मित्रा, जरा डोळे मिटून, कान एकवटून हृदयनाथांचं गीत आठव. ते सूर मनात घुमले की ज्या फुलांची आठवण येईल, ते लक्षात ठेव. मग अजिबात खोटं न बोलता, खरं खरं सांग. ओळखलंस गाणं? अरे, ‘त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का?’ बस् एवढा मुखडाच.
आता सांग, कोणती फुलं डोळ्यासमोर आली? गुलाब लाल रंगाचा? कमळ? सोनचाफा! कवठी चाफा? जाई, जुई, चमेली? मोगरा. पैकी एक दोन किंवा लागोपाठ सगळी. माझी खात्री आहे, एक फूल आहे जे आपल्या कोणत्याही मित्राच्या मन:पटलावर उमटलेले नसेल!
घाणेरीचं फूल! आठवून पाहा, येताहेत डोळ्यासमोर? कठीण आहे. अरे, इतक्यांदा ही सुंदर फुलं पाहिली आहेस तरी आठवली नाहीत ना?
‘झाड फुलानी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडून!’ ही ओळ, या फुलांच्या बाबतीत १०० टक्के खरीय. अशा विस्मरणाबद्दल घाणेरीच्या फुलांची मी समस्तांतर्फे इथे माफी मागतोय. आधी इतक्या नाजूक फुलांना घाणेरी असं घाणेरडं नाव ठेवलंय. कुंपणाला किंवा वईला लावून (की उपटून न टाकल्यामुळे जगणाऱ्या) त्यांना वाळीत टाकलंय. फुलांवर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे या फुलांना अनुल्लेखाने मारत आहेत.
१२ महिने हिरवीगार पानं, ठेंगणा पण भरगच्च बांधा असलेलं झाड सर्वत्र दिसतं. फूल एकटं दुकटं कधीच नाही. १५-१६ फुलांचं एक वर्तुळ, मग त्याच्या आत आणखी लहान, मग अगदी जेमतेम दिसणाऱ्या पाचसहा मुकुलिका. गुलाबी, पिवळट असे मोहक पेस्टल कलर. बहुधा पण संपूर्ण नारिंगी छटा असलेला फुलोरादेखील दिसतात. देठ नाजूक पण दमदार. फुलोरा हलके हातानं काढला तरी एखाद दुसरं चिमुकलं फूल हमखास गळतं. फुलांच्या आसपास हिरव्या मण्यांसारख्या फळांचा तसाच फुलोरा आढळतो. ही फळं काळपटतात आणि मग चक्क गोडसर लागतात.
जोरात हुंगलं तर किंचित उग्र वास येतो. (पण घाणेरडा वास नक्की नाही). कदाचित सांडपाण्यावर जगणारं, वाढणारं झाड म्हणून त्याला घाणेरी म्हणतात की काय कोण जाणे?
त्या फुलांचे इटुकले पिटुकले फुलोरे पाहिले की मन नकळत बाळपणात धाव घेतं. तेव्हा ही फुलं खूप जवळची वाटायची, सोबत करायची. कारण ही फुलं कितीही तोडली तरी कोणीही ओरडत नसे. विचारतो कोण त्या फुलांना? त्याचा ना हार, गजरा करता येत, ना देवाला वाहाता येत. त्यामुळे बिनधास्त फुलं गोळा करा, अधूनमधून त्या काळ्या गोडसर फळांना जिभेवर ठेवा. मस्त वाटायचं. मग त्या फुलांच्या इवल्या इवल्या रांगोळ्या करायच्या आणि खेळता खेळता विसरून जायचं. खूप वषर्ं विसर पडला.
मित्रा, निसर्ग असतो, फक्त चिरंतन आपण त्याचं वर्गीकरण करतो- नाजूक, देखणा, भव्य, भयावह, रौद्र, भीषण. आपल्या अनुभवाप्रमाणे. निसर्गाला त्याचं देणंघेणं नसतं. हे सनातन सत्य निसर्ग वारंवार सांगतो. अगदी घाणेरीच्या फुलांतूनही तेच सुचवतो. आता कधी दिसली ना ती फुलं, तर थबकून पाहशील ना रे?
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा