मनुष्याच्या शरीरात ७० टक्केपाणी आहे. पृथ्वीवर ७० टक्केपाणी आहे. किलगडासारख्या फळात ९० टक्केपाणी आहे. असे सगळीकडे पाणी आहे. पाणी हे उत्तम वाहक आहे. समुद्र आणि नद्या एका ठिकाणची माती दुसरीकडे वाहून नेतात ती पाण्यामुळे. जंगलातील कापलेली लाकडे इतर मार्गाने वाहून नेण्याऐवजी जमेल तेथे पाण्यामार्फत त्यांची वाहतूक करतात. वाईट गोष्ट असली तरी अनेक नगरपालिका आणि कारखाने आपापले सांडपाणी नद्यात सोडून एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवतात. एखादी गोष्ट साफ करायची म्हणजे आपण ती पाण्याने धुऊन घेतो. गोष्ट पाण्याने धुऊन घेणे आíथकदृष्टय़ा सर्वात स्वस्त असते. घरातील धुणी-भांडी आणि कपडे आपण पाण्याने धुतो. संडास-बाथरूममधील घाण काढून टाकण्यासाठी पाण्याचाच वापर करतात. दुधाच्या बाटल्यातील दूध काढून टाकल्यावर परत भरण्यापूर्वी त्या पाण्याने धुऊन घेतात. अशा प्रकारे जेथे जेथे स्वच्छतेची गरज पडते तेथे पाणी वापरले जाते. पाण्याचा हा गुणधर्म जसा स्वच्छतेसाठी वापरला जातो, तसा उष्णता शोषून घेण्याचा पाण्याचा गुणधर्म शामक म्हणूनही उपयोगी पडतो. आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. रासायनिक कारखान्यात पदार्थाला उष्णता देण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी थंड किंवा गरम पाण्याचा वापर केला जातो. म्हणजे पाणी हे उष्णतेचे वाहक आहे. ते उष्णता शोषून घेते तसे ते उष्णता अथवा थंडपणा देते, त्याचे वहन करते. औषध पातळ करायचे असेल तर जसे त्यात पाणी घालतात, तसेच अनेक पदार्थ पातळ करण्यासाठीही पाणी घालतात. पाण्याचा गुणधर्म जसा एखादी गोष्ट स्वच्छ करण्यासाठी होतो, त्याच गुणधर्मामुळे जे पाणी एखादी गोष्ट स्वच्छ करते ते खराब झालेले असते. ते माणसाच्या पिण्यासाठी अयोग्य झालेले असते. असे पाणी प्यायल्यामुळे माणसाला अनेक प्रकारची रोगराई होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणावर पडत असल्याने या दिवसात हा धोका मोठय़ा प्रमाणात संभवतो, म्हणून पिण्याचे पाणी अॅक्वागार्डमधून फिल्टर करून घेणे अथवा उकळून पिणे केव्हाही श्रेयस्कर.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा