भारतात कृषी, फलोत्पादन, पशुपालन आणि अन्नप्रक्रिया या उद्योगांमधून दरवर्षी सुमारे ८० कोटी टन इतका त्याज्य जैवभार निर्माण होतो. त्यात आपण सध्या आयात करीत असलेल्या पेट्रोलियमच्या सुमारे अडीचपट ऊर्जा सामावलेली असते, पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण घरगुती स्वयंपाक, कुंभारांचे आवे आणि वीटभट्टय़ा यांमध्ये इंधन म्हणून आणि शिवाय साखर कारखान्यांद्वारे उसाच्या चोयटय़ा वापरून वीजनिर्मिती आणि त्याज्य शेतमालापासून इंधनविटा अशा काही मोजक्या प्रकारांनीच या जैवभाराचा वापर करतो. १५-२० खेडय़ांमध्ये निर्माण होणारा त्याज्य जैवभार एकत्र केला तर साखर कारखान्यांमध्ये वापरली जाणारी यंत्रणा वापरून आपण या खेडय़ांना वीज पुरवू शकू. या सर्व उपयोगांमध्ये त्याज्य शेतमाल हा सरळ सरळ जाळलाच जातो, परंतु काही विशिष्ट प्रक्रिया करून आपण त्याज्य शेतमालापासून अंतज्र्वलनकारी इंजिनांमध्ये वापरण्याजोगती उच्च प्रतीची इंधनेही निर्माण करून आयात पेट्रोलियमला पर्याय देऊ शकतो. जैवभार तापविल्यास त्यापकी सुमारे ७० टक्के भागाचे ज्वलनशील वायूत रूपांतर होते. या वायूला वुडगॅस असे म्हणतात. मागे राहणाऱ्या ३० टक्के कोळशापासून आपण कोल गॅस निर्माण करू शकतो आणि हिरवी पाने, फळाच्या साली, फळांचा चोथा आणि जनावरांची विष्ठा यांपासून आपण बायोगॅस निर्माण करू शकतो. या तिन्ही इंधनांची निर्मिती करण्याची तंत्रे सुमारे १०० ते १५० वर्षांपूर्वीच विकसित करण्यात आली होती आणि ती आपल्या देशातही उपलब्ध आहेत. मध्यंतरीच्या काळात अभियांत्रिकी, भौतिकविज्ञान, रसायनशास्त्र आणि इतर वेगवेगळ्या तंत्रज्ञानांमध्ये झालेल्या प्रगतीची त्यांच्याशी सांगड घालून आपण ही जुनी तंत्रे खूप सुधारू शकतो. त्यात ताबडतोब करण्याजोगती सुधारणा म्हणजे हे इंधनवायू शुद्ध करून ते सिलिंडरमध्ये भरता आले, तर आपण त्यांच्यावर मोटारगाडय़ासुद्धा चालवू शकू. ही सर्व तंत्रे इतकी सोपी आहेत की त्यांची निर्मिती ग्रामीण भागात लघुउद्योगांद्वारेही करता येईल. अर्थात अशा प्रकारे मोटारगाडय़ांचे इंधन तयार करणे किंवा वर उल्लेखल्याप्रमाणे विकेंद्रित विद्युतनिर्मिती करणे यासाठी आज लागू असणारी धोरणे आणि कायदे बदलावे लागतील आणि त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची.
– डॉ. आनंद कर्वे, पुणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई२२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा