मनमोराचा पिसारा.. मेंदू म्हणजे ग्रंथालय
मित्रा, परवा गप्पा मारता मारता म्हणालास की, तुझ्या काकांची स्मरणशक्ती एखाद्या विश्वकोशासारखी आहे. जुनीपानी, नवी नि आधुनिक माहिती साठवलेलं ते चालतंबोलतं पुस्तक आहेत. तुला त्यांच्या या अफाट क्षमतेविषयी आदर वाटला आणि किंचित हेवाही वाटला, होय ना? आपल्याला दोन गोष्टींचं अफाट कौतुक वाटतं. पहिली गोष्ट कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दुसरी अचाट स्मरणशक्ती. कसं काय जमतं बुवा तुम्हाला? ‘अरे xxx, मला तर बायकोने सांगितलेल्या चार गोष्टी आठवत नाहीत. घरी गेल्यावर थापाथापी करून वेळ मरून न्यावी लागते आणि काकांना मात्र त्यांच्या लग्नात कोण कोण आलं होतं, याची इत्थंभूत माहिती असते! मित्रा, अचंबित वाटणं सोडणार असशील तर मेंदू आणि स्मरणशक्तीच्या रहस्याबद्दल गमती सांगायच्या आहेत. तुझ्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत, तशा विद्यार्थीवर्गासाठी मोलाच्या आहेत. तेव्हा काळजीपूर्वक वाच.
खरं म्हणजे, सुरुवातीला ‘स्मरणकोश’ हा शब्द वापरलास ना, तो चुकीचा आहे. आपल्या आठवणी किंवा स्मरणात ठेवलेल्या, राहिलेल्या, साठविलेल्या गोष्टी ग्रंथासारख्या नसून, एखाद्या ग्रंथालयाप्रमाणे असतात. ग्रंथालयातला ग्रंथपाल तू मागितलेलं पुस्तक पटवून आणून देताना पाहिलं असशील. उत्तम रीतीने चालविलेल्या ग्रंथालयातल्या आणि तत्पर, सावध (अॅलर्ट) ग्रंथपालाला हे सहज शक्य होतं. पुस्तकाचं नाव, लेखक किंवा विषय सांगितलं तर पुरतं.. पुस्तक झटकन काऊंटरवर आणून ठेवलं, असं समज. हे कसं काय शक्य होतं? याचा आपल्या स्मरण साठवणीशी काय संबंध?
ग्रंथालयात पुस्तकं साठविण्याची विशिष्ट पद्धत असते. लेखकाचे नाव, विषयाचा प्रकार आणि त्याचे विशिष्ट ‘कोड’ किंवा संकेत असतात. उदा. कादंबऱ्यांचा संकेत क्रमांक ‘८२३’. मग श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी म्हणजे ‘एसएनपी’. कादंबरीचे नाव ‘गारंबीचा बापू’. याचा संकेत ‘जीबी’ ८२३ क्रमांकवाली सगळी पुस्तकं ८ व्या शेल्फमध्ये आहेत. त्या शेल्फवरली पुस्तकं लेखकाच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार लावलेली आहेत. लेखकाच्या संचातली पुस्तकं, त्यांच्या नावाच्या आद्याक्षराप्रमाणे एकापाठोपाठ लावलेली आहेत. आठव्या शेल्फची जागा दुसऱ्या दालनातल्या तिसऱ्या रांगेत आहे. म्हणजे मित्र, विशिष्ट पुस्तक, ग्रंथालयात कुठे ठेवलेलं आहे, याची इत्थंभूत माहिती चार-पाच अक्षरांत नि आकडय़ांत ठेवलेली असते. पुस्तकं चटकन सापडण्याकरिता त्यांना विशिष्ट संकेत आधी देणं नि त्यानुसार त्यांची मांडणी करणं अत्यावश्यक असतं. ग्रंथपालाला घोकंपट्टी करावी लागत नाही. ते शक्यही नसतं. ग्रंथपाल सजग आणि तत्पर असणे आवश्यक आणि त्यानं पुस्तकात रस घेणंही गरजेचं.
अगदी त्याच पद्धतीने आपण आपल्या स्मरण साठवणीत माहिती ठेवतो. माहितीचं रजिस्ट्रेशन, संकेत देणं हे काम आपला सजग आणि तल्लख मेंदू करतो. त्याला ते बिनबोभाट करू द्यावं. तू उगीच घाई करतोस, आठवते की नाही, याची चिंता करतोस, वाचताना, माहिती गोळा करताना लक्ष देत नाहीस म्हणून विसर पडतो. आता हे तुझ्या दहावी-बारावीतल्याच नाही तर केजीमधल्या मुलांना सांग. समजावून..!
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा