पतौडी संस्थानचे शेवटचे अधिकृत नवाब मन्सूर अली खान यांची आई ही भोपाळच्या नवाबांची कन्या व एकुलती एक वारस असल्याने मन्सूर अली हे भोपाळच्या गादीचेही वारस ठरले. पतौडीचे नवाब मन्सूर अली खान व बेगम शर्मिला टागोर यांचा पुत्र आणि आघाडीचा चित्रपट अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर यांच्याकडे या संस्थांनांतील लोक, पतौडी व भोपाळच्या गादीचे पुढील वारस म्हणून पाहू लागले.
अर्थात, १९७१ साली भारत सरकारने सर्व संस्थाने मोडीत काढल्यामुळे सैफ अली खान हा केवळ नामधारी नवाब होऊ शकला आहे. पतौडी संस्थानात पूर्वी अंतर्भूत असलेल्या ५२ गावांच्या गावकऱ्यांनी आग्रह धरला, म्हणून इच्छा नसतानाही सैफ अली खानने नवाबपद धारण केले. ऑक्टोबर २०११ मध्ये विधिपूर्वक साजरा झालेल्या या सोहळय़ात ५२ सरपंचांनी या नवाबाला पारंपरिक पद्धतीने सफेद फेटे बांधले. या सोहळय़ास हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा हेही उपस्थित होते.
भोपाळ संस्थानात ज्या धर्मादाय संस्था, मशिदी, खराती संस्था (चॅरिटेबल ट्रस्ट) आहेत, त्यांचे प्रमुख विश्वस्तपद भोपाळच्या वारसाकडे येत असल्याने हे पद मन्सूर अली खानची कन्या व सैफ अली खानची बहीण साबा अली खान हिच्याकडे आली. सध्या या संस्थांची मालमत्ता २० हजार कोटी रुपये अशी प्रचंड आहे. नामधारी नवाब सैफ अली खान याच्या शिफारसीने मक्का आणि मदीना येथील रुबात या इमारतीत मोफत निवास आणि भोजनाची व्यवस्था होऊ शकते. दहा एकरचा भूखंड व्यापणारे ‘हॉटेल पतौडी पॅलेस’ येथे आजवर अनेक हिंदी व इंग्रजी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. सध्या तेथील हॉटेल बंद करून सैफ अली खानने आपले पूर्वजांचे घर म्हणून विकसित करावयास घेतले आहे.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com
कुतूहल – कृत्रिम कापूस – व्हिस्कोज
आजच्या वस्त्रोद्योगात व्यापारी महत्त्व असलेला एकमेव पुनर्जनित तंतू म्हणजे व्हिस्कोज. रेयॉन वर्गातील हा तंतू असून कापसाप्रमाणे सेल्युलोज हेच याचे मूलद्रव्य असते. याचे अनेक गुणधर्म कापसाशी मिळतेजुळते असतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कापसाऐवजी व्हिस्कोजचा वापर केला जातो. लाकडाच्या लगद्यात सेल्युलोज हे मूलद्रव्य आढळते. या सेल्युलोजचा काही रसायनांच्या साहाय्याने द्रव बनवला जातो. या द्रवापासून व्हिस्कोज तंतूची निर्मिती केली जाते. भारतात यासाठी नीलगिरीच्या झाडांचा उपयोग केला जातो. तीन ते पाच या वयोमानातील झाडांपासून दर्जेदार तंतूची निर्मिती करता येते.
व्हिस्कोज हा चमकदार, झळाळी असलेला तंतू आहे. याचे हव्या त्या लांबीचे आणि तलमतेचे खंडित तंतू बनवणे शक्य असते. त्यामुळे पॉलिएस्टरबरोबर मिश्रण करण्याकरिता व्हिस्कोजचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. अशा मिश्र धाग्यांपासून सुटिंगची निर्मिती केली जाते. सुटिंगबरोबरच इतर विविध प्रकारच्या कपडय़ांसाठीही या तंतूचा वापर केला जातो. विणलेल्या कपडय़ांप्रमाणेच गुंफलेल्या कपडय़ांमध्येही या तंतूचा वापर वाढत आहे. याशिवाय टेबलावरील चटया, कागदी हात रुमाल यांसारख्या विनावीण वस्त्रांमध्येही व्हिस्कोजचा वापर वाढत आहे.
हा तंतू चांगल्या प्रकारचा उष्णतारोधक आहे. याच्या उबदारपणामुळे त्वचेच्या लगतच्या कपडय़ांसाठीही या तंतूचा उपयोग प्राधान्याने केला जातो. व्हिस्कोजचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रंगीत व्हिस्कोजची निर्मिती सुलभतेने करणे शक्य असते. हे रंग पक्के तर असतातच, शिवाय वेगवेगळ्या पाचशे छटांमध्येही या तंतूची निर्मिती करता येते. अशा तंतूपासून रंगीत धागे, कपडे तयार करणे सोपे जाते. घर सजावटीची कापडे चमकदार असावीत, त्यांचे रंग उठावदार असावेत या अपेक्षा व्हिस्कोजच्या वापराने पूर्ण करता येतात.
आज विविध प्रकारच्या रेयॉन तंतूचे जेवढे उत्पादन होते, त्यातील जवळपास ८० टक्के उत्पादन व्हिस्कोजचेच असते. सर्वात स्वस्त असलेला हा मानवनिर्मित तंतू काळाबरोबर सतत बदलत राहिला, विकसित होत राहिला. त्यामुळे या तंतूचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे.
– प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org