जीनिव्हा परिषदेत ठरल्याप्रमाणे व्हिएतनाम एकीकरणासाठी जनमत घेण्याचे दिएम हा दक्षिण व्हिएतनामचा पंतप्रधान टाळाटाळ करू लागला व अमेरिकेनेही त्याला निवडणुका रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे हो चि मिन्हने दक्षिण व्हिएतनाममधील क्रांतिकारकांच्या गनिमी कारवाया अधिक तीव्र केल्या. इकडे उत्तर व्हिएतनाममध्ये लालचीन व सोव्हिएत युनियन या दोघांकडून लष्करी मदतीचा ओघ सुरू झाला. त्यामुळे यापुढे व्हिएतनाम युद्ध हे उत्तर व दक्षिण व्हिएतनाममधील युद्ध न राहता कम्युनिस्ट राष्ट्रे विरुद्ध भांडवलशाही राष्ट्रे असे त्याला स्वरूप आले. दिएमच्या भ्रष्टाचारी राजवटीमुळे दक्षिण व्हिएतनाममध्ये आधीच असंतोष होता. हो चि मिन्हने दिएम राजवटीबद्दल आणखी अपप्रचार करून आपले राष्ट्रीय मुक्ती आघाडी व व्हिएतकांगी सैनिक सायगावमध्ये पाठविले.
अध्यक्ष केनेडी यांनी १९६२ साली प्रथम ४००० अमेरिकन सैन्य सायगावला पाठविले व नंतर अमेरिकेतून सैनिकी फौजा पाठविण्याचा ओघ सुरू झाला. पंतप्रधान दिएम याने दक्षिण व्हिएतनाममध्ये बौद्ध भिक्कूंचे मोठय़ा प्रमाणात शिरकाण केल्याने सायगावमधील परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यातून दिएमचा खून झाला. त्याच दरम्यान अध्यक्ष जॉन केनेडी यांचाही खून होऊन जॉन्सन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. जॉन्सन यांनीही वाटाघाटींचा घोळ चालू ठेवला. १९६९ साली निक्सन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले. अमेरिकेचे नूतन सेक्रेटरी ऑफ स्टेट हेन्री किसिंजर यांची नुकतीच नेमणूक झाली होती. अखेर पॅरिसमध्ये २७ जानेवारी १९७३ रोजी युद्धबंदी व शांतता करारावर उत्तर व दक्षिण व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री विल्यम रॉजर्स यांच्या सह्य़ा झाल्या. या करारात ठरल्याप्रमाणे व्हिएतनामचे स्वातंत्र्य व दोन्ही भागांचे एकत्रीकरण केले गेले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा