मानस, तुझ्या नादी लागलं ना की, बोलायचे महत्त्वाचे मुद्दे राहून जातात. तेव्हा स्ट्रेट प्रश्नाना स्ट्रेट उत्तरं दे आणि शंका समाधान कर. खरं-सांग, स्मरणशक्ती खंगून जाणे म्हणजे ‘डिमेन्शिया’ का?
‘नाही रे, स्मरणशक्ती क्षीण होणे हे डिमेन्शिया रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. पण मित्रा, ते एकमेव नव्हे. ती खूप जटिल आणि गुंतागुंतीची समस्या आहे. त्याचे अचूक निदान वरपांगी नसतं. ते काम प्रोफेशनल व्यक्तीनेच करावं.’ मानस शांतपणे म्हणाला. पण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा आणि आपल्याला जाणवणारा विसराळूपण किती गंभीर आहे किंवा किती सीरियसली घ्यावा यावर चर्चा करणं निकडीचं झालंय ते सांगतो. मानस, अगदी हाच प्रश्न विचारायचा होता. मी यावेळी प्रश्नांची यादी केलीय.
नंतर आठवतं!
आपल्याला एखादं नाव, प्रसंगाची तारीख आणि काही संदर्भ झटकत आठवत नाहीत. थोडय़ा वेळात डोकं खाजवून किंवा संदर्भातले इतर बारकावे शोधल्यावर लगेच आठवतं. हे नॉर्मल आहे का?
मानस : येस, नॉर्मल. नक्कीच. मेंदू ओव्हरलोडेड असेल किंवा अगदी रिकामटेकडा असेल तर असं होतं. स्वाभाविक आहे. विशेषत: अपरिचित किंवा नित्य संदर्भातून तुटलेलं नाव आठवलं नाही तरी ते नॉर्मल मानता येतं.
मग अॅबनॉर्मल काय?
मानस : नित्य परिचयातील व्यक्ती, ताजे संदर्भ नेहमीच्या ठिकाणं यांच्या आठवणीत अडथळा आल्यास ते विचारात घ्यायला हवं. स्मृतिभ्रंशात ताजे संदर्भ, परिचित नावं आणि नाती यांच्यात गोंधळ होतो. खूप जुन्या आठवणी अधिक लक्षात राहातात. काळाचे संदर्भ तुटल्याने स्मरणात गडबड होते.
स्मरणखुणांचा उपयोग-
एखादी गोष्ट आठवण्याकरता मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारे सांकेतिक खुणा असतात. त्या खुणा मेंदू आपोआप तयार करतो. उदा. एखाद्या व्यक्तीचं नाक लांब असेल तर मेंदू ‘लांबनाक्या देशपांडे’ अशी स्मरणखुण तयार करतो. मग देशपांडे नाव आठवण्याकरता, ‘लांब नाकाचं’ चित्र आठवलं तरी पुरतं. अशा स्मरणखुणा ताज्या करून दिल्या तरी देशपांडे नाव आठवत नाही. उलट ‘लांब नाकाचा’ इथे काय संबंध? असा प्रश्न निर्माण होतो. तसं झाल्यास ते अॅबनॉर्मल ठरतं. स्मरणखुणांचा प्रभावी वापर करीत राहाणं या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. मेंदूमधली काही कनेक्शन विरल्यास स्मरणशक्तीची मालिका खंडित होते. म्हणून असं घडतं.
तत्कालीन (इमिजिएट) स्मरण-
अनेकदा, घरातली कामं करताना एखादं काम करण्यासाठी म्हणून आपण बेडरूममध्ये जातो. रेफ्रिजरेटर उघडतो. पण खोलीत गेल्यावर अथवा कपाट उघडल्यावर आपण ही कृती का केली? असा प्रश्न पडतो. गोंधळल्यासारखं वाटतं. ‘बावळटच आहे मी!’ असे उद्गार निघतात. घटना ‘नॉर्मल’ मानल्या जातात. मेंदूवर ओवरलोड असल्याने चित्त एकाग्र नसतं. त्यामुळे असं घडतं. ही स्मरणशक्तीची समस्या नाही तर ‘स्कॅटर्ड माइण्ड ‘विखुरलेलं लक्ष’ यामुळे उद्भवते. मेंदूमध्ये ‘इव्हेंट मेमरी’ नावाचा प्रकार असतो. एखादी कृती करीत असताना, दुसरी कृती सुरू केली तरी मेंदू पूर्णपणे दुसऱ्या कृतीत शिरत नाही. पहिल्या अॅक्शनमध्ये अडकून राहतो. मेंदू ‘क्लोझर’ साधण्याच्या प्रयत्नात दुसरी कृती दुर्लक्षित ठेवतो म्हणून असा गोंधळ होतो.
मग अॅबनॉर्मल काय? स्मरणभ्रंशामध्ये अशा घटना क्षणोक्षणी घडतात. पहिलं कामदेखील आठवत नाही. आपण कुठे आलोत हेच आठवत नाही.
मानस, थँक्यू. अजून प्रश्न आहेत. उद्या विचारतो. नक्की.
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
मनमोराचा पिसारा.. हे ‘नॉर्मल’ आहे? ( स्मरण-विस्मरण, भाग २)
मानस, तुझ्या नादी लागलं ना की, बोलायचे महत्त्वाचे मुद्दे राहून जातात. तेव्हा स्ट्रेट प्रश्नाना स्ट्रेट उत्तरं दे आणि शंका समाधान कर. खरं-सांग, स्मरणशक्ती खंगून जाणे म्हणजे ‘डिमेन्शिया’ का? ‘नाही रे, स्मरणशक्ती क्षीण होणे हे डिमेन्शिया रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. पण मित्रा, ते एकमेव नव्हे. ती खूप जटिल आणि गुंतागुंतीची समस्या आहे.
First published on: 05-12-2012 at 06:18 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet