मनमोराचा पिसारा.. कंट्री रोड्स टेक मी होम..
आपल्या गावापासूनचे ‘तुटलेपण’ हा भौगोलिक अनुभव नाही. ‘काळी आई, मोटेवरचं गाणं, गावरान मेवा, दुपारच्या टळटळीत उन्हातल्या झाडाखाली संथ रवंथ करणाऱ्या गायींबरोबर बसल्या बसल्या लागणारी डुलकी यांची सय येते आणि शहरी मन हुरहुरतं. मित्रा, यातले काही तपशील आपल्याला ग्रामीण कथांतून यापूर्वी भेटलेले आहेत. अगदी प्रत्यक्ष अनुभव नसला, तरी आपण सहअनुभूतीने सहअनुकंपित होतो. म्हणूनच जॉन डेनवरच्या गाण्यातली अपरिचित नावं, गावं परकी वाटत नाहीत. त्यामधल्या भावना जाणून डेनवरचं ‘कंट्री रोड्स टेक मी होम’ आपल्यालाही कातरल्यासारखं होतं.
जॉन डेनवरचे पिताश्री लष्करी, त्यामुळे त्यानं गावोगावी भटकंती केली. तो सदैव एखाद्या गावात डेरेदाखल होऊन आपली मुळं रुजवायला उत्सुक होता. वयाच्या अकराव्या वर्षी आजीनं दिलेली गिटार घेऊन पठ्ठय़ा गायला लागला तीच मुळी ‘कंट्री साँग्ज.’ अमेरिकेतली कंट्री साँग्ज म्हणजे आपल्याकडची गावाकडची नाती सांगणारी नॅरेटिव-कथनात्मक गाणी. हुरहुर, मित्रमैत्रिणींबरोबरचे नाजूक प्रसंग, नद्या-नाले, दऱ्या-डोंगर यांची ओढ मांडणारी ही गाणी जॉन कुठेही फुकट गायला तयार असायचा. गाण्यानं त्याला मोठं केलं. पुढे राजकारणात डेमोक्रॅटच खंदा प्रचारक झाला. विमानं उडवायचा, त्याचं प्रेम फक्त मायभूमीच्या गहिऱ्या आठवणींवर आणि गिटारवर.. मित्रा, कंट्री रोड्स टेक मी होम हे माझं अत्यंत आवडतं गाणं, यूटय़ूबवर ऐक जॉनच्या आवाजात.. मस्त फुलतो मनमोराचा पिसारा.
गावाकडच्या रस्त्यांनो. माझ्या जिवलग दोस्तांनो,
आता न्या रे मला गावी, माझ्या गावी,
माझ्या गावी स्वर्ग आला पृथ्वीवरी, उतरुनी खरोखरी भूनंदन साक्षात,
वेस्ट व्हर्जिनिआ प्रांत, नदी शेननडो खळखळे,
इथे रान, तिथे मळे, झाडेपेडे जुनी जुनी,
नदी पुराणी त्याहुनी तिच्या प्रवाही अलगद, वाहे जीवन सुखद
चिरपरिचित नित, असा ब्लूरिज पर्वत किती ब्लूरिज प्राचीन,
तिथे नदीही हो लीन
‘मोमा’ माउण्टचे कडे, सभोवती होती खडे
रस्ता गावाकडे वळे, जिथे माझी पाळेमुळे
इथे कोळशाच्या खाणी, क्षतविक्षत धरणी नाही निळेशार पाणी.
नाही नीलम गगनी धूळ आसमंती काळी,
धूळ भरली आभाळी झरे प्रकाश चंद्राचा,
त्यात भास काळोखाचा तरी प्यार मला किती,
माझ्या वर्जिनिया प्रांती जीव गुंतुनिया राही,
नेत्र ओलसर होई तसा तिचा अन् माझा, आहे संपर्क रोजचा
रेडिओ स्टेशनच थेट, देते सकाळीच भेट!
पुकारतो भवताल, का न आलो येथे काल
शहराचे मायाजाल, करी जिवाला बेहाल,
मनी दाटे हुरहुर, किती गाव राही दूर
आता न्या रे मला गावा, माझ्या गावा, माझ्या गावा. गावाकडच्या रस्त्यानो, माझ्या जिवलग दोस्त, न्या रे मला, न्या रे मला, माझ्या गावा, माझ्या गावा.
स्वैर अनुवाद- ललिता बर्वे
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा