रुग्णालय खासगी असो की सार्वजनिक, त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ असावा. त्याच्या जवळ कचऱ्याची पेटी असू नये. त्यामुळे जंतूंची वाढ होते व जंतू रुग्णालयात शिरण्याचा धोका असतो.बाह्य़रुग्ण विभागात दाखल झाल्यावर रुग्णाला स्ट्रेचरवरून वॉर्डमध्ये नेण्यात येते. या गोष्टी सतत स्वच्छ असाव्यात. विशेषत: रात्री त्यावर झुरळे फिरत असतात. स्ट्रेचर, ट्रॉली स्वच्छ असल्या म्हणजे जंतुसंसर्गाला आळा बसतो. काही वेळा स्ट्रेचरचे कापड फाटून रुग्ण खाली पडण्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणून स्ट्रेचरची तपासणी वारंवार व्हायला हवी. वॉर्डमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर डॉक्टर ताबडतोब येऊन रुग्णाला तपासतात. या वेळी रुग्णाने अथवा त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना सर्व हिस्टरी सांगणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. रुग्णाला कोणत्या औषधाची अॅलर्जी आहे ते सांगणेही महत्त्वाचे असते, त्याप्रमाणे त्याच्या केसपेपरवर तशी नोंद केली जाते. रुग्णालयात रुग्ण दाखल दाखल होत असताना तो सध्या कोणकोणती औषधे व ती कशासाठी घेत आहे, तसेच पूर्वीचे आजार कोणते आणि पूर्वी कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या ते डॉक्टरांना सांगणे गरजेचे असते.
रुग्णाच्या गादीवर अन्य कोणी बसू नये. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हे केले पाहिजे. तीच गोष्ट आहाराबाबत. नर्स किंवा डॉक्टरांनी परवानगी दिल्यासच घरून आहार आणावा. हॉटेलमधून काहीही आणू नये. डॉक्टरांनी परवानगी दिल्यावरच उठून उभे राहावे वा चालावे. नाही तर चक्कर येण्याची शक्यता असते. विशेषत: शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना ही खबरदारी घेतली पाहिजे. काही वेळा रुग्णासाठी बाहेरच्या केमिस्टकडून औषधे आणण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात. औषधे आणल्यावर ताबडतोब ती नर्स किंवा डॉक्टरांना दाखवावीत व मगच रुग्णाला द्यावीत. गोळ्या घेतल्यानंतर मळमळ होणे, चक्कर येणे, पोटात आग होणे असे काही झाल्यास डॉक्टरांना ताबडतोब सांगावे. घराभोवती असणाऱ्या कारखान्यांची व त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांची माहिती डॉक्टरांना आवर्जून सांगितली पाहिजे. रुग्णाची शस्त्रक्रिया होण्यापूर्वी सर्व तपासण्या झाल्यावर तो रुग्ण शस्त्रक्रियेस फिट असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावरच शस्त्रक्रिया होते.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा