‘ऑपेरा हाऊस, वासना, एक राज, लागी नाही छुटे राम, गंगा की लहरं, बेजुबान’ यापैकी कोणताही सिनेमा पाहिलेला नाही, हे सिनेमा आम्ही शाळा-कॉलेज चुकवून बघितलेत, असं सांगणारेही भेटलेले नाहीत. दीज नेम्स मीन नथिंग टु मोस्ट पीपल. खरंय की नाही मित्रा? आता गाण्यांची ही यादी वाच.
– छेडो ना मेरी जुल्फें, सब लोग क्या कहेंगे.. किशोर लता.
– देखो मौसम क्या बहार है.. मुकेश-लता
– मैं सदके जाऊं, मोरे सैंया.. लता
– दीवाने तुम, दीवाने हम.. लता
– उठेगी तुम्हारी नजर धीरे धीरे.. लता
– अजनबी से बनके करो ना किनारा.. किशोर
– बागों में खिलते हैं फूल.. तलत, लता
– अगर सुन ले ये इक नगमा.. किशोर
आणि बलमा, माने ना, बैरी चूप न रहा..
ऑपेरा हाऊस लता.
मित्रा, तू ही गाणी ऐकली नसशील तर तुला बेदर्दी म्हणावं लागेल.
अस्सल नायाब गाणी, फ्रॉम गोल्डन इरा या सगळ्या गाण्यांत आणि सिनेमांना जोडणारा संगीत दिग्दर्शक होता ‘चित्रगुप्त.’
सुमधुर चाली, मोजका वाद्यमेळ, शास्त्रीय संगीताची जमकर बैठक गोड शब्द म्हणजे चित्रगुप्त.
सुदैव म्हणू की दुर्दैव, कळत नाही, पण त्या काळात शंकरजयकिशन, बर्मनदा, मदनमोहन, ओपी नय्यर छा गये थे. लक्ष्मी प्यारे आणि कल्याणजी आनंदजी आपलं बस्तान बसवत होते, रवी पंजाबी तालावर बढिया से बढिया गाणी देत होते. त्या काळात चित्रगुप्त, लता, रफी, मुकेश आणि किशोरना घेऊन ऐकून ऐकून कानांना डायबेटिस होईल असं संगीत देत होते. सुदैव हे की त्या कालौघात ते इतरांइतके तेव्हा चमकले नाहीत. थोडे विस्मृतीच्या पडद्याआड गेले. सुदैवानं ते गाणी बनवत गेले.
चित्रगुप्तांचे चित्रपटदेखील साधारण पडेल आणि ‘बी’ ग्रेड टाइप. आज त्यांची गाणी ऐकताना तो ‘इरा’ डोळ्यांसमोर उभा राहतो. लतादीदींच्या आवाजाचा अत्यंत गोडव्याचा तो काळ. त्यांच्या गाण्यांची तुलना करण्याचा महामूर्खपणा करून असं म्हणावंसं वाटतं की चित्रगुप्त यांच्या गाण्यात दीदींचा आवाज सर्वात सुंदर लागला. नाजूक तरीही शार्प, कोवळा तरी मॅच्युअर, साधा भोळा अगदी त्या काळातल्या हिरॉइनना शोभणारा. पटत नसेल तर, बलमा माने ना, बैरी चूप न रहे, लागी मन की कहे, पाकी अकेली मोरी बैंया धरे. बलमा हे गाणं ऐक, पाहिलंस तरी चालेल, बीसरोजा देवीचं नृत्य पाहता येईल.
हुरहुर लागते रे मित्रा, अशी गाणी ऐकली की, काळीज कातरतं, आणि असं वाटतं. ये परबतों के दायरे और ये शाम का धुआँ, ऐसे में क्यूं न छेड दे दिल की दास्तां.
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा