फ्रान्सचे व्हालोई घराणे आणि इंग्लंडचे प्लान्टाजेनेट घराणे यांच्यामध्ये इ. स. १३३७ ते १४५३ या काळात वारसाहक्काच्या वादातून झालेल्या युद्धात पराभूत होत चाललेल्या फ्रान्सला जोन या तरुणीने अद्भुत असे नेतृत्व देऊन लढायांमध्ये विजय मिळविले. फ्रान्सच्या मूळ व्हालोई घराण्याचा पदच्युत राजा चार्ल्स सातवा याला १४२९ मध्ये रेहम्स कॅथ्रेडल येथे परत राज्याभिषेक केला गेला, पण बरगंडी या इंग्लंडला पाठिंबा देणाऱ्या राज्यातून पुरुषी पोषाख घालून जोन जात असता पकडली गेली. जोनच्या अमाप लोकप्रियतेमुळे अनेक फ्रेंच लोकांनाही ती नकोशी झाली होती. त्यांनी अरास येथे प्रथम तिला बरगंडीच्या डय़ूक फिलीपच्या कैदेत ठेवले. नंतर इंग्लंडच्या सरकारने तिला विकत घेतले आणि तिच्यावर धार्मिक कोर्टात खटला भरला. राऊन येथे १४३१ साली हा खटला चालला व जोनवर ती चेटकी व सैतानाची दूत असून पुरुषी वेष धारण केला, हे आरोप ठेवून तिला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तिला गुन्हेगार ठरविण्यात पियरे काथोन या बिशपचा मोठा सहभाग होता. जोनला राऊन येथेच ३० मे १४३१ रोजी एका खांबाला बांधून जाळण्यात आले. एकदा पूर्ण जळाल्यावर तिचा देह दुसऱ्यांदा परत कोळसा होईपर्यंत जाळण्यात आला. इ. स. १४५३ साली परत एकदा धार्मिक कोर्टाने तिच्यावर ठेवलेल्या आरोपांची फेरचौकशी केली व त्यात सर्व आरोप बिनबुडाचे होते, हे सिद्ध झाले. पोप पंधरावे बेनिडेक्ट यांनी १९२० साली तिला संतपद बहाल केले. ती त्यानंतर सेन्ट जोन ऑफ आर्क म्हणून ओळखली जाऊ लागली. फ्रान्समध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी तिचा स्मृतिदिन म्हणून साजरा करतात. कॅथलिक ख्रिश्चनांमधील ती सर्वात अधिक लोकप्रिय संत आहे. नेपोलियन बोनापार्ट प्रत्येक लढाईवर जाताना जोनच्या प्रतिमेला वंदन करून जात असे.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader