एकाच वेळी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेणे याला मिश्र पीक पद्धती असे म्हणतात. पूर्वी ही पद्धती जगात सर्वत्र वापरली जात होती. मिश्र पिकातले एकादे पीक जरी अवर्षण, अतिवृष्टी, रोग किंवा वनस्पतिभक्षक कीटक अशा कोणत्यातरी आपत्तीला बळी पडले तरी त्यामुळे सर्वनाश न होता त्याच शेतात वाढणाऱ्या अन्य जातीच्या वनस्पतींपासून आपणांस काहीतरी उत्पन्न निश्चितपणे मिळावे हा मिश्र पीक पद्धतीमागचा उद्देश तर होताच, पण केवळ पिकाच्या सर्वनाशाचा धोका टाळणे एवढाच मिश्र पिकाचा उद्देश नसून योग्य घटक पिकांद्वारे जमीन, पाणी आणि सूर्यप्रकाश यांचा उपयोग अधिक चांगल्या रीतीने केला जाऊन उत्पन्नही अधिक काढता येते. ते कसे हे आपण तूर-बाजरीच्या मिश्र पिकाच्या उदाहरणावरून पाहू. बाजरी पीक पेरणीपासून ८० ते ९० दिवसांमध्ये काढणीस तयार होते, तर तूर हे पीक साधारणत: ६ ते ७ महिने घेते. पावसाळ्याच्या आरंभी बाजरीच्या चार ओळींनंतर तुरीची एक ओळ या पद्धतीने या पिकाची पेरणी करतात. बाजरीची वाढ तुरीच्या मानाने भराभर होते, आणि तिच्या सावलीखाली तूर चांगली वाढत नाही. पण बाजरीचे पीक निघाल्यानंतर तुरीची चांगली वाढ होते. बाजरीच्या मुळ्या जमिनीत खोल जात नसल्याने बाजरी मुख्यत जमिनीच्या वरच्या थरांमधले पाणी घेते तर तुरीचे सोटमूळ चांगले १२० ते १५० सें.मी. खोल जात असल्याने ते मातीच्या खालच्या थरांमधले पाणी घेऊ शकते. जर त्या शेतात निव्वळ बाजरी किंवा निव्वळ तूर लावली असती तर दुसऱ्या जातीचे पीक घेताच आले नसते. पण वाढीचा काळ भिन्न आणि सूर्यप्रकाश आणि पाण्यासाठी परस्परांशी स्पर्धा नाही, या कारणाने एकाच शेतात वाढत असूनही या मिश्र पिकातून प्रत्येक जातीच्या शुद्ध पिकापासून मिळाले असते त्याच्या सुमारे ८० टक्के पीक बाजरी आणि तूर या दोन्ही पिकांपासून मिळते. आधुनिक काळात सुधारलेली सिंचनव्यवस्था, रासायनिक औषधे, शेतमजुरांची टंचाई आणि यांत्रिक शेती यांमुळे मिश्र पीकपद्धती मागे पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा