ऐतिहासिक दस्तऐवजात नोंद झालेली जगाच्या इतिहासातील सर्वात जुनी, कर्तृत्ववान स्त्री म्हणून ‘हॅटशेपसूट’ या इजिप्तच्या राणीचे नाव घेता येईल. तिचा जन्म इ.स. पूर्व १५०८ तर मृत्यू इ.स. पूर्व १४५८ मधील. म्हणजेच हॅटशेपसूट राणी साडेतीन हजार वर्षांपूर्वी होऊन गेली. इजिप्तच्या अठराव्या राजघराण्यातील ती पाचवी फेरो. हॅटशेपसूट ही फेरो तुथमास पहिल्याची मुलगी. तुथमास पहिला मृत्यू पावल्यावर त्याचा मुलगा तुथमास दुसरा याच्याशी हॅटशेपसूटचे लग्न झाले. तुथमास हा हॅटशेपसूटचा सावत्र भाऊ. त्या काळात इजिप्तमध्ये राजपुत्राने मोठय़ा बहिणीशी लग्न करण्याची प्रथा होती. या प्रथेप्रमाणे क्लिओपात्राचेही लग्न तिच्या लहान दोन भावांशी लागले होते. फेरो तुथमास दुसऱ्याचा राज्यपदावर बसल्यावर थोडय़ाच काळात मृत्यू झाला. त्याच्यानंतर घराण्याचा वारस म्हणून हॅटशेपसूटचा अल्पवयीन पुतण्या तुथमास तिसरा फेरो झाला. तुथमास हा नावालाच फेरो होता व हॅटशेपसूटच सर्व राज्यकारभार पाहात होती. इ.स. पूर्व १४७३ ते १४७९ अशी सात वर्षे तुथमास तिसरा हा फेरो असताना हॅटशेपसूट हीच कारभार चालवत होती. इ.स. पूर्व १४७९ मध्ये तिने पुतण्या फेरो तुथमास तिसऱ्याला झुगारून दिले व स्वयंघोषित फेरो झाली. तिने फेरो झाल्यावर प्रथम त्यांचे धर्मगुरू व मंदिराचे पुजारी यांना पटवून दिले की, तिच्यात दैवी गुण आहेत व राअमून या देवाच्या इच्छेमुळे मी फेरो झाली आहे. त्यासाठी तिने असे सांगायला सुरुवात केली की हॅटशेपसूटच्या जन्माच्या वेळी तिच्या आईच्या स्वप्नात राअमून देवाने येऊन सांगितले की, ‘तुझ्या पोटी आता विशेष दैवी गुण असलेली मुलगी जन्माला येईल. ती माझी आवडती मुलगी असेल व ती पुढे इजिप्तचा राजा होईल. ती उत्तर व दक्षिण इजिप्तची राजा होऊन इजिप्तच्या सर्व भूमीवर राज्य करील.’
इतिहासात आज दिनांक.. -२३ नोव्हेंबर
१८७२ पत्रकार व नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्यासाठी टिळक युगात प्रयत्न केले.
१८७८ किंग अर्नेस्ट जोसेफ यांचा जन्म. दुसऱ्या महायुद्धात ते अमेरिकेचे नौदल प्रमुख होते. महायुद्धातील कामगिरीबद्दल त्यांना शौर्यपदक मिळाले.
१९३७ ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हा शोध लावणारे संवेदनशील शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे निधन. त्यांचा जन्म १० नोव्हेंबर १८५८ ला पश्चिम बंगालच्या विक्रमपूर जिल्ह्यातील राणीखल गावी झाला. कोलकाता आणि इंग्लंड येथे त्यांचे शिक्षण झाले. शिष्यवृत्तीच्या जोरावर केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी निसर्गविज्ञान विषयात पदवी मिळविली. याच काळात त्यांनी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र यांचाही कसून अभ्यास केला. जगत्विख्यात शास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांच्या संपर्कात ते आले. १८८५ मध्ये ते प्रेसिडेन्सी कॉलेजात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक या पदावर जाणारे ते पहिले भारतीय होत. १८९५ मध्ये सूक्ष्म तरंगलांबी असणाऱ्या रेडिओ तरंगांच्या प्रकाशसदृश गुणधर्मासंबंधीने केलेल्या संशोधनाने त्यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. या कामामुळे ‘घन अवस्था भौतिकशास्त्र’ विषय पुढे जाण्यास मदत झाली. वनस्पतींच्या अतिसूक्ष्म हालचालींची, वर्तनाची नोंद घेण्यासाठी ‘क्रेस्कोग्राफ’ हे उपकरण त्यांनी बनविले. रिस्पॉन्स इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, प्लँट रिस्पॉन्स अॅज ए मीन्स ऑफ फिजिऑलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन, द मेकॅनिझम ऑफ प्लँटस हे त्यांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.
डॉ. गणेश राऊत -ganeshraut@solaris.in
कुतूहल-विजेच्या तारा
वीज वाहून नेण्याची क्षमता, त्या कुठे वापरायच्या ती जागा व तेथील वातावरण या सर्वाचा विचार करून कोणत्या आवरणाच्या वायर्स वापरायच्या ते ठरविले जाते. योग्य निवड म्हणजे सुरक्षितता होय.
१) पॉलिव्हिनल क्लोराइड ऊर्फ पीव्हीसी वायर्सवर पॉलिव्हिनल क्लोराइडचे आवरण असते. हे आवरण अत्यंत मजबूत तर असतेच पण त्याच्यावर अॅसिड, अतिनील किरण किंवा सूर्यप्रकाश यांचाही लक्षात येण्याएवढा परिणाम होत नाही. हे आवरण थर्मोफ्लॅस्टिकचे असते. या वायर्स भिंतीवरून न नेता त्या नळीतून पाठवतात. व्हीआयआर वायरपेक्षा या वायरचा इन्शुलेशन रेझिस्टन्स तुलनात्मकदृष्टय़ा कमी असतो. पण या वायरवर हवेतील बाष्पाचा परिणाम होत नाही.
२) काही वायरींवर शिशाचे आवरण देतात. हवेतील बाष्पाचा त्यावर काही परिणाम होत नाही, उलट शिशामुळे ही वायर मजबूत बनते. या वायरचा उपयोग टेलिफोन वायरिंग आणि मीटर बोर्डाच्या वायरिंगसाठी करतात. यामध्ये सिंगल कोअर, टू कोअर असे प्रकार मिळतात.
३) वेदरप्रूफ वायर्स ऊन, पाऊस, सूर्यप्रकाश या सर्व प्रकाराला पुरून उरतात. त्यामुळे घराबाहेरच्या कामासाठी यांचा सर्रास वापर होतो. यात वेगवेगळय़ा जाडीच्या व संख्येच्या वायर्स (स्ट्रंड्स) मिळतात. या प्रकारच्या वायरीत इंडिया रबर व कटिंग फॅब्रिक अथवा एम्पायर टॅप अशी आवरणे असतात.
४) बेअर कॉपर वायरवर कोणतेही आवरण नसते. या वायरचा उपयोग ओव्हरहेड लाइन्स व अìथगच्या कामासाठी करतात. यामध्ये पुष्कळ आकार येतात.
५) फ्लेक्झिबल वायर्समध्ये सिल्क कव्हर, कॉटन कव्हर किंवा फ्लॅस्टिक कव्हर असे विविध प्रकार येतात. यात खूप निरनिराळे रंग येतात. फ्लॅस्टिक फ्लेक्झिबल वायर्सना टीनिंगची जरुरी नसते. कारण वायरवर फ्लॅस्टिकचे आवरण असल्यामुळे सल्फेशनची भीती नसते. ही वायर अत्यंत लवचिक असते. यामध्ये बऱ्याच तारा असतात त्यामुळे एकच जाड वायर असण्यापेक्षा ही अधिक मजबूत असते. यातली एखादी वायर तुटली तरी प्रवाह बंद पडत नाही. हलवाव्या लागणाऱ्या गोष्टींसाठी व तात्पुरत्या वायरिंगसाठी या वायर्स वापरतात.
अनंत ताम्हणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई २२
office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा.. – मी असा का?
मानस, मला नेहमी एक साधा प्रश्न सतावतो. ‘मी असा का?’ म्हणजे मी असा का वागतो? माझा स्वभाव चिडका का? मला सगळ्या गोष्टींची भीती का वाटते? मला सातत्याने भविष्याची चिंता का वाटते? मी.? मानसनं हाताचा पंजा दाखवून मला थांबवलं. ‘तू एकच प्रश्न विचारणार होतास ना? इतके प्रश्न कशाला उपस्थित केलेस? खरं म्हणजे मित्रा, तुझा पहिलाच प्रश्न अतिशय बोलका आहे. त्या एका प्रश्नाचं उत्तर सापडलं तरी खूप झालं. आपण असे का? याचं कारण सापडलं तर पुढे स्वत:साठी, आणि स्वत:वर काही तरी उपाय करू शकतो.’ त्याला थांबवून मी म्हटलं, ‘अरे, मी जास्त प्रश्न विचारत नाहीये. मला असं विचारायचंय की माझा स्वभाव अमुक असा का? याविषयी उत्सुकता वाटते. म्हणजे माझा स्वभाव आनुवांशिक आहे की माझ्यावर कळत नकळत झालेल्या संस्कारामुळे तसा झालाय? मी मुळात असाच? की मी असा घडलो म्हणून असा? याचा मला शोध घ्यायचा आहे. याचं मला उत्तर हवंय. मानस विचारात पडला आणि म्हणाला, ‘मित्रा यु हॅव आस्कड् अ मिलियन डॉलर क्वेश्चन!’ या प्रश्नाचं नेमकं, अचूक आणि समग्र उत्तर मिळालेलं नाही. या प्रश्नाला अनेक उत्तरं आहेत. त्यामुळे काही तरी ढोबळमानाने सांगता येईल. या उत्तरांमध्य एक खास भारतीयपणा आहे. म्हणजे आपल्या समाजात स्वभाव आपण ज्या राशीत जन्मला आलो, त्यावर ठरतो, असं मानणारे बरेच लोक आहेत. मी अमुक राशीत जन्माला आलो म्हणून भांडकुदळ. मी तमुक राशीतला म्हणून संशयी, आणि जन्मराशी म्हणजे आजन्म आपल्याबरोबर बाळगायचे ‘लेबल’ असते. आपले पालक कोणाला तरी विचारून आपली राशी जाणून घेतो आणि मग मी असा का? हा प्रश्न आपण विचारण्या आधीच आपल्या कपाळावर ते स्वभावाचा शिक्का मारून मोकळे होतात. ‘बाळा, तू मकरराशीचा, तू वृश्चिक, तू कन्या इ. लहानाचे मोठे होताना आपल्या कृतीचा अर्थ लावण्यासाठी पालकांना एक हत्यार मिळतं. ‘तू’ पुढे पुढे तू मकर राशीचा म्हणजे असंच वागायचास! (तू तरी काय करणार?) तुझ्या राशीला अमुक रास लागलीयस, यापुढे तू तुझ्या राशीनुसार भविष्य घडवणार किंवा बिघडवणार आपण विचारतो, पण या राशीनुसार आधीच ठरवून दिलेल्या स्वभावाचा मला आणि लोकांना त्रास होतो, त्याचं काय करायचं? त्यावर त्यांच्याकडे उत्तर नसते. ‘त्यामुळे अरे, आपल्या परंपरेत, शास्त्रात तसंच सांगितलंय ते कसं चुकीचं असेल? शिवाय तू तुझ्या राशीनुसार वागतो आहेस ना? येतोय की तुला त्या सत्याचा पडताळा? तेव्हा आपली राशी हा आपला भोग असतो. कोणी त्याला नशीब म्हणतात, कोणी डेस्टिनी. चल, आपण राशिभविष्यावर विनोदी कार्यक्रम बघू. त्यातल्या जुन्यापान्या जोकवर पोटभर हसू. झालं समाधान ना तुझं? तुला या जन्मीची राशी नको असल्यास, पुढच्या जन्मी यापेक्षा कोणती राशी हवी त्यावर चिंतन कर. तोपर्यंत तुझी राशी एन्जॉय कर. अरे, प्रत्येक राशीला एखादी चांगली बाजू असते. तिचा विचार कर! आता प्रश्न विचारू नकोस. मुकाटपणे आपापल्या कपाळावर मारलेल्या ‘राशी’च्या शिक्क्यानुसार मिळालेल्या स्वभावाप्रमाणे जगायला लाग.’ मानसनं लांबलचक उत्तर दिलं. ‘मी म्हटलं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, मला स्वत:मध्ये बदल करायचाय. मानस खदखदून हसून म्हणाला, ‘तुझ्या राशीत बदल व्हायचा असेल तर होईल!’ आणि राशी-बिशीच्या मनोरंजक गोष्टी सोड रे. महत्त्वाचा मुद्दा काय? तर माणसाच्या स्वभावामध्ये जन्मजात गुणसूत्र आणि संस्कार दोघांचं योगदान असतं. आणि बदलायचं ठरवलंस तर बदलता येतं.. आम्ही हसलो.!
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com