कुतूहल : मोबाइलची काळजी
मोबाइल फोन फुटणे, बॅटरीचा स्फोट होणे, मोबाइल पेटणे यामुळे लोकांना इजा झाल्या आहेत. कुणाचा कान फाटणे, कुणी भाजणे, कुणाची बोटे तुटणे असे अपघात होतात. मोबाइल बंद पडल्यावर लोक तो दुरुस्त करायच्या फंदात पडत नाहीत. ते नवा मोबाइल विकत घेतात म्हणून मोबाइल फोन व त्याची बॅटरी यांची नीट काळजी घ्यायला हवी. ऋतुमानानुसार मोबाइलचे आजारही बदलतात. उन्हाळ्यात बॅटरी निकामी होते. पावसाळयात डिस्प्ले बिघडतो. हिवाळा मात्र ठीक जातो.
मोबाइलची काळजी कशी घ्यायची? तो खाली पाडू नये. मोबाइल सारखा-सारखा पडल्याने त्याचे भाग ढिले होतात व नंतर ते वेगवेगळे होतात. मग आवाजाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला किंवा दुसऱ्या बाजूच्या माणसाला नीट ऐकू येत नाही. मोबाइल कव्हरचा उपयोग केला तर त्याला फारशी इजा होत नाही. निदान त्याचे दोन वेगळे भाग होत नाहीत. मोबाइलची बॅटरी फुलचार्ज असावी असा बऱ्याच जणांचा अट्टाहास असतो. बॅटरी खूप वेळ चार्ज केली की तो खूप दिवस चालतो असाही काही जणांचा समज असतो. त्यामुळे काही लोक आपला फोन सतत चार्जरला लावून बसलेले असतात. खरे म्हणजे मोबाइलची बॅटरी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे चार्ज करू नये. नाही तर तिचे आयुष्य कमी होते. उन्हाळ्यात तर याची विशेष काळजी घ्यावी लागते, नाही तर बॅटरी फुटू शकते. बारा तासांच्या वर बॅटरी कधीही चार्ज करू नये आणि ती ७० टक्केडिस्चार्ज झाल्याशिवाय परत चाìजगला ठेवू नये.
मोबाइल चार्ज होत असताना त्यावर कधीही बोलू नये. विद्युतदाबामुळे धोका निर्माण होतो. मोबाइल पाण्यात वापरू नये, पाण्यात मोबाइल पडल्यास तो बिघडतो. मोबाइल ओला झाल्यावर लगेच बॅटरी चालू करू नये. पेट्रोल किंवा अन्य अल्कोहोलने मोबाइल साफ करू नये. पेट्रोल भरत असताना मोबाइल वापरू नये. गॅसच्या ठिकाणी, गरम इस्त्रीजवळ मोबाइल ठेवू नये. पेसमेकर लावलेल्याने मोबाइल वापरू नये.
अनंत ताम्हणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा.. वैखरी कैसेनि सांग?
संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या रचनांचा आनंद हरतऱ्हेनं घेता येतो. पंडित भीमसेन जोशी, लतादीदी, किशोरीताई, हृदयनाथ, आशाताई अशा दिग्गज मंडळींनी ‘संतवाणी’ गाऊन कितीतरी अभंग नि पदं आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे आपलं भावजीवन अनेक अंगांनी फुललं. अभंग वाचनाबरोबर अभंगश्रवण केलं की त्या गायक आणि वाद्यवृंदाची ऊर्जा आपल्यापर्यंत थेट येते. मनात घुमत राहाते. राहून राहून त्या स्वरांचे पडसाद उमटत राहतात. या अलौकिक मंडळींच्या स्वरामुळे, शब्दोच्चार आणि विशिष्ट आघातामुळे अभंगातल्या गहन अर्थात सहज अवगाहन करता येतं. आस्वादात तर भर पडतेच, पण अभंगकर्ता ज्या सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतो, त्याचं आणि पांडुरंगाचं, विठुरायाचं नातं कसं आहे? याचं सुभग दर्शन घडतं. मुख्य म्हणजे विठोबा आणि भक्त यांच्या नात्यात एकसुरीपणा नाही. धट्टय़ाकट्टय़ा विठ्ठलाला ‘आई’स्वरूप मानण्याची धिटाई भक्त करतो. कधी हा विठ्ठल एके जागी स्थिर राहिल्याबद्दल भक्त मनापासून तक्रार करतात. ‘धाव पाव सावळे विठाई’ असं म्हणून ‘युगे अठ्ठावीस विटेवर उभे’ असलेल्या सावळ्या देवाला आवाहन करतात, तर कधी भक्तासाठी तिष्ठत उभं राहिल्याबद्दल कौतुकही करतात.
संत ज्ञानेश्वर विठ्ठलाबरोबरच्या भक्त नि माणसाच्या नात्याचे पदर उलगडून दाखवतात, त्याचप्रमाणे परमात्म्याचं नेमकं स्वरूप कसं असावं यावर मनोज्ञ चिंतन करतात. परमेश्वराला ‘मानवरूप’धारण करून सगुण-साकार केलं खरं, पण या प्रयोगात त्याचं आद्य निराकार-निर्गुणत्व लोप पावलं असं वाटल्यामुळे ज्ञानोबानी परमात्म्याच्या नेमक्या स्वरूपाची चिकित्सा करणाऱ्या अतिशय गोड रचना मांडल्या.
कानडा हो विठ्ठलु, कर्नाटकु, याने मज लावियेला वेधू
असं म्हणून ते संभ्रमित करणाऱ्या विठ्ठलाच्या रूपाचा वेध घेतात.
‘पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे,’
‘समोर की पाठीमोरा नकळे’ असं म्हणून केवल तेजोमय तेच त्याचं स्वरूप असल्याचं ठासून म्हणतात. परमात्म्याचं रूप जर केवळ विशुद्ध ऊर्जा आहे, म्हणून त्याचा अनुभवदेखील तितकाच निराकार आणि नि:शब्द असतो. ज्ञानदेव त्याच रचनेत या स्वरूपावर अतिशय गोड शब्दात भाष्य करतात. ‘शब्देविणु संवाद, दुजेविण अनुवादु’ असं म्हणून ‘केवळ अनुभव’ ‘सिर्फ एहसास’ हेच त्या परमात्म्याचं स्वरूप आहे असं सांगतात. ते म्हणतात, वैखरी कैसे मी सांगे. माझा अनुभव ‘परेहि परते बोलते खुंटले’ असा ‘परा’ स्वरूपात राहिला आहे. ‘परा’ हा आद्य ज्ञान-भावानुभव. नंतर त्या अनुभवाचे पश्चन्ति, मध्यमा आणि वैखरीत रूपांतर होते. अनुभवानं जागवलेली मानसिक ऊर्जा पुढे विचारांच्या रूपात (मध्यमा) मनात आकार घेते आणि वैखरी म्हणजे शब्दांच्या वापरातून मुखरित होते. ज्ञानेश्वर म्हणतात, सारे अनुभव फक्त विचार आणि शब्दरूपात मांडता येत नाही. विचार आणि शब्द हे सापेक्ष असतात. त्यांचे विविध अर्थ लावता येतात. व्यक्ती, समाज, काल परिस्थितीने शब्दांचे अर्थ बदलतात. अमूर्त विठ्ठला, तुझा अनुभव पूर्णपणे मानसिक.. केवळ मनानं आकळण्यासारखा.. किती मधुर, अर्थपूर्ण आहे ना मित्रा?
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
इतिहासात आज दिनांक.. २९ नोव्हेंबर
१८३५ कवी आणि प्राचीन वाङ्मयाचे अभ्यासक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा माहुली (जि. सातारा) येथे जन्म. मुंबईत एलफिन्स्टनमधून बी. ए. होऊन कराची, पुणे, कोल्हापूर येथे त्यांनी अध्यापक म्हणून कार्य केले. कोल्हापूरला संस्कृतचा सखोल व व्यापक अभ्यास केला. पुढे ते मुंबई व अहमदाबाद सरकारी महाविद्यालयांत संस्कृतचे प्राध्यापक झाले. याच काळात त्यांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, सिंधी, गुजराती या भाषांवर प्रभुत्व मिळविले. ग्रीक, पर्शियन, लॅटिन भाषांचेही त्यांनी अध्ययन केले. कुंटे हे मराठी साहित्यात अजरामर आहेत ते ‘राजा शिवाजी’ या काव्यासाठी. या मराठी काव्याचे भाग १ ते ३ (१८६९) भाग ४ ते ६ (१८७१) मध्ये प्रसिद्ध झाले. या काव्याच्या इंग्रजी प्रस्तावनेत त्यांनी आपला हेतू विशद केला आहे. ते लिहितात, ‘अशिक्षित व सुशिक्षित यांना राष्ट्रहितासाठी एकत्र आणले पाहिजे. यासाठी सर्वाना समजेल व आवडेल अशा सरळ व नित्य व्यवहारातील भाषेचा प्रयोग केला पाहिजे.’ या काव्यामुळे त्या काळात खळबळ उडाली. भाषेची तोडजोड केल्याची टीका कुंटे यांच्यावर पंडितांनी केली. उच्चारानुसार भाषा वापरली होती. यामुळे भाषाभिमानी लोकांचा त्यांना सामना करावा लागला. त्यांनी ‘मन’ हे २५५ श्लोकांचे काव्य रचले. ‘ऋषी’ हे ७७० ओळींचे काव्य इंग्रजीत रचले.
१९४७संयुक्त राष्ट्रसंघाकडून पॅलेस्टाईनच्या फाळणीची योजना जाहीर.
१९६१ पहिले रशियन अंतराळवीर प्रवासी युरी गागारिन यांचे नवी दिल्लीत आगमन. भारतभेटीवर ते प्रथमच आले होते.
प्रा. गणेश राऊत
ganeshraut@solaris.in
सफर काल-पर्वाची : चिनी कम्युनिस्ट पक्षाची वाढ
चीनमध्ये १९११ सालच्या क्रांतीमध्ये तुंग मेंग हुई या गुप्त संघटनेने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. मांचू राजवट नष्ट केल्यानंतर या संघटनेची पुनर्घटना करण्यात आली. या नव्या पक्षाचे क्योमिंतांग पक्ष असे नामकरण करण्यात आले. बरेच राष्ट्रवादी देशभक्त विद्यार्थी या क्योमिंतांग पक्षाकडे आकृष्ट झाले. १९२१ मध्ये या पक्षातील काही लोकांनी सन्यतसेनच्या अध्यक्षतेखाली प्रतिसरकारची स्थापना केली. त्याच वर्षी चीनमध्ये शांघाय शहरी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. रशियातील साम्यवादाच्या यशामुळे बऱ्याच चिनी नागरिकांना साम्यवादी विचारसरणीचे आकर्षण वाटू लागले होते. रशियाप्रमाणेच चीनमध्ये आमूलाग्र क्रांती घडवून आणली पाहिजे, अशी या लोकांची भावना होती. अशा प्रकारे चीनमधील वातावरण डाव्या विचारसरणीकडे झुकू लागल्यावर रशियातील साम्यवादी प्रचारकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. १९२३ साली रशियाने सन यत सेन व क्योमिंतांग पक्षास आपला पाठिंबा जाहीर केला. क्योमिंतांग कम्युनिस्ट पक्षाचा सहकार्याचा करार करण्यात आला. रशियातील सल्लागार कँटन येथे आले. त्यांनी क्योमिंतांग पक्षाची पुनर्रचना केली आणि चीनमध्ये क्रांतिकारक सेना तयार केली. पक्षातील बऱ्याच मोक्याच्या जागा कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी बळकाविल्या होत्या. लष्करी आक्रमक कार्यक्रमाची अशा तऱ्हेने पाश्र्वभूमी तयार केली गेली. राष्ट्रीय पातळीवर क्रांतिकारक सेनेची उभारणी करण्यासाठी कँटन शहराजवळ व्हाम्पोआ येथे अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एक लष्करी केंद्र सुरू करण्यात आले. त्याचे नाव व्हाम्पोआ अकॅडमी. या केंद्रात रशियन सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली चिनी अधिकाऱ्यांचे दल तयार करण्यात आले. त्यांना लष्करी, लष्करी तांत्रिक व राजकीय शिक्षण देण्यात आले. चँग कै-शेक याची या अकॅडमीचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. २० व्या शतकातील चीनच्या राजकीय इतिहासात चँग कै शेकचे स्थान वैशिष्टय़पूर्ण आहे.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com