मनमोराचा पिसारा.. तेरा मेरा प्यार अमर
मित्रा, प्यारका जादू देखना हैं? तो मेरे साथ बैठ और यू-टय़ूब पे टाइप कर, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘असली नकली’, साधना, देव आनंद, शंकर जयकिशन. काही क्षणांत त्या छोटय़ा स्क्रीनवर प्रेमाचं जाळं विणणारी भावविभोर डोळ्यानं चंद्राकडे पाहणारी, स्वत:शी किंचित स्मित करीत गाणं म्हणणारी साधना दिसेल. विसरून जाशील रे, अलम दुनिया, प्रेमात पडशील. त्या प्रतिमेच्या प्रेमाची ही हुरहुर लावणारी कहाणी पाहण्यासाठी यश चोप्रा आणि कंपनीतर्फे स्वित्र्झलडला जायला नको. टय़ुलिपच्या रंगीबेरंगी ताटव्यांतून गाणी म्हणायला नकोत. झकपक कपडे घालून, एकमेकांच्या मिठीत हरवलेले चेहरे नकोत. यातला कोणताही देखावा नको, डामडौल नको. कसलीही बोलबच्चनगिरी नि आतषबाजी नको. हे सगळं कृत्रिम वाटतं. आपल्याला हवी फक्त साध्यासुध्या वेशातली गोड प्रतिमा. कसलाही आव नको, सौंदर्याचाही नको.
या गाण्यातली साधना शिवदासानी म्हणजे खास करून (मराठी) पुरुष मनाच्या दिलकी धडकन. काठपदराची सुती साडी. किंचित लांब बाह्य़ांचं ब्लाऊज. साधनाच्या साडीवर साध्या बुट्टय़ांचं डिझाइन असतं, तिने कानात मध्यम आकाराच्या रिंगा, गळ्यात सोन्याची चेन घातलेली असते. कपाळावर किंचित मोठं कुंकू, मानेवर रूळणारा सैलसर आंबाडा आणि त्यावर मोगरीचा (वाटावा असा) गजरा घातलेला असतो. मला वाटतं, साठच्या दशकातल्या स्त्रीसौंदर्याच्या कल्पना साधना परिपूर्ण करते. फक्त ब्लॅक अॅण्ड व्हाईट जमान्यातच की अजूनही?
गाण्यासाठी हृषिदांनी स्टुडिओत गिरणगावातल्या एखाद्या चाळीच्या गच्चीचा सेट मांडलेला होता. कौलारू छपरं, बांबूच्या कमानी, पाण्याच्या टाक्या हे सगळं खोटं आहे, हे पाहताच कळतं. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. साधना मेक्स एवरीथिंग रिअल. गाण्याच्या सुरुवातीला ती चंद्राकडे पाहते आणि संपतानाही. तिच्या डोळ्यांत आनंद, हुरहुर सगळं दिसतं. असं वाटतं की हे गाणं ती देव आनंदला उद्देशून म्हणतेय की चंद्राला? की खूप जवळचा वाटणारा प्रियकर अखेर चंद्रासारखा दूरच राहतो. प्रेमामधली जवळीक म्हणजे नेमकं काय? प्रेमातली बांधीलकी ही संकल्पना की सत्य? एकमेकांना घातलेल्या शपथा, दिलेली वचनं खरीचना. कधी कधी जवळकीच्या एहसासानं, त्या अनुभवाने सुखावतं पण ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हे प्रेमाच्या बाबतीत विशेष खरं असतं. न जाणो, या सुखाच्या दिवसांना दृष्ट तर लागणार नाही ना? दोघांमध्ये समज-गैरसमजाचं वादळ तर उसळणार नाही ना? या विचारानं तिचं मन कातरतं. ‘चलती हूँ मैं तारों पर, फिर क्यू मुझको लगता हैं डर?’ खऱ्याखुऱ्या अस्सल प्रेमाच्या व्यथा गाण्याच्या शब्दांतून आणि साधनाच्या असण्या-दिसण्यातून व्यक्त होतात. हृषिकेश मुखर्जीनी प्रेमाचं हे म्हटलं तर लोभस म्हटलं तर बोचरं रूप बहारदारपणे पेश केलंय. गाण्याची हीरॉइन साधना आणि तिचं मोहक रूप. फक्त साधना, साधना नि साधना. मित्रा, साधनानं ‘लव इन सिमला’मध्ये प्रसिद्ध ‘साधना कट’ केला आणि आजही कपाळावर झुलणाऱ्या ‘फ्रिल’ला ‘साधना कट’ म्हणतात. तिनं ‘वक्त’मध्ये प्रथम ‘भानु अथय्यां’च्या मदतीने घट्ट कमीझ आणि चुडीदार फॅशन पेहेनली आणि आजही साधनाचे ‘आरजू’, ‘मेरे मेहेबूब’ आणि ‘वक्त’मधले कॉश्च्यूम आकर्षक वाटतात. शी वॉज अ ट्रेंड सेटर.. वी लव यू साधना.. अपना प्यार खरंच अमर आहे..
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा