंगांकडे आले होते. त्या पाच लोकांनी रणजितसिंगांना याबाबतीत काहीतरी करण्याची विनंती केली.रणजितसिंगांनी त्यावर इ.स. १८१९ मध्ये तीस हजार सैन्य काश्मीरमध्ये घुसवून अफगाण सैन्याचा धुव्वा उडविला. १८३४ साली त्याने पेशावर प्रांत जिंकला. तो स्वत:ला राजा म्हणवून न घेता ‘शीख खालसा’ म्हणत असे. तो धार्मिक वृत्तीचा होता व त्याला मिळालेला प्रत्येक विजय तो गुरू गोविंदसिंगांना अर्पण करीत असे. मद्यपान व विषयासक्ती यामुळे विकलांग झालेला रणजितसिंग एका डोळ्याने अंध होता. अर्धागवायूने पुढे त्याची वाचाही गेली होती. १८३९ साली अनेक आजारांमुळे रणजितसिंगांचा मृत्यू झाला. रणजितसिंगांनंतर त्याचा मुलगा खरकसिंग शिखांचा राजा झाला. पण तो वेडसर होता. त्यामुळे त्याला हटवून त्याचा भाऊ दुलिपसिंग राजा झाला. पण तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची आईच कारभार पाहात होती व सर्व शिखांमध्ये आपसात लाथाळ्या चालू झाल्या. या गोष्टीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी १८४९ साली रणजितसिंगचे राज्य जिंकून ब्रिटिशांच्या साम्राज्यात समाविष्ट केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
इतिहासात आज दिनांक.. – १७ नोव्हेंबर
१८५९ इंग्लंडमधील समाजवादी सुधारक रॉबर्ट ओवेन यांचे निधन. कामगारांच्या स्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न त्यांनी केले.
१९२८ ‘पंजाब केसरी’ म्हणून ओळखले जाणारे लाला लजपतराय यांचे निधन. त्यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात जगराय गावी झाला. वडील राधाकृष्ण हे शिक्षक, उर्दू लेखक आणि स्वामी दयानंद सरस्वतींचे अनुयायी होते. वकिलीचे शिक्षण घेऊन लालाजींनी हिस्सार शहरात वकिली सुरू केली. आर्य समाजातर्फे त्यांनी विषमता निवारण कार्य सुरू केले. लाला हंसराज यांच्या सहकार्याने लाहोर शहरात ‘दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज’ आणि शाळा उघडल्या. याच काळात बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थान या भागात दुष्काळ पडला असता त्यांनी दुष्काळ निवारणार्थ कार्य केले. ‘वंदे मातरम्’ आणि ‘पंजाबी’ या पत्रांमधून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कठोर अग्रलेख लिहिले. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीचा निर्णय जाहीर होताच त्याच्या विरोधात लालाजींनी पंजाबमध्ये वातावरण पेटविले. इंग्रजांनी त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठविले. १८ महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली. पुढे ते इंग्लंड,जपान,अमेरिकेला गेले. इंडियन होमरूल लीगची स्थापना करून ‘यंग इंडिया’ पुस्तक लिहिले. ‘सायमन कमिशन’ ला विरोध करताना ब्रिटिशांच्या लाठीहल्ल्यात त्यांचं निधन झालं.
१९६३ पुण्याचा वीजपुरवठा नगरपालिकेकडे देण्याची मागणी सरकारने फेटाळल्याने पुण्यात कडकडीत हरताळ पाळण्यात आला.
प्रा. गणेश राऊत – ganeshraut@solaris.in