मनमोराचा पिसारा..
भाषेची गम्मत जगण्यातली जम्मत
जगण्याबद्दल आणि जीवनाविषयी आसक्ती ऐवजी जिज्ञासा वाटू लागली ना मित्रा, की आयुष्य बदलून जातं. जगण्याविषयी उत्सुकता म्हणजे जगणाऱ्या माणसांविषयी कुतूहल. कोण कसा जगतो? त्यानं तसं जीवन का निवडलं याविषयी कोणताही अभिनिवेश न बाळगता विचार केला की आपला स्वत:विषयीचा दृष्टिकोन बदलतो. आपण अधिक सजगपणे जगतो, जगण्याचा ना कंटाळा येत, नाही त्यात मन गुंतूनही राहात.
जगण्यातल्या या गमतीजमती शोधण्याकरता भाषेचा अभ्यास करायला ही गंमत वाटते. भाषेतल्या म्हणी नि वाक्प्रचार यांच्याकडे विश्लेषक नजरेनं पाहिलं की त्या समाजाविषयी अधिक माहिती कळते. उदा. पूर्वी आपल्याकडे परीक्षा देणे याला मांडवाखालून जाणे असा वाक्प्रचार होता. परीक्षेचा नि मांडवाचा काय संबंध? लग्नाचे मांडव आपल्याला निदान ऐकून माहिती आहेत, पण परीक्षेचे? मित्रा, पूर्वी परीक्षेला बसण्यासाठी वर्गाची आणि बंद खोलीची सोय नव्हती, त्यामुळे मांडवात मॅट्रिकच्या परीक्षा घेतल्या जायच्या. त्यामुळे लग्नाच्या मांडवात शिरण्यापूर्वी परीक्षेच्या मांडवातून जावं लागायचं. त्यासाठी परीक्षेत पास व्हावं, अशीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मांडवाखालून ‘नॉन मॅट्रिक’चा शिक्का घेऊन बाहेर पडलात तरी पुरे. ‘तारांबळ’ उडणे असा शब्दप्रयोग ऐकला असशील, होय ना? हे तारांबळ आलं कुठून? लग्नात मंगलाष्टके म्हणताना तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं, ‘चंद्रबलं तदैव’ अशा शेवटच्या चरणापाशी आलं की एकच घाई उडत असे. त्या ताराबलंच तारांबळ आणि लग्नासाठी मुलीचं नशीब बलवत्तर म्हणजे उत्तम चंद्रबळ!
मराठीतल्या अशा गमतीजमती ऐकून ठाऊक असतात. इंग्रजीतल्या, ‘लॉजिंग बोर्डिग’विषयी खूप कुतूहल होतं. लॉजिंग म्हणजे राहण्याची सोय नि बोर्डिग म्हणजे जेवणाची सोय. नि बोर्डिग स्कूल म्हणजे राहून, जेवून, खाऊन शिक्षणाची सोय करणाऱ्या शाळा. त्यांचा शिस्तीशी नंतर संबंध आला. परगावातल्या लॉजवर राहाणाऱ्यांना बोर्डर म्हणायचे. हे ठीकाय, पण कंपनीमधल्या स्वच्छ
व्यवहाराला अबव्ह बोर्ड का म्हणायचं? पैसे ‘खाण्या’शी संबंध नाही म्हणून?
एके दिवशी कोडं उलगडलं. ‘मध्ययुगातल्या लोकांच्या जेवणाच्या सवयी’ यावर वाचता वाचता बोर्डाचा संबंध लक्षात आला. पूर्वी आताच्या सारखी डायनिंग टेबलं नव्हती. म्हणजे आडव्या फळकुटाला चतुष्पादांसारखे चार पाय लावले तर स्थिर राहाणारी वस्तू तार करता येते. त्या आडव्या पृष्ठभागावर डिश ठेवून जेवता येतं हा शोध माणसाने लावलेला नव्हता. (कमाल आहे ना?) त्यामुळे जेवणारी माणसं फळकुटं मांडीवर अथवा गुडघ्यावर घेत, त्या फळकुटाना ‘बोर्ड’ म्हणत असत. त्यामुळे जेवायचं तर फळकुटं हवीत. जेवणारा माणूस आपापल्या फळकुटांची सोय लावी. पुढे जेवणं म्हणजे ‘बोर्डा’चा वापर आणि नंतर जेवण  म्हणजे ‘बोर्डिग’ असा शब्दप्रयोग तयार झाला. त्यात काही लबाड माणसं अन्न आपल्या फळकुटाखाली लपवायचे. त्यामुळे जेवताना आपले दोन्ही हात फळकुटावर म्हणजे बोर्डवर ठेवले की ते लोक अबव्ह बोर्ड म्हणजे प्रामाणिक! बोर्ड या शब्दाचा उपयोग कंपन्यांच्या संचालनात होऊ लागला, त्यामुळे बोर्ड म्हणजे अधिकारी वर्ग, शासनकर्ते असा अर्थ तयार झाला.
मी म्हटलं ना, भाषेच्या अशा वापरातून जीवनपद्धतीची माहिती मिळते. अरे, अशीच गम्मत असते, त्याला हाय फंडा नॉलेज हवे, असेच काही नाही!
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक..
७ नोव्हेंबर
१८८४- डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा पालकवाडी (जि. वर्धा) येथे जन्म. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले क्रांतिकारक, आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ अशी त्यांची कारकीर्द होय. लो. टिळकांच्या सांगण्यावरून ते लष्करी शिक्षण घेण्यासाठी जपानला गेले. हे शिक्षण उत्तम पद्धतीने पूर्ण करून अमेरिकेत गेले. कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन या दोन विद्यापीठांमधून त्यांनी शेतकीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत असतानाच मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी तेथेच ‘इंडियन इंडिपेंडंट पार्टी’ स्थापून विदेशातील क्रांतिकारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीचा फायदा घेऊन त्यांना मोठय़ा प्रमाणावर ब्रिटिशविरोधी आघाडी संघटित करण्यास सुरुवात केली. परंतु  फितुरीमुळे इंग्रज सरकारच्या गुप्तहेरांना या कार्याचा सुगावा लागला. इंग्रज मागावर असताना डॉक्टर त्यांची दिशाभूल करून इराणला निघून गेले. तिथे काही काळ शांततेत घालवून ते युरोपला परतले. युरोपच्या विविध देशांत व विशेषत: मेक्सिकोत त्यांनी स्थायिक होऊन कृषिसंशोधन केले. तेथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सने त्यांचा गौरव केला. १९६७ मध्ये नागपुरात ते निधन पावले.
१९०५आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे निधन.
१९१३ महान फ्रेंच साहित्यिक आल्बेर कामू यांचा अल्जिरियातील माँडॉव्ही येथे जन्म.
प्रा. गणेश राऊत
ganeshraut@solaris.in

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस

सफर काल-पर्वाची
शिल्पकलेचे आश्रयदाते राष्ट्रकुट
आठव्या शतकात चालुक्य घराण्याचा ऱ्हास झाला. त्यानंतर कर्नाटकात दंतीदुर्ग याने ७५७ मध्ये राष्ट्रकुट नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजघराण्याची स्थापना केली. संपूर्ण कर्नाटकवर राज्य करणारे ते पहिलेच साम्राज्य होते. कर्नाटक राज्याचा विस्तार करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक यशस्वी स्वाऱ्यांमुळे हा राजवंश प्रसिद्धी पावला. त्यांचा दबदबा रामेश्वरपासून दिल्लीपर्यंत होता. दंतिदुर्गाचा उत्तराधिकारी पहिला कृष्ण याने जगातील आश्चर्यापैकी एक म्हणून मान्यता पावलेल्या व खडकात कोरून काढलेल्या वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती केली. मान्यखेत म्हणजेच आजचे गुलबर्गा येथे त्यांची राजधानी होती.
तिसरा गोविंद या राजाने विंध्यच्या उत्तरेस व दक्षिणेस स्वाऱ्या करून प्रतिहार व पाल यांचा पराभव केला. अमोघ वर्ष नृपतुंग या विख्यात राजाने ६५ वर्षे राज्य केले. नृपतुंग हा निष्ठावान जैन होता. तो युद्धांच्या विरुद्ध होता. त्याने कवी व तत्त्वज्ञ यांना राजाश्रय दिला. ‘कविराज- मार्ग’ हे कन्नडमधील प्राचीन महाकाव्य नृपतुंग याचा राजकवी श्रीविजय याने लिहिले. तिसरा कृष्ण या राजाने चोळांचा पराभव करून रामेश्वपर्यंत धडक मारली. राज्याचा विस्तार आणि ललितकलांची प्रगती या दोन्हींमुळे त्याची राजवट वैशिष्टय़पूर्ण झाली. राष्ट्रकुट राजांचा कल जैन धर्माकडे असला तरी त्यांनी शिव व विष्णू या दोन्ही देवांची मंदिरे बांधून उपासनेच्या लोकप्रिय पद्धतींना उत्तेजन दिले.
राष्ट्रकुटांच्या कारकीर्दीत दोन जगप्रसिद्ध शिल्पे घडली. वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिराने व्यापलेले क्षेत्र अ‍ॅथेन्समधील जगप्रसिद्ध पार्थेनान इतके मोठे आहे, पण कैलास मंदिरांची उंची पार्थेनानच्या दीडपट आहे, तसेच राष्ट्रकुटांनी घडविलेल्या घारापुरी (एलिफंटा) गुंफांमधील महेशमूर्तीचे आकारमान प्रचंड (२३ फूट उंच व २० फूट रुंद )आहे. या दोन्ही शिल्पांचे नाव जागतिक श्रेष्ठ कलाकृतींमध्ये घेतले जाते.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल
दूषित पाण्यामुळे होणारे रोग – १
पाणी म्हणजे जीवन हे घोषवाक्य आपण भित्तिपत्रकावर, पुस्तकात नेहमी बघतो. हेच पाणी कधी कधी आपलं जीवन संपवण्यास कारणीभूत होऊ शकतं. दूषित असलेले पाणी जर एखाद्या व्यक्तीने प्यायलं तर त्याच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते, ती व्यक्ती आजरी आहे असं आपण म्हणतो. पाणी मुख्यत: जैविक घटकांमुळे दूषित होते.
पटकी : व्हायब्रिओ कॉलेरा जीवाणूमुळे पटकी हा रोग होतो. पावसाळ्यात फैलावणारा हा एक मुख्य रोग. या रोगात पचनसंस्थेवर परिणाम होतो. पायात गोळे येतात, डोळे खोल जातात, चेहरा निस्तेज होतो, वारंवार शौचाला जावं लागतं, शौच भाताच्या पेजेसारखं हिरवट पातळ असतं. शरीरातून जास्त प्रमाणात पाणी गेल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीरातील पाणी कमी होणे प्राणघातक असते. या रोगात पेशंटला जलसंजीवनी देणे हितकारक असते. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि एक चिमूटभर मीठ घातलं की जलसंजीवनी तयार होते. जलसंजीवनी एकदम न घेता थोडय़ा थोडय़ा वेळाने पिण्यास द्यावे, पटकी प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. या लसीमुळे कॉलराच्या जीवाणूपासून सहा महिने संरक्षण मिळते. विषमज्वर : सालमोनिका टायफी या जीवाणूमुळे विषमज्वर हा रोग होतो. दोन ते तीन आठवडे सतत ताप येणे, अशक्तपणा जाणवणे, भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, ही या रोगाची लक्षणे आहेत. विषमज्वर झालेल्या व्यक्तीचे मल किंवा उलटी पिण्याच्या पाण्यात मिसळले गेले आणि ते पाणी निरोगी व्यक्तीने प्यायले किंवा सांडपाण्यावर पकवलेल्या कच्च्या भाज्या खाल्या तर व्यक्तीला विषमज्वर होतो. डॉक्सिसायक्चीन, क्लोरोमायसिटीन ही प्रतिजैवके विषमज्वर या रोगावर उपयुक्त आहेत.
कावीळ : कावीळचे विषाणू मलमुत्रातून पाण्यात मिसळतात आणि काविळीची साथ पसरते. काविळीमध्ये रक्तात बिलुरुबीनचे प्रमाण वाढते. ताप येतो, मळमळते, उलटय़ा होतात, लघवी पिवळसर लाल होते. या आजारापासून प्रतबंध होण्यासाठी कावीळ झालेल्या व्यक्तीचे कपडे, भांडी उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवून मग धुवावीत, तसेच प्रतिबंधात्मक लस घेणे हिताचे आहे.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी,मुंबई
office@mavipamumbai.org

Story img Loader