माणसाला प्राण्यांचे खेळ करण्याची आवड पिढीजात आहे. ही आवड कोणत्याही एका देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक आहे. पण प्राण्यांचे खेळ करण्याची आवड मुळात माणसात निर्माण झाली ती कोणे एके काळी त्याच्या अन्नासाठी तो प्राण्यांची शिकार करी, त्यावरून सुचली असणार. त्या वेळचे प्राण्यांचे पळणे, त्याच्यापासून लपून रीहणे, त्यांच्या चेहऱ्यावरचे क्रूरतेचे, भित्रेपणाचे, लबाडपणाचे, खिन्नतेचे, शरण आल्याचे हावभाव पाहून तो चकित झाला असणार. ज्या गोष्टी माणसाला एकेकटय़ाला दिसल्या व त्या पाहून त्याला आनंद झाला, त्या गोष्टी इतर अनेकजणांना दाखवाव्यात असे त्याला वाटणे साहजिक आहे. मग तो घोडय़ांच्या, गाढवांच्या, बैलांच्या, कुत्र्यांच्या शर्यती लावू लागला. त्या निमित्ताने हे प्राणी माणसाळले. एकदा हे प्राणी माणसाळल्यावर त्यांच्याकडून चार खेळ करवून घेणे हे त्याला हळूहळू जमू लागले. हे जमल्यावर मग एकाच प्रकारचे प्राणी बाळगण्याऐवजी चार वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बाळगून त्यांचे खेळ करण्याची कल्पना त्याला आली आणि त्यातून सर्कशीचा जन्म झाला. सर्कशीत विदुषकांचे खेळ असतात, मृत्युगोलातील खेळ असतात, उंचावरून मारलेल्या उडय़ा असतात, पण सर्कशीचा प्राण असतो तो प्राण्यांच्या खेळात.
प्राण्यांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी करवून घेणे ही सुलभ गोष्ट नाही. कारण माणसासारखे प्राण्यांचेही वेगवेगळे मूड्स असतात. पुन्हा प्राणी केव्हा हिंस्र होतील हे सांगणे अवघड असते. प्राण्यांकडून खेळ करवून घेणाऱ्याला रिंग मास्टर म्हणतात. त्याच्या हातातील चाबकाच्या तालावर तो खेळ करून दाखवतो. प्रसंगी त्याला चाबकाची भीती दाखवून खेळ करून घ्यावे लागतात. पण हेही काही एका मर्यादेतच. प्राणी हिंस्र न बनता त्यांच्याकडून खेळ करवून घेणे कौशल्याचे काम असते. त्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या सवयी, मूड्स माहीत असणे गरजेचे असते. गवयाला जसा कार्यक्रम नीट व्हावा म्हणून रियाझ करावा लागतो, तसे या रिंग मास्टरला जे खेळ सर्कशीत दाखवायचे त्यांची तालीम प्राण्यांकडून रोज करवून घ्यावी लागते, तरच सर्कशीत खेळ करून दाखवता येतात.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा