कुतूहल: थायरॉईड संप्रेरकाची गरज
आपल्या शरीरातलं आयोडिनचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून आपल्याला आयोडिनयुक्त मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. का बरं? वेगवेगळ्या शरीरक्रिया होत असताना त्यांच्या नियंत्रणासाठी शरीरात संप्रेरकं पाझरतात. शरीरातील ऊतींचा विकास, चयापचय, प्रजनन इ. क्रियांवर या संप्रेरकांचे परिणाम घडून येत असतात. शरीराचं संतुलन राखणाऱ्या ह्या संप्रेरकांचं प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा कमीजास्त झालं तर मात्र शरीरात दोष किंवा बिघाड उत्पन्न होऊ शकतात.
गळ्यात असलेली अवघ्या १५ ते २० ग्रॅम वजनाची अवटू ग्रंथी म्हणजेच थायरॉइड शरीराच्या अनेक क्रियांना नियंत्रित करते. सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये शरीराचं योग्य पोषण आणि वाढ होण्यासाठी आणि चयापचयाच्या नियंत्रणासाठी या ग्रंथीची आवश्यकता असते. या ग्रंथीतून स्रवणाऱ्या थायरॉक्सिन या संप्रेरकामध्ये आयोडिन हा प्रमुख घटक असतो. अन्नातून घेतलं जाणारं आयोडिन रक्तात शोषलं गेलं म्हणजे ते रक्ताद्वारे थायरॉइडमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या विशिष्ट यंत्रणेमुळे तेथेच शोषलं व साठवलं जातं. शरीरात असलेल्या एकूण आयोडिनपकी एक तृतीयांशपेक्षा अधिक आयोडिन या ग्रंथीत सापडतं.
जेव्हा आहारात आयोडिनची कमतरता असते तेव्हा थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढतो. या विकाराला ‘गलगंड’ किंवा ‘गॉयटर’ म्हणतात. गर्भाशयात गर्भ वाढत असताना थायरॉईड संप्रेरकं मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. गर्भावस्थेत किंवा मेंदूची वाढ होण्यापूर्वीच थायरॉईड संप्रेरकं कमी पडली तर मेंदूची वाढ खुंटते. बाळ मतिमंद होतं. ते मूल वेगळं दिसतं. ओठ जाड होतात. नाक नकटं दिसतं. मूल ठेंगू होतं. थायरॉईड संप्रेरकांचा पुरवठा कमी पडू लागला तर शरीराला पुरेशी ऊर्जा प्राप्त होत नाही आणि खिन्नता, विस्मृती, विचार करण्यात संथपणा येतो, निरुत्साहीपणा जाणवतो.
डोंगरावर वस्ती करणाऱ्या माणसांत अशी आयोडिनची कमतरता असल्याचं ज्ञात होतं. भौगोलिक कारणास्तव या विभागाला ‘हिमालय गॉयटर बेल्ट’ असं नाव दिलं गेलं होतं. सर्व जगात गॉयटर होण्याचा हा सर्वात मोठा पट्टा आहे. गेल्या काही दशकांत आयोडिनची कमतरता भारतात सर्वत्र आढळलेली आहे.
प्रया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा