हिरव्या वनस्पती आपले अन्न हवेतील कार्बन डायॉक्साइड वापरून निर्माण करतात. कार्बन डायॉक्साइडचे हवेतले प्रमाण सुमारे ०.०३९ टक्के इतके कमी असते. ते जर वाढवता आले तर आपल्याला शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते. रात्रीच्या वेळी वनस्पती श्वसनाद्वारे कार्बन डायॉक्साइड बाहेर टाकतात. हा वायू हवेच्या दीडपट जड असल्याने वारा नसेल तर तो जमिनीजवळ साठून राहतो. त्यामुळे दाट अरण्यात रात्री जमिनीलगतच्या वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण ०.१२ टक्के इतके, म्हणजे उघडय़ावरील वातावरणाच्या तिप्पट इतके असू शकते. शेतातल्या पिकांमधूनसुद्धा रात्री कार्बन डायॉक्साइड बाहेर पडतो, पण तो शेतात साठून राहात नाही. पिकातील वनस्पतींसभोवतीच्या वातावरणातील कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण जर वाढवावयाचे असेल तर हरितगृहासारख्या प्रणालीचा वापर करणे इष्ट ठरते. हरितगृह ही कल्पना मूळची युरोपातल्या थंड प्रदेशातली. तिथे हिवाळ्यात ताज्या भाज्या आणि नाताळ किंवा ईस्टरसाठी लागणारी फुले मिळविण्यासाठी प्लॅस्टिकच्या पारदर्शक पडद्यांनी मढविलेल्या कक्षांमध्ये कृत्रिमरीत्या तापमान वाढवून त्यात भाज्या आणि फुले वाढविली जातात. या कक्षांमधली उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी ते बंदिस्त असणे आवश्यक असते. पण या प्रणालीचा मूळ उद्देश लक्षात न घेता युरोपात बांधतात तशीच हरितगृहे आपण भारतात बांधली. या प्रकारच्या हरितगृहांची किंमत प्रति हेक्टर सुमारे रु. दोन कोटी असते. त्याचे व्याज आणि घसारा यांचाच खर्च होतो प्रति वर्षी रु. ४० लाख. म्हणजे हरितगृहात शेती करावयाची असेल तर दर वर्षी प्रति हेक्टर रु. ५० ते ६० लाखांचे उत्पन्न त्यातून मिळावयास हवे. शेतमालाच्या आजच्या भावात तरी हे शक्य नाही. त्यामुळे पाश्चात्य पद्धतीचे बंदिस्त हरितगृह न बांधता बांबूचे डांभ उभे करून त्यांच्या आधाराने प्लॅस्टिकच्या कनाती उभारून शेताचे १० मीटर बाय १० मीटर असे भाग पाडावेत. थोडक्यात म्हणजे कार्बन डायॉक्साइड साठविणाऱ्या टाक्या निर्माण कराव्यात. या टाक्यांमुळे रात्री निर्माण होणारा कार्बन डायॉक्साइड वनस्पतींच्या भोवतीच्या वातावरणातच साठवला जातो आणि सूर्योदयानंतर तो प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. अशी व्यवस्था केल्यास आपल्याला कितीतरी कमी खर्चात नेहमीच्या दुप्पट उत्पन्न मिळवता येते.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
(बुधवार, ३ जानेवारीच्या ‘कुतूहल’चे लेखकही डॉ. आनंद कर्वे आहेत. हा उल्लेख अनवधानाने राहून गेला )
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा