सतारीचे सूर कानी पडण्याआधी केशवसुतांची ‘सतारीचे बोल’ ही कविता वाचली आणि अनुभवली होती. त्या सुमारास वर्डस्वर्थची ‘डॅफोडिल्स’च्या फुलांचे रंग मनाला मोहवून गेले होते. निसर्ग आणि संगीतामधल्या जादूची अनुभूती घ्यायला मन सज्ज झालं होतं आणि नंतर कधी तरी पंडितजींच्या सतारीची मैफील ऐकली. मनात नेमकी काय खळबळ माजली होती हे आठवत नाही, पण ऐकता ऐकता डोळे कधी पाझरू लागले कळलं नाही. मला सतारीचे बोल ऐकू येत नव्हते, मला समोरचं दृश्य दिसत नव्हतं, फक्त उत्कटतेनं मन भरभरून वाहत होतं. मला माझे अश्रू लपवायचे नव्हते, कशावरच नियंत्रण ठेवायचं नव्हतं. बरोबर चार-दोन फिरंग मित्र होते. त्यांचा हात हातात घट्ट धरून मनातल्या सागरातली भावनांची भरती आजमावत होतो. इतकं उत्कट संगीत, इतके अतीव नादावणारे सूर यांचा अनुभव यापूर्वी घेतलेला नव्हता. मग हळूच एक मित्र म्हणाला, ‘‘भांबावू नकोस मित्रा, या अवस्थेलाच नादब्रह्म म्हणतात.’’ भानावर येऊन पाहिलं तेव्हा पंडितजी उभं राहून प्रेक्षकांना अभिवादन करीत होते, टाळ्या थांबत नव्हत्या. पंडितजींच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न स्मित त्याच इन्टेन्सिटीनं विलसत होतं.
पंडितजींच्या सतारीतल्या बोलांनी सतारीचे बोल अनुभवायला मिळाले. संगीताच्या जादूचा मनस्वी अनुभव देणाऱ्या रवीशंकरजींविषयी मन सदैव ऋणी राहील.
पंडितजींच्या काळापूर्वी सीतारीये होते, पट्टीचे गायक होते, सूरसाज सजविणारे महान संगीतकार होते; परंतु रविशंकरजींनी भारतीय संगीताला देखणा रुबाब दिला.
भारतीय शास्त्रीय संगीत श्राव्यतेकरिता नावाजलेलं. बैठकांमध्ये गाणारे, वाजविणारे संगीत पेश करायचे, संगीतसभा मन प्रसन्न करणारा, दृश्य अनुभव असू शकतो याचं श्रेय त्यांना द्यायला हवं. पंडितजींनी भारतीय संगीत परदेशात नेलं. बीटल्सपासून अनेक पाश्चात्त्य बॅण्डवाल्यांनी त्यांना सर आँखोपर केलं. याकरिता त्यांचं संगीत उच्च कोटीचं ठरत नाही; भारतीय संगीतामध्ये ते देखणेपणानं सादर करण्याची कला आणि कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. सुदैवानं त्या तिन्ही शंकरबंधूंना (रवी, उदय, आनंद) विलक्षण राजबिंडं रूप होतं. रविशंकरजींना नृत्यकला अवगत असल्यानं त्यांच्या संगीतामधली नादमयता शरीराच्या प्रत्येक स्नायूमध्ये भिनते. सतारीच्या सुरांमध्येच थुईथुई नाचविण्याची ताकद आहे. सतारीचे उपजत सामथ्र्य पंडितजींनी पुरेपूर जाणलं आणि त्यांनी चार-दोन हिंदी चित्रपटांना दिलेल्या संगीतात ते पूर्ण उतरविलं. ‘अनुराधा’ सिनेमातल्या मोजक्या चार गाण्यांत लतादीदींच्या सुरातून त्यांनी विविध मूड निर्माण केले आहेत. उदा. ‘जाने कैसे सपनों में खो गयी अखियाँ’ आणि ‘कैसे दिन बीते, कैसी बीती रतिया, पिया जाने ना’.
आजही सतारीचे बोल ऐकले की त्यांची मुद्रा डोळ्यांसमोर येते. भावमग्न, संगीतमय झालेला त्यांचा चेहरा, भव्य कपाळ आणि राजस स्मित, कुरळे केस. सगळंच अद्वितीय आणि अलौकिक, परतत्त्वाचा स्पर्श घेऊन आले आणि देऊन गेले.. आता थांबतो..
पुन्हा मनात खळबळतंय नि डोळे पाणावतायेत.. हं..
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

Story img Loader