सर्कस एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवणे हा व्यापाचा भाग असतो. सर्कसमध्ये सहजी ५० ते १०० प्राणी असतात. त्यात वाघ, सिंहापासून घोडे, उंट, कुत्र्यांपर्यंत नाना प्रकारचे प्राणी असतात. हे कोणतेही प्राणी उघडय़ावर ठेवता येत नाहीत. त्यांना त्यांच्यासाठी बनवलेल्या पिंजऱ्यात ठेवावे लागते, कारण ते केव्हा हिंस्त्र बनतील आणि माणसांच्या जिवावर उठतील हे सांगणे अवघड आहे. मग सर्कस एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवायची म्हटल्यावर हे पिंजरे हलवणे आले. शिवाय थंडी, पाऊस, ऊन या सर्वात हे पिंजरे टिकणे ही अवघड बाब असते. ते वाहतुकीत खराब होणार नाहीत ना, तुटले तर प्राणी त्यातून सुटून तर जाणार नाही ना, अशा नाना प्रकारच्या चिंता सर्कसच्या व्यवस्थापकाला वाहाव्या लागतात. सर्कशीतला दुसरा अवजड भाग म्हणजे सर्कसचा तंबू. एका वेळी हजारभर माणसे बसण्याएवढा तो प्रचंड असतो. तो गुंडाळणे, बांधणे आणि त्याची वाहतूक करणे हा व्यापाचा दुसरा भाग असतो. शिवाय त्याचे खांब, दोऱ्या या सगळ्या गोष्टी तंबू उतरवताना अशा नीट ठेवाव्या लागतात की दुसऱ्या गावी गेल्यावर परत तंबू उभारताना त्या सहजी मिळाल्या पाहिजेत, नाही तर त्या जर परत विकत घ्याव्या लागल्या तर सर्कशीचा खर्च विनाकारण वाढतो.
सर्कशीच्या सामानाचा तिसरा भाग म्हणजे तंबूमध्ये लोकांना बसायला ज्या गॅलऱ्या बांधतात त्याच्या असंख्य फळ्या आणि खुच्र्या, कोच वगैरे याची मधून मधून तपासणी करावी लागते. फळ्यांना चिरा तर पडल्या नाहीत ना? तर मग त्या बांधताना किंवा लोक बसल्यावर तुटून अपघात होऊ शकतो. सर्कशीच्या सामानाचा चौथा भाग म्हणजे त्यात काम करणाऱ्या १००-२०० लोकांची वाहतूक आणि त्यांचे कपडे व इतर सामान आणि पाचवा भाग म्हणजे इतक्या लोकांसाठी जेवण बनवण्याचे सामान व भांडी-कुंडी. या सगळ्यांची वाहतूक ही सार्वजनिक वाहनांनी करणे अवघड असते. यासाठी सर्कसच्या मालकीची स्वत:चीच वाहने असावी लागतात.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची- १. शंभर वर्षांचे युद्ध
फ्रान्सच्या इतिहासात इ. स. १३३७ साली सुरू झालेले हे युद्ध राजघराण्याच्या वारसा हक्काच्या वादावरून सुरू झाले. त्याचा शेवट १४५३ साली झाला. या युद्धाला जरी इतिहासकार शंभर वर्षांचे म्हणतात. तरी प्रत्यक्षात ते सुरुवातीपासून सलग शेवटपर्यंत युद्ध चालले असे नाही. या मोठय़ा काळात लहान मोठय़ा अनेक लढाया एकाच कारणावरून झाल्या. या लढाया इंग्लंड व फ्रेंच सैन्यात जरी झाल्या तरी त्या फ्रेंच भूमीवरच लढल्या गेल्या. जवळपास तीनशे वर्षे फ्रान्सचे राज्यकर्ते असलेल्या घराण्याला वारस नव्हता. त्यातल्या त्यात नातेसंबंध पाहून इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा हा गादीचा वारस ठरत होता. त्याने वारसा हक्काने आपल्याला फ्रान्सचे राज्यपद मिळावे, म्हणून खटपट सुरू केली. परंतु फ्रेंच सरकार, उमराव यांना एडवर्डला राज्यपद देणे पसंत नव्हते. त्यांना व्हेलाईस पारंपरिक घराण्याच्या फिलीप या फ्रेंच माणसाला राजपदावर आणावयाचे होते. त्यावर एडवर्डने आग्नेय फ्रान्समधील गासकोनी या प्रांताचे राज्य आपल्याला मिळाले तर त्या बदल्यात फ्रान्सचा वारसा हक्क तो सोडायला तयार झाला. फिलीपने गासकोनी द्यायचे नाकारून इंग्लंडबरोबर युद्ध सुरू केले. इ. स. १३३७ मध्ये सुरू झालेले युद्ध सुरुवातीची सात वर्षे इंग्लिश खाडी व उत्तर फ्रान्समध्ये चालले व इंग्लंडने लहान-मोठय़ा लढायात विजय मिळविले. त्याच वर्षी युरोपात ब्लॅक डेथ या प्लेगच्या साथीने हाहाकार माजविला. आधीच पराभवामुळे फ्रान्सचे नाविक दल व लष्कर कमकुवत झालेले व त्यात प्लेगने फ्रान्सची आर्थिक परिस्थिती खालावलेली. त्यामुळे १३५६ सालापर्यंत युद्धबंदी झाली होती. या काळात इंग्लंडचा राजा एडवर्डचा मृत्यू झाला व त्याचा मुलगा ब्लॅक प्रिन्स हा राजा झाला.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. -१० डिसेंबर
१९५५थोर विचारवंत, बुद्धिवादी आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांचे निधन. ते ‘आधुनिक भारत’ कार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १८९४ रोजी कोल्हापूर भागातील विशाळगड संस्थानातील मलकापूर येथे झाला. आचार्याचे शिक्षण कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे झाले. असहकार चळवळीच्या काळात त्यांनी शिक्षण सोडले. स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. पुढे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिक्षक झाले. आचार्याच्या चरित्रकार राजेश्वरी देशपांडे लिहितात, ‘राष्ट्रीय चळवळीतील कार्यकर्ते आणि ‘नवशक्ती’, ‘नवभारत’, ‘साधना’ इत्यादी वैचारिक नियतकालिकांचे संपादक म्हणून सक्रिय राहिलेल्या आचार्य जावडेकरांनी ग्रंथलेखन, नियतकालिकांतील लेख, भाषणे, संपादन अशा चतुर्विध मार्गानी महाराष्ट्रात वैचारिक जागृती करण्याचे काम तीन तपे केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी समाजाने ‘गीता रहस्या’ नंतरचा मराठीतील एक थोर ग्रंथ असा गौरव आचार्याच्या ‘आधुनिक भारत’चा  केला. त्या ग्रंथात, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या राजकीय इतिहासाची आणि टिळक व गांधी यांच्या राजकारणातील अंत:संबंधांची पुनर्माडणी आचार्यानी केली आहे. नंतरच्या काळात गांधी आणि मार्क्‍स यांची परस्परपूरकता स्पष्ट करून ‘सत्याग्रही समाजवाद’ ही नवी विचारसरणी त्यांनी पुढे मांडली.
१९६३ लिनुस पाऊलिंग यांना शांततेचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
१९७१ भारतीय लष्कराची ढाक्क्य़ाकडे विविध भागांमधून आगेकूच सुरू झाली आणि भारत – पाक युद्धाचा निर्णय काय लागणार याचा अंदाज आला.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

मनमोराचा पिसारा.. -ऋणी आहे निसर्गाचा
रस्त्यावरच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या पखरणीकडे पाहून थबकलो. समोर सर्वत्र सडा पडलेला होता इतका दाट की जणू सफेद रंगाचा नाजूक गालिचा असावा. त्या फुलांवर पाय देऊन चालणं जिवावर आलं. वाट काढून पुढे आलो आणि पुन्हा मागे वळून पाहिलं तेव्हा चार दोन फुलं आणि पाच दहा कळ्या डोळ्यासमोर जमिनीवर अवतरल्या. गालिचा अधिक दाट झाला आणि अवचिता परिमळू पसरला.
पुढे जाववेना. वाकून ओंजळभर फुलं घेतली. उग्र म्हणाला इतका गोड, मनात शिरावा असा मादक आणि क्षणधिभर रेंगाळून नाहीसा होणारा.
किती नाजूक फूल. किंचितशा सनईसारखं. खूपसं पांढरं पण निरखून पाहिल्यास पिवळट गुलाबी छटा. चारापैकी एक पाकळी जरा मोठी आणि फुगीर नि टोकाशी दुभंगलेली. आतले केसर नाजूक पण ताठ.
हे बुचाचं फूल. सॉरी , फुलानो अगदीच गद्य नाव आहे. ‘रात्रचंद्रिका’ असं रमणीय नाव द्यायला हवं होतं. मराठी बोली कधी उगीचंच राकट देशा, दगडांच्या देशा होते.
झाड चांगलं सरसरीत उंच वाढतं. सरळसोट, फांद्या एकेरी आणि पसरलेल्या. पानं अतिशय सुंदर. त्यांची झाड जणू आरासच मांडतं. मुळाशी फुगीर, हिरवंगार आणि दातेरी कडा पण दात टोकदार नव्हेत. फुलं झाडाला झुपक्यानं लोंबकळतात. पाचपाच- दहादहांच्या झुबक्यांनी पहाटे कधीतरी उमलतात आणि तासा दोन तासांत गळून पडतात.
ही झाडं दाटीवाटीनं उभी असली तर पंधरावीस मीटरचा गालिचा जमिनीवर अंथरतात.
ओंजळीतील फुलं आणून छोटय़ा ग्लासात ठेवली आणि विसरून गेलो. पण फुलं विसरली नाहीत. ग्लासातल्या पाण्यावर कळ्या उमलल्या आणि कोवळी फुलं तरारली. सर्वत्र सुगंध पसरला. तोच निर्गवी परिमल.
न राहावून एकेक फूल उचलून पाहिलं आणि थक्क झालो. ताजी दिसणारी फुलं निरखून पाहिली आणि चकित झालो. हातात फूल तसंच राहिलं.
ज्या फुलांचे देठ मजबूत होते, पक्के होते ती फुलं तरतरीत झाली होती. ज्या फुलांचे देठ कमकुवत होते ती म्लान झाली होती. जी फुलं आपल्या देठासकट ठाम होती, ती फुलली होती. त्यांचा सुवास दरवळत होता.
मित्रा, निसर्ग किती सुंदर कविता करतो ना रे! ज्या फुलांचा पाया मजबूत, त्यांनी जीवनरस सोसला. ती जगली. ज्या माणसांच्या  मनात ठाम, दृढ आत्मविश्वास, ज्यांची मूलभूत मूल्य अढळ ते तग धरतात, जगतात, फुलतात आणि इतरांनाही फुलवतात. खरंय ना मित्रा! कसे आभार मानू फुलांनो तुमचे? धन्यवाद देत नाही. फक्त ऋणी राहातो, फुलांचा, निसर्गाचा आणि आशावादी ठामपणाचा!
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

Story img Loader