अलेक्झांडर दि ग्रेट याने इ. स. पूर्व ३३२ मध्ये इजिप्तवर विजय मिळवून तिथे आपली सत्ता प्रस्थापित केली. इजिप्त विजयात महत्त्वाचे काम करणाऱ्यांत सेनापती टॉलेमी साटर हा होता. इजिप्तमधले प्रशासन अलेक्झांडरने टॉलेमीवर सोपवून पुढील विजय संपादन करण्यासाठी तो पूर्वेकडे निघून गेला. पुढे अलेक्झांडरचा मृत्यू इ.स. पूर्व ३२३ मध्ये झाल्यानंतर टॉलेमी साटर हाच स्वत: तिथला राज्यकर्ता झाला. त्याच्यानंतर त्याच्या वारसांनी इजिप्तवर राज्य केले. टॉलेमीनंतर आलेल्या राजांनी आपल्या नावामागे ‘टॉलेमी’ असा किताब लावून घेतला तर राण्यांनी ‘क्लिओपात्रा’ किंवा ‘बेरेनीस’ असा लावला. इजिप्तवर टॉलेमी वंशाने इ.स. पूर्व ३२३ ते ३० असे जवळजवळ तीनशे वर्ष राज्य केले.
टॉलेमी फिलाडेल्फस याने अलेक्झांड्रिया येथे राजधानी केली. बारावा टॉलेमी युलेटस आणि पाचवी क्लिओपात्रा यांची कन्या म्हणजे इतिहारात गाजलेली क्लिओपात्रा सातवी तिचे मूळ नाव फिलोपेटर हे होते. सातवी क्लिओपात्रा वयाच्या चौदाव्या वर्षांपासून वडील टॉलेमी बारावे युलेटस्ना राज्यकारभारात मदत करू लागली. वडिलांच्या मृत्यूनंतर क्लिओपात्राचा भाऊ टॉलेमी तेरावा आणि क्लिओपात्रा हे संयुक्तपणे फॅरो म्हणजे राज्यकर्ते झाले. क्लिओपात्राला दोन भाऊ टॉलेमी तेरावा आणि टॉलेमी १४वा. त्या काळातल्या इजिप्तमधील रीतीप्रमाणे क्लिओपात्राने आपल्या दोन्ही भावांशी लग्न केले. पुढे क्लिओपात्राच सर्व राज्यकारभार पाहू लागली. नाण्यांवर तिचे चित्र येऊ लागले. क्लिओपात्राच्या वर्चस्वामुळे टॉलेमी तेराव्याला राज्यकारभार करता येइना. त्या कारणामुळे टॉलेमी तेरा व टॉलेमी चौदा हे एका बाजूला तर क्लिओपात्रा दुसऱ्या बाजूला असे दोन गट होऊन त्यांच्यात यादवी सुरू झाली. क्लिओपात्राला एक बहीणही होती. ती बहीण क्लिओपात्राची बाजू घेऊन भाऊ टॉलेमी तेराव्याशी भांडण करीत असे.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा