असा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, असा राष्ट्राध्यक्ष दहा हजार वर्षांत झाला नाही; अशा हशा, टाळ्या आणखी दहा हजार वर्षे.. आम्हाला सोडून (हशा, टाळ्या) आणखी कोणाला मिळणार नाहीत. पुढील दहा हजार वर्षांत.. इ.
आचार्य अत्रे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं भाषण ऐकून, पाहून असंच काही तरी म्हणाले असते, याची खात्री आहे. आणि फॉर वन्स मित्रा, त्यांनी केलेली अतिशयोक्ती कमी आहे, असं वाटलं असतं..
बराक ओबामा यांनी निवडून आल्यानंतर आपल्या निळ्याभोर डेमोक्रॅट पार्टीच्या पाठीराख्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा समस्त मंडळींनी मनापासून अभ्यास करावा. जगातल्या करोडो लोकांनी ते पाहिलं असणार यात शंका नाही. अर्थात, अमेरिकेतील पब्लिक प्लेसमधली प्रत्येक मूव्हमेंट राष्ट्राध्यक्षाकडून गिरवून घेतली जाते, हे तर नक्कीच; परंतु कालच्या भाषणामध्ये ओबामा यांच्या भाषणातल्या कारागिरीपेक्षा स्वयंस्फूर्तीने अधिक बोलले, असं वाटतं.
मुळात, अशा भाषणातून मतदारांचे आभार मानणं, नव्या कालखंडासाठी भरमसाट आश्वासनं देणं आणि विरोधकांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांची व्यक्तिगत पातळीवर खिल्ली उडविणं, भरपूर टाळ्या आणि शाबासकी मिळवणं इतपतच उद्देश समोर ठेवलेला असतो. ओबामा मात्र त्यापलीकडे गेले. ज्या गोष्टी बोलले त्याद्वारे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडले, भावना व्यक्त केल्या ते केवळ अजोड. त्यातले विचार आणि स्वप्नं खास अमेरिकन होते. अमेरिका हा देश केवळ भौगोलिक रिअॅलिटी नसून तो अभिव्यक्ती, व्यक्तिमत्त्वस्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं ठामपणे म्हटलं. ते अर्थातच लोकांना आवडलं. ओबामा यांच्या देहभाषेचं विशेष वाटतं.
मतदारांसमोर येताना, राष्ट्राध्यक्ष पत्नी मिशेल मोठय़ा मुलीबरोबर, तर ओबामा धाकटीबरोबर. (हेदेखील इमेज मेकर्सनी सांगितलं असावं) त्यांच्या चालण्यात आत्मविश्वास होता, त्यापेक्षा कुटुंबमग्नता होती. रविवारी सकाळी चर्चला एकत्रितपणे जाणाऱ्या कुटुंबासारखी ती ‘फर्स्ट फॅमिली’ दिसली. मग स्टेजवर सर्वाना जवळ घेणं आणि त्यानंतर मतदारांना अभिवादन असं करण्यातला विचार विशेष वाटतो. ओबामा यांच्या बोलण्यात सहज आत्मविश्वास, चेहरा ठाम परंतु भावमग्न. त्यांची नजर थेट लोकांपर्यंत पोहोचते. मानेच्या हालचाली सहज होतात. साधारण १५० अंशापर्यंत मान फिरते. विशेष शब्द उच्चारताना ते निमिषभर थांबतात आणि उजवा हात वर उंचावून लोकांपर्यंत ते आपल्या मनातला आत्मविश्वास पोहोचवतात. त्यांचा डावा हात किंचित उंचावला जातो. आपल्या मुद्दय़ाला अधिक ठासून सांगण्याकरिता ते डावा हात वापरतात. त्यांच्या भाषणातली बोलण्याची गती श्रोत्याबरोबर चालते. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून येत नाही; परंतु लोकांचे डोळे पाणावतात. (पहिल्या निवडणुकीनंतर जेसी जॅक्सनचा डोळे पुसणारा चेहरा अद्याप डोळ्यासमोर आहे.) ओबामा कोणालाही शिवीगाळ न करता, अचरट नकला न करता, केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या ठामपणाच्या आधारे लोकांच्या मनाचा ठाव घेतात. भारतीय नेत्यांनो, ऐकताय ना?
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा