विजयनगर राज्याची राजधानी हंपी येथे होती. प्राचीन काळी हंपीचे नाव विरूपाक्षतीर्थ किंवा पंपक्षेत्र असे होते. बल्लाळ तिसरा या होयसाळ राजाच्या मुलाचे नाव विजय विरूपाक्ष बल्लाळ असे होते व त्यावरून हंपीचे नाव विजय विरूपाक्ष होयपट्टण असे ठेवले होते. पुढे या शहराचे नाव विजयनगर असे झाले. हरिहर याला आणखी चार भाऊ होते. त्यांची नावे कंपण्णा, बुक्क, मरप्पा आणि मुद्दप्पा. पैकी कंपण्णाने कडप्पा, नेल्लोर येथे राज्य केले. मरप्पाकडे गोव्याचा अंमल होता तर मुद्दपाकडे कोलारचे राज्य होते.
कंपण्णा याने मदुराईच्या सुलतानास मारून मदुराईपर्यंत राज्य वाढविले. त्याचा मंत्री गोपण्णाने श्रीरंगमच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हरिहर दुसरा याने कन्नड साहित्यात मोलाची भर टाकली. या काळात विजयनगरचे नाव विद्यानगर असे झाले. लंकेपर्यंत राज्याचा विस्तार झाला. इ.स. १३४७ मध्ये तुंगभद्रेच्या उत्तर तिरावर कलबुर्गी (गुलबर्गा) येथे हसन गंगू बहामनी याने मुस्लीम राज्य स्थापन केले. तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांमधील प्रदेशासाठी विजयनगर व बहामनी या दोन राज्यांत सतत लढाया होत असत. रायचूर व मुद्गल येथे या लढायांमध्ये विजयनगरने विजय मिळविला. सन १४८५ ते १४९१ एवढा अल्पकाळ साळुव या घराण्याची राजवट विजयनगरवर होती. साळुव घराण्यानंतर तुळुव घराण्याची राजवट सन १४९१ ते १५७० अशी होती. कुळुव घराण्यातील कृष्णदेव राया हा सर्वात अधिक कर्तृत्ववान राजा होऊन गेला. कृष्णदेव रायाची कारकीर्द इ.स. १५०९ ते १५२९ अशी झाली. या काळात विजयनगर राज्याला साम्राज्याचे स्वरूप आले. विजयनगर साम्राज्याच्या इतिहासातले हे एक सुवर्णयुग होते.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा