जगात वनस्पतिभक्षक कीटकांच्या सुमारे एक लक्ष जाती आहेत, पण पिकाच्या एका जातीवर आपल्याला फक्त चार ते पाच जातींचेच किडे आढळतात. शिवाय प्रत्येक पिकावर आढळणारे किडे पिकाच्या जातीनुसार भिन्न असतात. म्हणजेच कपाशीवरचे किडे सोयाबीनवर किंवा टमाटोवरील किडे सूर्यफुलावर आढळत नाहीत. या निरीक्षणाला तर्कशास्त्राची जोड दिली तर त्यातून आपण तीन निष्कर्ष काढू शकतो. एक निष्कर्ष असा, की प्रत्येक वनस्पतीमध्ये वनस्पतिभक्षक कीटकांपासून आपले रक्षण करणारी रसायने निसर्गतच निर्माण केली जातात. दुसरा निष्कर्ष असा की कीटकांच्या काही जातींमध्ये ती रसायने पचविण्याची क्षमता उत्क्रांतीच्या रेटय़ामुळे निर्माण झाली आहे, आणि तिसरा निष्कर्ष असा, की पिकाच्या प्रत्येक जातीतली नसíगक कीटकनाशके जातिपरत्वे भिन्न असतात. या निष्कर्षांचा उपयोग करून आपण आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी वनस्पतिजन्य नसíगक कीटकनाशके निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ मोहरीच्या बियांचे पीठ पाण्यात कालवून ते पिकांवर फवारल्यास ते मोहरी आणि मोहरीवर्गीय इतर काही पिके (उदा. मुळा, कोबी इ.) सोडून इतर पिकांचे कीटकांपासून रक्षण करू शकते. तंबाखूची पाने, पायरेथ्रमची फुले, निंबोळीच्या बिया, वेखंड इत्यादींचे अर्क फार पूर्वीपासून कीटकनाशके म्हणून वापरले जात होतेच, पण मानवी अन्न म्हणून आपण वापरत असलेल्या मोहरी, मिरची, लसूण, मिरी यांसारख्या पदार्थाचे अर्क कीटकनाशके म्हणून वापरल्यास आज आपण वापरत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांपासून मानवी स्वास्थ्याला जो धोका निर्माण होतो तो निश्चितच टळेल. या नैसर्गिक अर्काचा एक वाईट गुणधर्म असा आहे, की त्यांचे बाह्य वातावरणात त्वरित विघटन होते, आणि त्यामुळे ते थोडय़ाथोडय़ा कालांतराने पुनपुन्हा फवारावे लागतात. पण रसायनशास्त्राज्ञांनी या विषयावर थोडे संशोधन केले तर या नैसर्गिक पदार्थापासून मानवाला अपायकारक नाहीत पण बाह्य वातावरणात अधिक काळ टिकून राहतील अशी कीटकनाशके बनविणे अवघड नाही. उदा. पायरेथ्रीन या वनस्पतिजन्य कीटकनाशकाचे मूळ स्वरूप रासायनिक प्रक्रियेद्वारे बदलून त्यापासून निर्मिलेली अनेक कीटकनाशके सध्या सिंथेटिक पायरेथ्रॉइड या नावाखाली बाजारात उपलब्ध आहेत.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा