१८९३ अमेरिकेतील शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले आणि सभाजिंकली. जगातल्या सर्वाधिक गाजलेल्या भाषणांपैकी ते एक भाषण आहे.
१८९५ आचार्य विनोबा भावे यांचा कोकणातील गागोदे येथे जन्म. ‘गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार’ आणि ‘गांधी विचारांची प्रयोगशाळा’ अशी दोन विशेषणे विनोबांना लावण्यात येतात. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. गांधीजींच्या सत्याग्रहाचा विकास विनोबांनी सवरेदयात केला आणि ग्रामस्वराज्य कल्पना ग्रामदानापर्यंत आणली. जनतेच्या हृदयाला आवाहन करीत लाखो एकर जमीन भूमिहीनांना मिळवून देण्याचा ऐतिहासिक प्रयोग जगात फक्त विनोबाच करू शकले. भगवद्गीतेचे सार असलेल्या त्यांच्या ‘गीताई’ या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक प्रस्थापित केले. कुराण, बायबल यांच्यावरील सारग्रंथही त्यांच्यातील प्रकांडपंडिताचे दर्शन घडवितात. भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतका गाढा अभ्यास असणारी व्यक्ती विरळाच! संयुक्त महाराष्ट्र चळवळी संदर्भातील विनोबांची भूमिका व आणीबाणीच्या संदर्भातील त्यांच्या भूमिकेचा करण्यात आलेला विपर्यास यामुळे जनतेचा व अनुयायांचा रोष ओढवूनही, स्वत:ला जे पटले त्याचेच आचरण करण्यात विनोबांनी कसूर केली नाही.
२०११ अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी महासत्तेवर हल्ला करून मानवतेला काळिमा फासला.
प्रा. गणेश राऊत
ganeshraut@solaris.in
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा