ऑपरेशन थिएटरमध्ये र्निजतुकीकरण सर्वात महत्त्वाचे. हे शास्त्रीय पद्धतीने केले जाते व तपासले जाते. ऑपरेशन थिएटरला आत-बाहेर करायला दोन दारांची पद्धत असते, म्हणजे बाहेरची हवा परस्पर आत जात नाही. थिएटरमध्ये जाण्याअगोदर पादत्राणे बाहेर काढावी लागतात व आत जाण्यासाठी वेगळी पादत्राणे असतात. कपडे बदलायला वेगळी खोली असते. आत जाणाऱ्या सर्वानी आपले कपडे बदलून र्निजतुक केलेले कपडे, डोक्यावर व तोंडावर मास्क आणि हातात हातमोजे घालून थिएटरमध्ये प्रवेश करायचा. हे, वापरा व फेका (डिस्पोजेबल) या पद्धतीचे असतात. थिएटरमध्ये सर्व स्टाफ अशा पद्धतीने र्निजतुकीकरण झालेल्या कपडय़ातच वावरत असतो. दिवे हिरव्या व र्निजतुकीकरण झालेल्या कव्हरमध्ये गुंडाळलेले असतात. ऑपरेशन थिएटरमध्ये वातानुकूलन असते, त्यामुळे दारे-खिडक्या बंद असतात व बाहेरची हवा आत येत नाही.
होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व उपकरणे एका ट्रॉलीवर र्निजतुकीकरण केलेल्या कापडावर क्रमवारीने लावलेली असतात. सर्जनना लागतील तशी ती उपकरणे त्यांचे साहाय्यक देतात. वापरून झाल्यावर ती उपकरणे पुन्हा त्याच ठिकाणी ठेवतात. म्हणजे ऑपरेशन झाल्यावर सर्व उपकरणे जागेवर असल्याची नोंद होते.
ऑपरेशन करताना रक्तस्राव थांबवायला, पोटातील आतडी झाकायला गॉजचे स्पंज वापरतात. त्यांच्या एका टोकाला नाडी शिवलेली असते व नाडीच्या टोकाला चिमटा लावलेला असतो. ऑपरेशन संपल्यावर हा स्पंज पोटातून काढून बादलीत टाकतात व शेवटी त्या स्पंजचीही मोजणी होते. सर्व बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच पोट बंद करतात. ही खात्री विशेषत: छाती, पोट यांसारख्या पोकळीच्या शस्त्रक्रियेबाबत करावी लागते. पूर्वी काही शस्त्रक्रियेत स्पंज राहिल्याच्या केसेस झाल्या.
ऑपरेशन टेबलावरून रुग्णाला ट्रॉलीवर ठेवताना फार जपावे लागते. रुग्ण अर्धवट शुद्धीवर असतो, त्यामुळे स्नायूंमध्ये ताण निर्माण होत नाही व रुग्णाकडून साहाय्य मिळत नाही. त्याला उचलून हळूहळू सरकवत ट्रॉलीवर आणावे लागते. त्या वेळी सलाइन, रक्ताच्या नळ्या जपाव्या लागतात. तसेच ऑक्सिजनचा मास्कही सांभाळावा लागतो. ट्रॉलीवरून वॉर्डमधल्या बिछान्यावर ठेवतानाही हीच कसरत करावी लागते.
डॉ.शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी,मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा