‘निसर्गा’चा स्वभाव असा आहे की तो सगळंच सुमडीत करतो! बंगालच्या उपसागरात हवेच्या दाबाचे पट्टे कमी-जास्त होतात, तर कधी हिमालयात बर्फवृष्टी होते, असली जुगाडं करून निसर्ग हवामान, पाऊसपाणी, थंडी, उन्हाळा-पावसाळा यांचा अनियमितपणा नियमित करतो. आपण भाबडेपणाने ‘नेमेचि येतो मग पावसाळा’, नाही तर ‘हिवाळा, उन्हाळा’ अशी कविता करतो.
निसर्गाचा हा सारा खिलवाड गोड मानून घेतो. म्हणून मर्ढेकर ‘पितात सारे गोड हिवाळा’ असा कवितेचा चरण लिहून मोकळे होतात. हिवाळा पिणारा कोण रस्ता, माणूस की मुंबईतली माणसं या विषयी विचार करीत बसतो. अजून ‘माघ’ महिना लागायचाय. तरी अचानक थंडी पडल्याने रेडिओवरले आरजे माघ मास पडली थंडी, धनी गेले हो परगावा, मुक्कामाला ऱ्हावा पावनं, मुक्कामाला ऱ्हावा. अशी झक्कास चटोर लावणी येता-जाता वाजवत आहेत.
पावसाचं धोंगडं अलीकडे पाण्याविना दुष्काळात भिजत पडतं. त्यावर हवामान खातं आपल्याला सांगतं की अहो हे बरोबरच आहे! अमुक-तमुक समुद्राखालून प्रवाह वाहतो, कोणी तरी बाष्प चोरून नेतं. असली थोर ‘सायंटिफिक’ रीझनं दिल्यामुळे आपण ‘असेल बुवा’ असं मनात म्हणून गप्प राहतो. ‘पावसाळ्यात पाऊस वेळेवर पडला पाहिजे’ ही आधुनिक अंधश्रद्धा असल्याचं हळूच लक्षात येतं. गंमत वाटते मित्रा, माणूस या प्राण्याची. सृष्टीचे नियम शोधायचे. अशा नियमांप्रमाणे जगरहाटी चालते असा दावा करायचा. मग नियमातले अपवाद आढळले की म्हणायचं, अर्थात नियम अपवादाने सिद्ध होतात! कोणी तरी थोर वैज्ञानिक मग सगळं उलटं पालटं करतो. न्यूटनने मांडलेले नियम अबाधित, अचल बिंदूपासून सुरू होणाऱ्या विश्वासंबंधी आहेत असं म्हणणारे आइन्स्टाइन पुढे येतात. ‘जग सारे सापेक्ष, सापेक्ष’ असा मंत्र देतात. त्यानंतरचे शास्त्रज्ञ म्हणतात, आइन्स्टाइनचा दावा मुळातच सापेक्ष आहे. चला म्हणजे, पुन्हा पहिल्यापासून चूल मांडा..
निसर्ग माणसाला ‘पनेसार’ छाप स्पिन टाकतो आणि काही समजायच्या आत आपण नव्या संशोधनाच्या ‘पॅव्हेलियन’मध्ये सुसाट परततो.
सृष्टीचा नियम एकच ‘संशोधन थांबवू नका. सातत्याने नव्या गोष्टींचा शोध घ्या. जुन्या प्रस्थापित सत्यांना कवटाळू नका.’ निसर्गविज्ञानातलं संशोधन ‘क्षितिजरेषा गवसण्यासारखं असतं. अमुक ठिकाणी क्षितिज भेटेल असं वाटून सरसावून पुढे व्हावं, तो ती रेषा पुढे सरकलेली असते. यात गंमत अशी असते की क्षितिजरेषेचा थांग लागो की न लागो, वाटेत खूप काही नव्यानं सापडतं. जो शोधायला जातो, ते मिळण्याऐवजी, आणखी काही तरी नव्यान सापडतं.’
चार दिवस थंडीचे काय आले, मित्रा, मनात नव्या विचारांची वावटळ उठली. निसर्गाविषयी अचंबा वाटला. अचंबा वाटता वाटता, मनात चिंतन सुरू झालं. जिज्ञासा जागृत झाली. मन उल्हसित झालं. मनमोराचा पिसारा खुलतो तो असा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा