भारतात शेती आणि शेतकरी यांचा इतिहास नवपाषाण युगापासून (इसवीसनपूर्व ३०००) सुरू होतो. ताम्रप्रस्तर युगा (इ.स.पूर्व २७००-इ. स.पूर्व ७००) मध्ये तांबे या धातूचा शोध लागला. त्याच वेळी वेगवेगळी धान्येसुद्धा सापडली. मोहोंजोदडो, हडप्पामध्ये गहू, जव, हरभरा, नाचणी ही धान्ये होती. तांबे या धातूपासून कुऱ्हाड, मासे पकडण्यासाठी फास, बाण तसेच बांगडय़ा बनत असत. त्याच वेळी शेतीकरिता दगडापासून अवजारे बनायला लागली. माणूस गुहेतून निघून झोपडीत राहू लागला. मातीच्या भांडय़ात अन्न शिजवू लागला. घरात गायी, डुकरे, शेळ्या-मेंढरं, कोंबडय़ा दिसू लागल्या. आमच्या प्राचीन संस्कृतीमध्ये समृद्ध शेतीचे कैक पुरावे सापडतात. पाराशर, गर्ग, बृहद् गर्ग, कश्यप, विष्णुगुप्त, गरुडमान, बादरायण, विश्वकर्मा, भारद्वाज, कपिला यांसारख्या खगोल आणि समुद्र शास्त्रींनी शेतीची बंद दारे उघडली. सुरुवातीपासूनच आमच्याकडे गणित, नक्षत्र आणि शेतीचा घनिष्ठ संबंध राहिलेला आहे.
इ.स.पूर्व १५०० ते १००० मध्ये आर्य उत्तरेकडून आले आणि त्यांनी द्रविडांना दक्षिणेकडे जाण्यास भाग पाडले. हा भारतातील शेतीचा सुवर्णकाळ होता.
इ.स.पूर्व ३२७ मध्ये ग्रीकांच्या आक्रमणासोबत कित्येक दुर्लभ वनस्पती भारतात आल्या. इसवीसन १४९८ मध्ये वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने गोरक्षाचिंच, लसूण, नागफणी, कुलजन, अकलकाढा, धोतरा, स्वर्णपात्री, सोनामुखी, कर्पूर, जिरा, हळदसारख्या वनस्पती भारतात आणल्या. इसवीसन १६२१ ते १६५० या काळात शाहजहानचा मुलगा दाराहशुकोने भारतात फळझाडे वाढविली. त्यात काश्मीरमध्ये सफरचंद, नासपती, डाळिंब, अक्रोड, जर्दाळू, पिस्ता, आलुबुखार, बदाम यांची शेती वाढविली.
सतराव्या शतकात भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाले. हळूहळू त्यांनी भारतात आपल्या व्यापाराचे जाळे पसरविले. व्यापारामागोमाग इंग्रजांचे सन्य भारतात आले. १८१८ मध्ये भारतात ब्रिटिश राज्य सुरू झाले. लॉर्ड मेकॉलेने आपले वृक्षायुर्वेद, कश्यपीय कृषी पद्धती यांसारखे दुर्मीळ संस्कृत ग्रंथ त्यांच्या देशात नेले. त्यात नक्षत्र, शेती, भूगर्भशास्त्र, जलसंवर्धन व जलशोध घ्यायच्या पद्धती याबाबत सखोल माहिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा