मुंबईला तानसा, वैतरणा, भातसा, तुळशी, विहार या तलावांतून पाणीपुरवठा होतो. पुण्याला पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणातून होतो. अशा प्रकारे जागोजागच्या धरणांतून किंवा तलावांतून त्या त्या गावांना पाण्याचा पुरवठा होतो. अशा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात किंवा तलावात साठणारे पाणी पावसाचे आणि फक्त पावसाचेच असते. पाण्याला पावसाशिवाय अन्य पर्याय नाही. धरणाचे पाणलोट क्षेत्र असो की तलाव, यात साठणारे पाणी त्याच्या क्षेत्रफळाच्या वर असणाऱ्या आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याद्वारेच फक्त जमा होते, असे नसून त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या भागातील जमीन एकदा पावसाच्या पाण्याने पूर्ण भिजली (संपृक्त झाली) की त्यानंतर पडणारे पावसाचे पाणी त्या जमिनीवर वाहू लागले. असे सर्व पाणीही अशा जलाशयात येत राहते. यात पाण्याबरोबर माती व अन्य कचराही वाहत वाहत येऊन तो जलाशयात जमा होतो. कालांतराने पाण्याबरोबर आलेले मातीचे कण जड असल्याने ते जलाशयाच्या तळाशी जमा होतात. अन्य कचऱ्यापैकी जेवढा भाग पाण्यापेक्षा जड असतो तोही तळाशी जमतो. मात्र हलका कचरा पाण्यावर तरंगत राहतो. ज्या शहरात पाणी शुद्धीकरण योजना असते त्या शहरात तलावातले पाणी शुद्धीकरण यंत्रणेत पाठविले जाते व तुरटी, क्लोरीन वगैरेच्या प्रक्रिया करून मग ते पाणी नळातून घरोघरी पाठविले जाते. शुद्ध केलेले पाणी दररोज तीनदा प्रयोगशाळेत तपासले जाते. मुंबई शहरात १९७८ साली जलशुद्धीकरण योजना भांडुपला सुरू झाली. पाण्याची एवढी काळजी घेतली तरी पावसाळ्याच्या सुरुवातीला गढूळ पाणी येते. शिवाय ज्या पाइपलाइनीतून पाणी घरापर्यंत येते त्यामुळेही पाणी खराब होण्याची शक्यता खूप असते. यामुळे पाणी जेव्हा आपापल्या घरी येते तेव्हाही ते अ‍ॅक्वागार्डमधून फिल्टर करून घेणे किंवा उकळून घेणे हितकारक असते आणि याच कारणासाठी आपण जेव्हा जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आपल्याबरोबर घरच्या पाण्याची बाटली बरोबर बाळगणे सुरक्षित असते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची- कोहिनूर हिरा
विजयनगरच्या साम्राज्याच्या परिसरात हिऱ्यांच्या अनेक खाणी व मोत्यांचे कारखाने होते. इथून हिरे व मोती सर्व देशांत निर्यात होत असत. त्या काळात म्हणजे चौदा व पंधराव्या शतकात विजयनगर इतका हिऱ्यांचा पुरवठा जगाला दुसरा कोणी केला नाही. हिऱ्यांच्या खाणींचा मक्ता व्यापाऱ्यास देत असत. पंचवीस कॅरेटहून अधिक कॅरेटचे सर्व हिरे राजास देण्याचा करार असे. कृष्णा नदीकाठी कर्नूल व अनंतपूर येथे हिऱ्यांच्या बऱ्याच खाणी होत्या. या सर्वाना गोवळकोंडय़ाच्या खाणी म्हणत. बऱ्याच लोकांच्या घरात हिरे असत. तालिकोट (राक्षसतांगडी) येथील युद्धात पाच सुलतानशाह्य़ा एकत्र येऊन त्यांनी विजयनगरचे राज्य पार नष्ट केले. युद्धानंतर आदिलशहाला कोंबडीच्या अंडय़ाएवढा हिरा विजयनगरच्या शाही खजिन्यांत मिळाला. रामरायाच्या खास घोडय़ाच्या डोक्यावर हिरे-मोत्यांचा तुरा होता. आदिलशहास सापडलेला हिरा त्या घोडय़ाच्या तुऱ्यातलाच होता.
कुष्णाकाठी कोलूरच्या हिऱ्यांच्या खाणीत सन सोळाशे छपन्नमध्ये मीर जुम्ला यांस कोहिनूर हिरा सापडला. त्या वेळी त्याचे वजन ७५६ कॅरेट्स होते. तो हिरा मीर जुम्लाने शाहजहान बादशहास नजर केला. तो पुढे १७३८ मध्ये दिल्लीहून नादीरशहाने इराणात नेला. नादिरशहाने त्या हिऱ्याला कोह-इ-नूर (तेजाचा पर्वत) असे नाव दिले. पुढे इराणातून तो हिरा अहमदशाह अब्दाली याने इ.स. १७५१ मध्ये काबूला नेला. इ. स. १८०८ मध्ये तो काबूलच्या शहाजुदाने लाहोरच्या महाराजा रणजितसिंगला दिला. रणजितसिंगचा मुलगा धुलिपसिंग याने १८४९ मध्ये ब्रिटिश सरकारचा पंजाबचा कारभारी सर जॉन लॉरेन्स यास दिला व त्याने तो व्हिक्टोरिया राणीला नजर केला. इतक्या प्रचंड घालमेलीत त्या हिऱ्याची अनेक वेळा काटछाट झाली. इंग्लंडमध्ये सन १८५२ मध्ये एका डच कारागिराकडून पुन्हा कापविला जाऊन राणीच्या मुकुटात बसविला गेला. सध्या हा मुकुट लंडनच्या टॉवर ऑफ लंडन या जुन्या राजवाडय़ात ठेवलेला आहे.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. -१३ नोव्हेंबर
१६८१ छत्रपती संभाजीमहाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंड करून महाराष्ट्रात आलेला त्याचा मुलगा अकबर याची भेट घेतली.
१७८० पंजाबचा सिंह महाराजा रणजितसिंह यांचा जन्म. अठराव्या शतकाच्या अखेरीस शीख फुलकिया, अहलुवालिया, भांगी, केन्हेया, रामगरिया, सिंधपुरिया, क्रोरा सिंधिया, निशानिया, सुकरचाकिया, डुब्लवाला नक्काईस, शहीद अशा बारा ‘मिस्ल’ मध्ये विभागले गेले होते. या गटांत विखुरलेल्यांना रणजितसिंग यांनी सर्व शिखांचे एकच राज्य उभारण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून एकत्र आणले. लष्करी बळ वाढवण्यासाठी त्यांनी वेषांतर करून इंग्रजांच्या लष्कराची पाहणी केली होती. कवायती फौजेचे महत्त्व ओळखून त्यांनी वेन्चुरा व अलार्ड या दोन फ्रेंच सेनापतींना शीख लष्कराला मार्गदर्शन करण्यासाठी नेमले. या लष्कराच्या बळावर पूर्ण पंजाब, उत्तरेकडील डोंगरी राज्ये एकत्र आणली. अफगाण आक्रमकांना पायबंद घातला. अफगाणांवर विजय मिळविणारे ते एकमेव भारतीय राजे. पेशावर, लाहोर, काश्मीर, लडाख, सिंध, कांगडा येथे त्यांचा अंमल होता.  कोहिनूर हिरा त्यांनी परत मिळविला होता. अशा या पराक्रमी राजाचे वारसदार अत्यंत कर्तृत्वशून्य निघाले. यशवंतराव होळकर, नेपाळ नरेश यांना ब्रिटिशांविरोधात रणजितसिंहांनी साथ दिली असती तर इतिहास कदाचित वेगळा झाला असता.
१८३१ स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचा एडिंबरो येथे जन्म. १८९० मध्ये केंब्रिज विद्यापीठातर्फे त्यांचे शास्त्रीय लेखन एकत्रितपणे प्रसिद्ध करण्यात आले.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

मनमोराचा पिसारा..- मनमोराची दिवाळी..
..आणि पुन्हा दिवाळी आलीय. मित्र आणि मैत्रिणींच्या नि माझ्या सर्व वाचकांच्या जीवनात ही दिवाळी खूप छान आनंद आणणार आहे. सगळेजण नव्या उमेदीनं नवी सुरुवात करणार आहेत. त्यामध्ये मी सहभागी होतोय. तुमच्यापर्यंत माझ्या शुभेच्छा पोहोचवण्यासाठी मला मनमोराचं सुंदर वाहन मिळालं आहे!
माझी ई-मेलची इनबॉक्स शुभेच्छापत्रांनी ओसंडून वाहते. आणि टेक्स्ट मेसेज मोबाइलमध्ये शिरण्यासाठी रांग लावतात. त्यामधून तुम्हा सर्वाची ‘गुडविल’ माझ्यापर्यंत पोहोचते. त्याबद्दल याच माध्यमातून तुम्हा सर्वाना धन्यवाद देतो.
मित्रा, खरं पाहता आपली दिवाळी रोजचीच रे! मनात तोच उत्साह, तीच आशा आणि त्याच सद्भावना सदैव असतात. एखादा नवा विचार, नवा भावनातरंग मनात नकळत शिरतो आणि अंधाऱ्या रात्री लक्कन् वीज चमकते तसं होतं. हे मन आनंदित होतं. खूप समाधान वाटतं. संतोष वाढतो. सुखी माणसाचा सदरा हवाय का? हा घ्या.. असं म्हणावंसं वाटतं.
हे क्षण मित्र-मैत्रीण, जोडीदार, परिवार यांच्याबरोबर, त्यांच्या समवेत अनुभवायला मिळाले तर सोने पे सुहागा.
दिवाळीच्या दिवसांत असे क्षण अनेकदा आपल्या आयुष्यात येतात. मुळात या सणाचं स्वरूप संपूर्ण घरगुती असतं. नरकचतुर्दशीची पहाटेची आंघोळ असो, पाडवा असो की भाऊबीज, सगळे एकत्र येतात आणि हे एकत्र येणं आपण साजरं करतो. फराळ, आकाशकंदील आणि रांगोळय़ा यांच्या सजावटीनं त्या एकत्रितपणाला शोभा येते.
साधुसंत येती घरा
तोचि दिवाळी दसरा..
असं म्हणतात. या ओळींबद्दल खूप र्वष प्रश्न पडला होता की संत फक्त तसबिरीत अडकलेले दिसतात आणि साधू सापडत नाहीत, मग अशी दिवाळी साजरी करायची कशी? दरवर्षी ‘साधुसंत’ हरवल्याची हुरहुर ऐन दिवाळीत लागायची. अचानक एक दिवस कोडं सुटलं. मित्रा, ‘साधुसंत’ ही कुणी बाहेरची माणसं नाहीत.  साधुसंत ही एक मानसिकता आहे. साऱ्यांची मनं अशी साधुसंतांसारखी – विरक्त तरी आनंदासक्त, वैरागी तरी अनुरंगी होऊन एकत्र येतात. तोच दसरा आणि तीच दिवाळी.
आनंदासक्त आणि अनुरंगी, सुखासीन आणि संतुष्ट अशी मनं एकत्र आली की मग कसलेही पारंपरिक विधी न करतासुद्धा आपण दिवाळी अनुभवतो.
मित्रा, तुझ्याशी मस्त संवाद होतो, थकल्याभागल्या, कंटाळलेल्या, उदासीन मनांवर फुंकर घालण्याचं काम मी करू शकतो, तीच माझी दिवाळी. तुझं नि माझं मन एकाच वेळी, एकत्र येतं, आनंदी, समाधानी होतं, तेव्हा तू आणि मी दिवाळीच साजरी करत असतो!
डॉ. राजेंद्र बर्वे   
drrajendrabarve@gmail.com

Story img Loader