१९५६ भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू गावी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच ते अत्यंत धाडसी व हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होते. अॅग्रिकल्चर स्कूल, सातारा येथून त्यांचे शिक्षण सुरू झाले. पुढे एलफिन्स्टन हायस्कूल मुंबईत त्यांचे शिक्षण झाले. डॉ. बाबासाहेबांनी एम.ए., पीएच.डी., एम.एस्सी, डी.एस्सी. बार-अॅट-लॉ अशा उच्च श्रेणीच्या पदव्या प्राप्त केल्या. २० मार्च १९२० रोजी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांविषयी बोलताना पुढील उद्गार काढले, ‘सूर्य जसा मध्यान्ही प्रखर तेजाने तळपत असतो, तसा हा तरुण आपल्या जीवनाच्या मध्यावर आपल्या तेजस्वी कर्तृत्वाने जगात तळपल्याशिवाय राहणार नाही.’ अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे पाक्षिक, बहिष्कृत हितकारिणी सभा, बहिष्कृत भारत साप्ताहिक सुरू केले. १९२७ मध्ये महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला. ‘मनुस्मृती’चे जाहीर दहन केले. गोलमेज परिषदेला गेले. शतकानुशतके उपेक्षित व शोषित राहिलेल्यांना मुक्तीचा मार्ग दाखविणे आणि राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय देऊन लोकशाही प्रक्रिया सशक्त करणे ही आंबेडकरांची कामगिरी स्मरणीय आहे. उत्तम वक्ता, लेखक, केंद्रीय मंत्री, पत्रकार, जनतेचे अनभिषिक्त नेते म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे.
१९६१ पोर्तुगीज सैन्य गोव्याच्या सीमेवर उभे राहिले.
१९७६ क्रांतिसिंह नाना पाटील यांचे देहावसान. पत्री सरकार मधील त्यांचे कार्य मोलाचे आहे.
डॉ. गणेश राऊत
ganeshraut@solaris.in
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा