गेल्या तीन दशकांत भूल देण्याच्या शास्त्रात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या शस्त्रक्रिया शक्य झाल्या. निरनिराळ्या उपकरणांचा शोध लागला. त्यामुळे रुग्णांची सुरक्षितता वाढली. अपघात कमी झाले. पूर्वीचे नायट्रस ऑक्साइडने होणारे अपघात बंद झाले. अपघातांचे सखोल विश्लेषण होऊन प्रतिबंधक उपाय निघाले. पूर्वी ऑक्सिजन, नायट्रस ऑक्साइड इत्यादी वायू वाहून नेणारे पाइप एकाच रंगाचे व एकाच मापाचे असायचे. एकदा ऑक्सिजनऐवजी चुकून नायट्रस ऑक्साइड दिला गेला. त्यामुळे रुग्ण काळा-निळा पडून मरण पावला. चौकशीनंतर ही चूक सुधारण्यात आली. प्रत्येक गॅसचा पाइप वेगळया रंगाचा करण्यात आला. त्याच्या जोडणीतल्या नॉझलचा आकारही बदलण्यात आला. पाइपऐवजी सिलिंडर वापरला तर सिलिंडरचा रंग वेगळा ठेवतात व सिलिंडरवर इंग्रजीत नाव लिहिलेले असते. भूल देऊन ऑपरेशन चालू असताना रुग्णाला उपकरणे लावलेली असतात. रुग्णाच्या नाडीचा, श्वासाचा, रक्तदाबाचा, फुप्फुसातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण दाखवणारा आलेख उपकरणाच्या पडद्यावर सारखा दिसतो. धोक्याची पातळी आली की शिट्टी वाजते. त्या उपकरणावर अॅनेस्थेटिस्टचे सतत लक्ष असते. प्रमाण वाढले की शिट्टी वाजते व सगळ्यांना सावधगिरीचा इशारा मिळतो. याखेरीज या तज्ज्ञाचे व सर्जनचे सलाइन व रक्ताच्या रंगावरही लक्ष असते. रंग निळसर होऊ लागला की ताबडतोब अॅनेस्थेटिस्टला सर्जन सूचना देतात. मग ताबडतोब कृती होते. अशा तऱ्हेने रुग्णाची सुरक्षितता जपली जाते. एखादे वेळी ऑपरेशन चालू असताना अगोदरच बांधलेल्या रक्तवाहिनीवरच्या टाक्याची गाठ सल होऊन रक्तस्राव सुरू होतो. रक्तस्राव प्रमाणाबाहेर होण्याअगोदर तो बंद केला जातो.
ऑपरेशन संपत आले की, भुलेची मात्रा कमी करून नंतर ती बंद केली जाते. त्यामुळे रुग्ण लवकर शुद्धीवर येऊन औषधाची मात्राही कमी होते. त्याचा सबंध शरीरावर चांगला परिणाम होतो व रुग्णाला जास्त तरतरीत वाटते. रुग्ण शुद्धीवर आल्यावरसुद्धा देखभालीची आवश्यकता असल्याने त्याला रिकव्हरी रूममध्ये ठेवतात. रक्तदाब, श्वासोच्छ्वास व्यवस्थित झाल्यावर त्याला वॉर्डमध्ये नेतात. रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी हे सर्व केले जाते.
ल्ल डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा