कुतूहल : दूषित पाणी प्यायल्यामुळे प्राण्यांना होणारे रोग
स्वच्छ, शुद्ध असले पाहिजे हे आपण शाळेत असल्यापासून शिकतो. आपल्या घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी गाळून घेणे, उकळून घेणे, त्यात क्लोरोवॅटसारखे द्रवपदार्थ घालणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आपण करतो. माणसाप्रमाणेच इतर प्राण्यांनासुद्धा शुद्ध पाण्याची गरज असते. गाय, बल हे किंवा इतर कोणतेही प्राणी पाण्यावर विविध प्रक्रिया करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना जे पाणी मिळेल तेच पाणी पिऊन त्याची तहान भागवतात, परिणामी दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांना बळी पडतात. दूषित पाणी प्यायल्यामुळे कोंबडय़ा, कावळे असे पक्षी किंवा गाय, बल, शेळ्या, मेंढय़ा अशा जनावरांना माणसाप्रमाणेच पटकी, हगवण रोग असे रोग होतात. असे रोग झाल्यास पक्षी किंवा जनावरे उदास होतात. नेहमीप्रमाणे पंख स्वच्छ करणे किंवा जिभेने स्वत:चे शरीर स्वच्छ करणे या क्रिया करण्याचा त्यांना उत्साह राहत नाही. हिरवट पिवळ्या रंगाची विष्ठा होते. पाण्यातील जिवाणू, विषाणू
यांसारख्या जैविक घटकांमुळे हगवण किंवा पटकी असे रोग होतात, तसेच पाण्यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे काही रोग होतात. रासायनिक प्रदूषणामुळे पाण्यात शिसे किंवा पारा मिसळलेले पाणी प्राण्यांच्या शरीरात गेल्यास त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. आकडी येणे, लाल रंगाची लघवी होणे ही याची लक्षणे आहेत. ऑरगॅनो फॉसफेट, ऑरगॅनो क्लोरेट अशा प्रकारची कीटकनाशके पाण्यात मिसळले गेले तर जनावरे मलूल होतात, जास्त ऊठबस करीत नाहीत, स्वस्थ बसून राहतात. तोंडातून लाल गळते. पाण्यातील विषारी घटकांचा बेडकांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. काही
रासायनिक मूलद्रव्यांमुळे पाण्यातील शैवालची प्रचंड वाढ होते. अशा प्रकारचे शैवाल प्राण्यांच्या खाण्यात आले तर त्यांना घातक आजार होऊ शकतात, त्या
आजारातून प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी आपण हे करू शकतो. पाण्याचे साठे स्वच्छ ठेवू या! स्वत:ची आणि इतर सजीवांची काळजी घेऊ या!
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई २२
office@mavipamumbai.org
इतिहासात आज दिनांक.. : ६ नोव्हेंबर
१९०३पनामाच्या स्वातंत्र्याला अमेरिकन सरकारने मान्यता दिली. १९२५मॅडेलिन स्लेड ऊर्फ मीराबेन भारतात- मुंबईत म. गांधी यांच्या भेटीसाठी आल्या.
ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याची ही कन्या गांधीविचारांनी प्रभावित होऊन भारतात आली. २५ ऑक्टोबर १९२५मध्ये त्यांनी ‘पी अँड ओ’ जहाजावरून प्रवास सुरू केला. मुंबईत उतरल्यावर दादाभाई नौरोजी यांचे वारस आणि महात्मा गांधीजींचे पुत्र देवदास गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली. ७ नोव्हेंबरला त्या साबरमतीस पोहोचल्या. वल्लभभाई पटेल त्यांना घेऊन महात्माजींकडे गेले. अगोदरच पत्रव्यवहार झाला होता. गांधीजी त्यांना म्हणाले, ‘इथून पुढे तू माझी
मुलगी म्हणून आश्रमात राहशील.’ पुढे त्यांनी आपले सारे आयुष्यच भारताच्या सेवेत घालविले. त्यांनी आत्मकथा इंग्रजीत लिहिली. ‘दि स्पिरिट्स पिल्ग्रिमेज’ या नावाचे आत्मचरित्र गाजले. त्याचा हिंदी अनुवाद ‘एक साधिका की जीवन-यात्रा’ या नावाने रामनारायण चौधरी यांनी केला. कस्तुरबांना भेटण्यासाठी त्या गांधीजींबरोबर रसोईघरात गेल्या. कस्तुरबा मीराबेनच्या पायांकडे बघत होत्या. मीराबेन यांच्या पायांत बूट होते. गांधीजींनी मीराबेन यांना भारतीय संकेत समजावून सांगितला. त्या बाहेर गेल्या व बूट काढून आल्या. ‘हा पहिला संस्कार’ असे त्या म्हणतात. २००२स्वत:च्या सुवाच्य अक्षरांतून हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे नाशिक येथे निधन.
प्रा. गणेश राऊत
ganeshraut@solaris.in
सफर काल-पर्वाची : सातवाहन साम्राज्य
प्राचीन भारतातील मोठय़ा साम्राज्यांपैकी एक सातवाहन साम्राज्य होते. इ. स. पूर्व २३० मध्ये स्थापन झालेले हे राज्य इ. स. २२० पर्यंत हिंदुस्थानातील फार मोठय़ा क्षेत्रावर पसरलेले होते. सिमुक हा मौर्य साम्राज्यातला एक सरंजामदार. मौर्याच्या अस्तानंतर सिमुकाने स्वतंत्र राज्य स्थापन केले. सिमुकने पूर्व भारतात गोदावरी व कृष्णा नद्यांमधील प्रदेशात स्थापन केलेले हे राज्य ४५० वर्षे टिकले. सिमुकच्या वंशाला आंध्र भृत्य, सालवाहण, सातवाहन, शालिवाहन अशी नावे होती. सिमुक हा मद्रासमधला राहणारा होता व तो आर्य नसून सुधारलेला द्रवीड ब्राह्मण होता. सातवाहन साम्राज्याची चार मुख्य राजधानीची
शहरे होती. आंध्र प्रदेशातील अमरावती, धरणीकोट व महाराष्ट्रातील जुन्नर व प्रतिष्ठान (पैठण) येथून हा कारभार चालत असे. पुढे पश्चिम समुद्रापर्यंत विस्तार झाल्यवर प्रतिष्ठान (पैठण) येथे त्यांनी राजधानी केली. सातवाहन राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. होम हवन, वेद पठण हे नेहमी चालत असे. राजा सतकर्णी याने अश्वमेध यज्ञ केला होता. सातवाहन राजांचे विशेष म्हणजे त्यांच्या नावात आईचा संबंध जोडलेला असे. जसे गौतमीपुत्र, वासिष्ठीपुत्र,
हरीतीपुत्र वगैरे. त्यांच्या राज्यातून माकडे, मोर व हस्तीदंत निर्यात करीत. सोपारा व कारवार ही त्यांची बंदरे होती. सातवाहनांचे मोठे कार्य म्हणजे त्यांनी शक, यवन वगैरे परकियांची आक्रमणे थोपविली. गौतमीपुत्र शालिवाहन याने इ. स. ७८ मध्ये शकांचा पराभव करून त्यांना पळवून लावले. त्यानिमित्त त्याने शालिवाहन शक संवत सुरू केला. सतकर्णी शालिवाहन राजाने ५६ वर्षे राज्य केले. त्याने माळवा प्रांत जिंकून साम्राज्यात जोडला. तसेच कलिंग घेतले. त्यांच्या नाण्यांवर एका बाजूला राजांच्या प्रतिमा छपाईची पद्धत सुरू केली. त्याने दक्षिण पूर्व आशियामध्ये प्रथम हिंदू संस्कृती पोहोचवली. त्यांनी नंतर बौद्ध धर्मालाही राजाश्रय देऊन जुन्नर, वेरुळ येथे लेणी खोदली व स्तूप, विहार उभारले. सातवाहन राजांच्या अस्तानंतर इ. स. २२० नंतर त्यांचे राज्याचे लहान-लहान तुकडे झाले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
मनमोराचा पिसारा.. : ऱ्हाइनस्टोन काऊबॉय
काळ १९७५ चा बेबी बूमर्सची पोरं टोरं आता वयात आलेली. स्वप्न भन्नाट, बीटल्सची गाणी, संगीत आणि बेधुंद जग यात हरवलेली तरुण पिढी. त्यांच्या जीवनात फक्त मुक्ततेला स्थान होतं. अशा अख्ख्या पिढीला प्रचंड वेड लावणारे अनेक गायक होते. त्यांच्या गाण्यात साध्या भोळ्या प्रेमावर विश्वास होता, जगात शांतता नांदावी, युद्ध बंद व्हावीत, माणसानीं गाणी गात ऐकत मदहोषीत जगावं; परंतु, मित्रा अशा पिढीवर राज्य करण्यासाठी संगीतकारांना प्रचंड धडपड, मेहनत आणि खस्ता खाव्या लागल्या होत्या. यशाची ओढ, प्रसिद्धीची चटक, ग्लॅमरचं वेड उरात आणि प्रेमाच्या गाणी कंठात घेऊन ब्रॉडवेवर गाण्यासाठी धडपडणारे शेकडो तरुण रेकॉर्डिग स्टुडिओ आणि संगीत कंपन्यांच्या दाराबाहेर बसून असायचे. अशा सर्व स्ट्रग्लर्सकरिता आणखी एका स्ट्रग्लरने गाणं म्हटलं होतं. ‘ऱ्हाइनस्टोन काऊबॉय’ नावाचं गीत, ग्लेन कॅम्बलनं गायलं आणि अनेक अॅवॉर्ड आपल्या नावावर केली. आपल्या रत्नजडित खोगिरावर पकड ठेवून तो यशाच्या वाटेनं ‘रोडिओ’सारखी कसरत करत घोडदौड करतो, त्याचं गाणं..
या वाटा सर्वकाळ
तुडवल्या आहेत सांजसकाळ
गात गात तीच गाणी
जुनी विराणी
अशी खडकाळलेली ही वाट
खळगे नि खाचा मला पाठ
क्योंकी ये है ब्रॉडवे का रास्ता
मांडवली नि सेटिंग इथला शिरस्ता
सरळ, सज्जन, साधे भोळे
वाहून जातात बघता बघता
जसं बर्फ, पाऊस, पाणी
मेरी मंझिलकी इस राहपर
हाय! कांटे फैले रस्ताभर
तरी पोचेन मी ब्रॉडवेवर
प्रकाशाचा फोकस आहे प्रखर
नि प्रसिद्धीचा झोत झगझगीत
माझ्यावर, येस फक्त माझ्यावर
चढवून खोगीर रत्नजडित
क्षितिजावर, घोडेस्वार
दौडत जाय दौडत जाय
ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय, ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय
केवढी फॅनमेल, केवढी आवतणं
चाहते माझे आहेत सर्वजण
‘प्लीज करा हो गाणं रेकॉर्ड माझ्याकडे’
फोनवर ही कोणी धडपडे!
तसं बिघडत नाही म्हणा फारसं
पाऊस कोसळला म्हणून
आणि वेदनेचं केलं हसं
तर ती ही जाते छपून
पण आपण गाठलेली गाडी जेव्हा
फार अवघड वळसा घेते तेव्हा
अवसान आपलं अशा वेळी
ठेवावं तरी कसं जपून?
मग आपल्या स्वप्नात भरून रंग
त्यामध्ये मी होतो दंग
.लोकलगाडीचं चुरगळलेलं तिकीट सोबतीला
आणि एखादा डॉलर बुटात दडवलेला
तरी पोचेनच तिथवर
ब्रॉडवेवर
प्रकाशाचा फोकस आहे प्रखर
प्रसिद्धीचा झोत झगझगीत
माझ्यावर येस फक्त माझ्यावर
ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय
दौडत जाय, दौडत जाय
ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय
डॉ. राजेंद्र बर्वे –drrajendrabarve@gmail.com
गाण्याचा स्वैर अनुवाद : ललिता बर्वे