मुंबईतील पाणी योजना सुरू होऊन १५० वष्रे झाली टुलोक नावाच्या ब्रिटिश अभियंत्याने घोडय़ावर बसून ठाणे जिल्ह्य़ाची पाहणी केली. त्या पाहणीत त्याने पाणीपुरवठा करण्यासाठी ज्या जागा हेरल्या आणि त्याचा नकाशा काढला, बरोबर त्याच जागी नंतर वैतरणा-भातसा जलयोजना झाल्या. सुरुवातीला मुंबईत जे तलाव बांधले ते म्हणजे, तुळशी, तान्सा, पवई हे होत. त्या तलावांपासून मुंबईपर्यंत पाइपलाइनी टाकल्या. त्याने मलबार हिल आणि इतर उंच ठिकाणी जलकुंभ तयार करून तेथे पाणी पोहोचविले व त्या जलकुंभातून नंतर पाणी घरोघरी पोहोचविले. पाणीपुरवठय़ाच्या मुख्य पाइपलाइनी त्या वेळी बिडाच्या (कास्ट आयर्न) होत्या. १९८१ सालच्या दसऱ्याच्या वेळी किंग्ज सर्कलला पाइपलाइन फुटली होती. तिच्या दुरुस्तीच्या वेळी असे लक्षात आले की, तेथील पाणीपुरवठा बंद करायची व्हाल्व्ह घाटकोपरला किरोल येथे होती. ही पाइपलाइन बिडाची होती व ती २५ मिलिमीटर जाडीची होती. बिडाच्या पाइपलाइनीची वेिल्डगने दुरुस्ती करणे हे फार कौशल्याचे काम असते.
गिरगाव हा मुंबईतील जुना भाग. येथे घरोघरी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनींशेजारून घरातील सांडपाणी बाहेर काढणाऱ्या पाइपलाइनीही टाकल्या आहेत. या पाइपलाइनीही आता १५०-१५० वर्षांच्या जुन्या झाल्या आहेत आणि मधूनमधून या लाइनी फुटतात. सांडपाण्याच्या पाइपलाइनीतून २४ तास पाणी वाहात असते. उलट पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीतून दिवसातून दोन ते तीन तासच पाणीपुरवठा होतो. एरवी २०-२१ तास या पाइपलाइनीत दाब नसतो. ही पाइपलाइनही जर फुटलेली असेल तर पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीत फुटक्या सांडपाण्याच्या पाइपलाइनीतून बाहेर पडलेले पाणी शिरते व पिण्याचे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून मग पिणे नेहमीच सुरक्षित ठरते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा