इंग्लंडहून परत आल्यानंतर पुण्यातली वडिलांची ससून रुग्णालयातील नेमणूक तात्पुरती होती. मला वाटते १९४९ मध्ये त्यांची बदली दक्षिणेत बिदरला झाली. झाले असे की, भारतातली संस्थाने हळूहळू बरखास्त होत गेली, परंतु हैदराबाद भारतात विलीन होण्यास तयार नव्हते, किंबहुना आम्ही पाकिस्तानात जातो इतक्या थरापर्यंत त्यांची मजल गेली. तेव्हा भारताला लष्करी कारवाई करून त्यांचा बीमोड करावा लागला. नेहरू ही कारवाई करण्यास राजी नव्हते, परंतु वल्लभभाई पटेल यांच्या आग्रहामुळे ती पोलीस कारवाई पार पडली. या धामधुमीच्या आधी तिथे रझाकार मंडळींनी निझामाच्या वतीने असे म्हणत मोठी हलचल माजवली आणि अनेक मुलकी आणि पोलीस केंद्रांवर हल्ले चढवले आणि त्याला धार्मिक धार चढवून अनेक धार्मिक स्थळांचा विध्वंस आरंभला. भारताच्या स्वारीने हे सगळे संपले. त्या स्वारीबरोबर जे वैद्यकीय पथक रवाना झाले त्यात माझे वडील होते. त्यांच्यापाठोपाठ आई, मी व माझा धाकटा भाऊ गेल्याचे आठवते. दिवसभर करणार काय म्हणून काही आठवडे मला एका उर्दू आणि कानडीमिश्र शाळेत बसवण्यात आले. सगळे अधिकारी दौरे काढत असत. हट्ट करून मी वडिलांबरोबर जात असे. अशाच एका दौऱ्यात मी एक भव्य देऊळ पाहिले. आतल्या मूर्तीचे हातपाय कापलेले होते. गंमत अशी की, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच देऊळ पाहत होतो आणि तेही असे. आमच्या घरातदेव, देवपूजा, उपास, व्रतवैकल्य यांचा मागमूसही नव्हता. त्या देवळाबद्दल वडील काही बोलले नाहीत तेव्हा ते प्रकरण तिथेच तसेच राहिले आणि पुढेही देवधर्माचा माझा संबंध अगदीच जुजबी राहिला आहे. देवांची भक्ती केल्याने जे होणार असते, घडते किंवा घडवले जाते त्यात बदल होतो, की भक्ती केल्याने जे घडते ते सहन करण्याची शक्ती वाढते, असले प्रश्न मी मनात घोळत राहतो. मी ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यावर आणि त्यावर लिहिल्यानंतर धार्मिक झालो आहे असा समज पसरण्यास मदत झाली आहे, परंतु ज्ञानेश्वरीतही ज्याला सर्वसामान्य लोक देव समजतात तो कुठे मला सापडला नाही.
सर्वव्यापी मी। तरी देतात मला स्थान।
कर्णहीन मी। मला काढतात कान।
डोळे देतात मला। जरी मी नेत्रहीन।।
‘देव नावाचा भ्रम’ असे स्फोटक नाव असलेले हॉकिंग्ज या लेखकाचे पुस्तक हल्ली मोठे लोकप्रिय झालेले दिसते. त्यात म्युरियल ग्रे या स्तंभलेखिकेचे एक विधान उद्धृत करण्यात आले आहे. त्यात ती म्हणते, ‘पूर, भूकंप, दुष्काळ, दारिद्रय़, अज्ञान, कुपोषण, अशा नैसर्गिक आपत्तींत जेवढे मृत्यू घडतात त्याच्या अनेक हजार पटींनी हत्या निरनिराळ्या देवांच्या पाठीराख्यांनी धर्मयुद्धाच्या निमित्ताने घडवून आणल्या आहेत.’
कुतूहल – सूरपाल कोण होता? (उत्तरार्ध)
सूरपालाने दूध, तूप, मध, तीळ, गाईचे शेण यांची बियाणांवर प्रक्रिया कशी करावी, अशी प्रक्रिया केलेली बियाणे उत्तम असतात, त्यामुळे झाडांना विपुल व उत्तम प्रतीची फुले, फळे येतात याबद्दलही सांगितले आहे.
दोन रोपांमध्ये ठेवलेल्या अंतराप्रमाणे निकृष्ट, सामान्य किंवा उत्तम प्रतीची झाडे उगवतात. अंतर जास्त ठेवल्यास रोपांना जोरदार वाऱ्यापासून धोका असतो. अंतर कमी ठेवल्यास पीक येत नाही. फुले व फळे देणारी झाडे मधोमध असावीत व बाकीची झाडे त्यांच्या सभोवती असावीत. याबरोबरच, रोपांसाठी खड्डा, रोपांचे स्थलांतर याबाबतही सूचना पेरणी पद्धत या भागात सूरपाल करतो.
पिकांचे पोषण खाद्य या भागात कोरडय़ा, दलदलीच्या व सामान्य जमिनीत पाणी कोणत्या ऋतूत कधी व किती वेळा द्यावे, औषधी वनस्पती तसेच प्राण्यांपासून पिकांसाठी पौष्टिक खाद्य कसे मिळवावे, याचे वर्णन आहे. डुकराची विष्ठा, हाडे, मांस, रक्त पाण्यात मिसळून जमिनीखाली साठवून, कुजवून कुणप हे द्रव खत तयार करण्याची पद्धत यात सांगितली आहे. द्रव खताची ही जगातील पहिली नोंद असावी.
झाडांना होणारे रोग हे अंतर्गत व बाह्य अशा दोन कारणांनी होतात. अंतर्गत रोग कफ, पित्त, वात या त्रिदोषांतील असंतुलनामुळे तर बाह्य रोग किड, हवामान यांमुळे होतात, अशी मांडणी सूरपालाने केली आहे. त्यांवरील प्रतिबंधक उपाय, मुळांवर प्रक्रिया, धुरी देणे अशीही चर्चा तो करतो.
याशिवाय विहीर कोठे खोदावी यासाठी काही नसíगक चिन्हांच्या नोंदी सूरपालाने केल्या आहेत. नसíगकरित्या उगवणाऱ्या झाडांच्या सात जातींची नोंदही त्याने केली आहे. ही झाडे जिथे असतील त्या ठिकाणी पीक घेण्याचा सल्ला तो देतो. आनंद उद्याने, उद्यानातील चमत्कार अशी आणखी काही प्रकरणेही सूरपालाने लिहिलेली आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा निकष लावता, वृक्षायुर्वेदातील अनेक गोष्टी पटण्यासारख्या नाहीत. प्रत्यक्ष प्रयोग करून त्यांची सत्यता पडताळून पाहाण्याची गरज आहे, पण साधारण हजारेक वर्षांपूर्वी शेतीसंबंधी आपल्याकडे काही विचारमंथन, चिंतन केले गेले होते, अनुमाने मांडली गेली होती, हेही नसे थोडके!
– प्रतिनिधी
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई- २२
office@mavipamumbai.org
आजचे महाराष्ट्रसारस्वत -१५ जानेवारी
१८७३ > दत्तात्रेय गोपाळ लिमये यांचा जन्म. ‘भारतीय युद्धकथा’ आणि ‘भारतीय उपकथा’ तसेच ‘सावित्रीचरित्र’, ‘भारतीय स्त्रिया : शकुंतला व दमयंती’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१८८६ > इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांचा जन्म. त्यांनी ‘बुंदेल्याची बखर’ फार्सीतून मराठीत आणली. भारत इतिहास संशोधक मंडळाने त्यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते.
१९०५ > ‘नवाकाळ’ या दैनिकाचे १९२९ ते १९६८ या काळातील संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचा जन्म. नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या या सुपुत्राने ‘संसारशकट’, ‘सदानंद’, ‘आजकाल’ या सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या.
१९३१ > कथालेखक प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म. श्रीशिल्लक, कॉग्ज, पूल, वास्तुपुरुष, जीवितधागे, एका जन्मातल्या गाठी आदी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठीतील समवयस्क ‘बंडखोर साहित्यिकां’पेक्षा अगदी निराळी, आयुष्याची गुंतागुंत समजून घेऊन त्यासोबतच जगायचे आहे हे मान्य करणारी प्रगल्भ कथा त्यांनी लिहिली.
– संजय वझरेकर
वॉर अँड पीस – आम्लपित्त : उपाययोजना
आम्लपित्तविकारग्रस्त रुग्णाने आज दुपारी एक वाजता जेवण केले तर; त्याचे लहान आतडय़ातील पित्ताचे स्त्राव बरोबर चार तासांनी ते अन्न पचविण्याकरिता आमाशयांत येतात व अन्न पचवितात. पण या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी जेवणाला तास दोन तास उशीर केला, की ते आदल्या दिवशीच्या हिशोबाने पाच वाजता आलेले पित्त पचवायला काही काम नाही म्हणून छातीत जाते, जळजळ व उलटीची भावना करते. या प्रकाराला आपल्या रोजच्या व्यवहारात एक गमतीदार समांतर उदाहरण आहे. आपण आपल्या घरात, दुकानात, धंदापाण्यात एखाद्याला कामाकरिता नेमले व त्याला वेळेवर काम दिले नाही तर तो चुगल्या, इतर खोडय़ा अशी गडबड करतो. असेच या पाचक पित्ताचे आहे. पाचकपित्ताला वेळेत व पुरेसे काम हवे म्हणजे आम्लपित्त हा विकार होत नाही व असलेला बळावत नाही. म्हणून ‘टाइम टू टाइम’ हा एक सोप्पा उपाय.
आपल्या अवतीभोवती गणेशभक्त खूप आहेत. श्री गणपती अथर्वशीर्षांच्या उत्तरार्धात – फलश्रुतीत ‘यो लाजैर्यजति, स यशोवान् भवति।’ असे लाह्यांचे महत्त्व सांगितले आहे. आम्लपित्ताचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भाताच्या-साळीच्या किंवा राजगिऱ्याच्या व कंटाळा आल्यास ज्वारीच्या लाह्या खाणे. लाह्या म्हणजे चुरमुरे नव्हे, कुरमुरे नव्हे हे रुग्ण मित्रांना सांगावे लागतेच. लाह्या या टीपकागदासारखे किंवा खडूसारखे पित्त टिपण्याचे चोख काम करतात. आम्लपित्ताकरिता दुसरे एक अत्यंत प्रभावी औषध म्हणजे ‘लघुसूतशेखर’. या गोळ्या जेवणाअगोदर तीन, तीन घ्याव्या. जेवणानंतर आम्लपित्त टॅबलेट तीन व प्रवाळ पंचामृत तीन किंवा सहा गोळ्या बारीक करून घ्याव्या. झोपताना त्रिफळाचूर्ण एक चमचा घ्यावे व शक्यतो आसवारिष्टे, तयार काढे टाळावे. कृश व पांडुता असणाऱ्या व्यक्तींकरिता ‘गोरखचिंचावलेह’ तीन चमचे आपल्या सवडीने घ्यावे. चहा, खूप तिखट, आंबट पदार्थ, चमचमीत पदार्थ व सर्व तऱ्हेची व्यसने टाळावी; हे मी सुजाण वाचकांना सांगायला हवे का?
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले – navnit.loksatta@gmail.com