हो चि मिन्हने फ्रेंच बोटीवर नोकरी करताना स्वतचे नाव ‘बा’ असे नोंदवले होते. दोन वर्षांच्या या नोकरीत होचा अनेक फ्रेंच लोकांशी संपर्क आला, त्यातून त्याचे विचार प्रगल्भ झाले. बोस्टन व न्यूयॉर्क या अमेरिकन शहरांनाही त्याने भेटी दिल्या. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. फ्रान्स लवकरच जर्मनीच्या टाचेखाली जणार, हे ओळखून हो चि मिन्हने बोटीवरील नोकरी सोडली. फ्रान्स अडचणीत आल्यावर आपल्या मायदेशाची, व्हिएतनामची फ्रेंचांकडून मुक्तता करण्याची हीच वेळ आहे, हे हेरून हो लंडनमध्ये गेला. त्या काळात कामगार संघटना नव्यानेच तयार होत होत्या. निरनिराळय़ा संघटनांमध्ये भाग घेऊन बऱ्याच मोठय़ा नेत्यांशी होने संबंध वाढविला. तिथून १९१९ मध्ये तो पॅरिसला आला. तिथे कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांशी संबंध येऊन हो चि मिन्ह १९२० मध्ये फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय सभासद झाला. तेथेच, त्याने कम्युनिस्ट पक्ष व व्हिएतनामचे स्वातंत्र्य या दोन गोष्टींसाठी स्वतला वाहून घेण्याचे ठरविले. १९२३ ते २५ मध्ये हो चि मिन्हला रशियातील युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल वर्कर्सचे अभ्यासक म्हणून निमंत्रण होते. १९२५ साली चीनमध्ये कम्युनिस्ट चळवळीत सुसूत्रता आणण्यासाठी तो चीनमध्ये गेला. शांघाय व हाँगकाँगमध्ये होने व्हिएतनामच्या विद्यार्थ्यांची फ्रेंच राजवटीविरोधी संघटना स्थापन केल्यावरून ब्रिटिशांनी त्याला दोन वर्षे तुरुंगवास दिला. १९३६ साली जपानने चीनशी युद्ध सुरू केले. दोन वर्षांत जपानने चीनची पेकिंग, शांघाय, कँटन ही शहरे ताब्यात घेतली. १९४० मध्ये हो दक्षिण चीनच्या युनान प्रांतात आला. त्याच दरम्यान जपानने आपले सैन्य फ्रेंच इंडोचायना (व्हिएतनाम) मध्ये घुसविले. व्हिएतनामची सर्व बंदरे आणि काही विमानतळ आला जपान बिनधोकपणे वापरू लागले.  व्हिएतनामचे तांदूळ, रबर व खनिजे परस्पर जपानमध्ये जाऊ लागले. सर्व लष्करी फायदे जपान लुटू लागला व सरकार मात्र फ्रेंचांचे, अशी परिस्थिती १९४० ते १९४४ या काळात होती.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com