कुतूहल
डीएनएमधील नत्रयुक्त घटक
डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील अॅडेनीन, रायबोज साखरेबरोबर अॅडिनोसिनचा रेणू बनवितो. अॅडिनोसिन फॉस्फेटशी बंध तयार करून असे काही रेणू बनवितो ज्यात विविध प्रक्रियांसाठी लागणारी उष्मांक शक्ती सामावलेली असते. जेव्हा अॅडिनोसिनला फॉस्फेटचे ३ रेणू एकापुढे एक जोडले जातात तेव्हा अॅडिनोसिन ट्राय फॉस्फेट (एटीपी) बनतो व हा पेशीतील सर्वात जास्त उष्मांक असलेला रेणू असतो. जशी पेशीला गरज लागेल तशी ऊर्जा या अॅडिनोसिन ट्राय फॉस्फेटपासून मिळू शकते. असेच इतर नत्रयुक्त घटकसुद्धा फॉस्फेटधारक रेणू बनवतात. आपण श्वासोच्छ्वासातून मिळविलेली ऊर्जादेखील या फॉस्फेटधारी रेणूत साठविली जाते. शरीरात जेव्हा ग्लुकोजचे पचन होते तेव्हा मिळणारी ऊर्जा अशीच एटीपीच्या रूपात उपलब्ध होते. त्यामुळे आपल्याला थकवा आला असेल तर ग्लुकोज घेतल्यावर तरतरी येते. या एटीपीसारखेच जीटीपीसुद्धा ग्लुकोजपासून मिळू शकते. तसेच हे फॉस्फेटधारी रेणू अनेक विकर प्रक्रियांमध्ये सुद्धा मदतनीसाची भूमिका बजावतात.
थायमिन आणि सायटोसिन या पिरिमिडीन घटकांशी साम्य असणारे इतर उपयुक्त संयुगे म्हणजे थायामिन, रायबोफ्लेविन आणि फोलिक अॅसिड ही बी वर्गातील जीवनसत्त्वे. हे घटक आपल्याला आपल्या आहारातून मिळू शकतात. तसेच या वर्गातील काही घटक कर्करोग, एड्स, थायरॉइडची व्याधी यांवर उपाय करण्यासाठी मदत करतात. या दोन्ही वर्गाच्या रेणूंच्या तोडमोडीमुळे (चयापचयामुळे) अमोनिया बनतो. त्याचे रूपांतर युरियामध्ये होऊन तो शरीराबाहेर टाकला जातो. काही वेळा प्युरिनचे रूपांतर शेवटी युरिक अॅसिडमध्ये केले जाते. जर रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर हे युरिक अॅसिडचे स्फटिक सांध्यांमध्ये साठले जातात आणि त्यामुळे गाऊटसारख्या व्याधीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या प्रथिनाच्या सेवनावर र्निबध घालावे लागतात. मांसजन्य प्रथिनात प्युरिनचे प्रमाण जास्त असते. पण जर दुग्धजन्य पदार्थाचा विचार केला तर त्यापासून मिळणाऱ्या प्रथिनांपासून प्युरिन मिळण्याची शक्यता कमी असते.
डॉ. मृणाल पेडणेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
प्रबोधन पर्व
आपलें बौद्धिक दास्य आणि पाश्चात्त्य शरण मानसिकता
‘‘जेव्हां मनुष्य स्वत:च्या विचारांपेक्षां परक्याच्या मतांस अधिक मान देतो तेव्हां त्यांस बौद्धिक परावलंबित्व थोडें तरी म्हटलेंच पाहिजे. तथापि समाजांत बरेंचसें बौद्धिक परस्परावलंबित्व असतेंच.. समाजांतील अनेक व्यवहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानें चालणें म्हणजे तज्ज्ञांकडून स्वत:स ठकवून घेणें मात्र नव्हे; तर स्वत: कांहीं ज्ञान मिळवूनहि कार्य अधिक योग्य व्हावें म्हणून विशेषज्ञाकडे जाणें होय. समाजांतील परस्परावलंबित्व कायम पाहिजेच; पण एका राष्ट्रास दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहावें लागावें हें हितावह नाहीं. व्यापारांत कांहीं अंशीं परावलंबन प्रत्येक राष्ट्रास भाग आहे. तथापि बौद्धिक बाबतींत परावलंबित्व धोक्याचें व राष्ट्रास कमीपणा आणणारें आहे. त्यांतल्या त्यांत जें ज्ञान राष्ट्राच्या हिताशीं निकटतेनें संबद्ध आहे त्यांत परावलंबित्व फारच धोक्याचें आहे. उदाहरणार्थ, वेदांत काय आहे, हें आपण इंग्रजास अगर जर्मनास विचारावें आणि त्यानें आपणापुढें पांडित्य करावें, यासारखी खेदाची दुसरी कोणती गोष्ट आहे बरें? पण आज वस्तुस्थिति मात्र तशी आहे, हें मोठय़ा खेदानें म्हणावें लागतें.’’ श्रीधर व्यंकटेश केतकर बौद्धिक परावलंबित्व स्पष्ट करून केवळ पाश्चात्त्य शरण मानसिकतेचा समाचार घेताना लिहितात –
‘‘पाश्चात्त्यांच्या भारतीय पांडित्याविषयीं आम्ही जी अपेक्षा करतों व जी अपेक्षा फारशी पूर्ण झाली नाहीं, ती म्हटली म्हणजे तटस्थपणाची होय.. पाश्चात्त्य ग्रंथकारांचे दोष शोधण्याची दृष्टि अहितकारक नाहीं, ती अवश्य आहे. ग्रंथांत दोष शोधण्याची दृष्टि नेहमींच चांगली असते असें नाहीं. पण एका राष्ट्रानें दुसऱ्या राष्ट्रांतील पंडितवर्गाच्या पांडित्यामुळें दिपून जाऊन वाचाहीन व्हावें यापेक्षां दोषैकदृक बुद्धिदेखील वाईट नाही. पाश्चात्त्यांचें शिष्यत्व योग्य आहे पण तें जगांतील चढाओढींत जय पावण्यासाठीं आहें. पाश्चात्त्य पांडित्यामुळें घाबरून हतवीर्य होणें आणि ‘बाबावाक्यं प्रमाणं’ या प्रकारची दृष्टि त्यांच्याविषयीं ठेवणें, हें केवळ उद्धटपणानें पाश्चात्त्य पंडितांच्या लेखांचें महत्त्व कमी समजण्यापेक्षांहि वाईट आहे.’’
मनमोराचा पिसारा
टोक्योचं स्काय ट्री
‘‘जपानमध्ये म्हणावं तशी ‘टुरिस्ट स्थळं’ नाहीत. एक तर महागाई पुष्कळ आणि जपानी मंडळी चेरी ब्लॉसम साकुरानो हनाचा सीझन सोडला तर फार भटकत नाहीत. रविवारी बाजारात नि फार तर रिपोंगीत चक्कर.’’ माझे सहाध्यायी आणि मेंटर सायतोसान म्हणाले. ‘‘पण स्काय ट्रीने संदर्भ बदलून टाकलेत.’’ त्यांच्या नजरेत अभिमानाची चमक होती. यू काण्ट मिस इट! आणि ते खरंच होतं. टोक्योमध्ये कुठूनही स्काय ट्री हा कम्युनिकेशन टॉवर दिसतो. रात्री झळकतो नि दिवसा चमकतो.
गंमत म्हणजे उचिदायोकोया इनॉवेटिव फर्निचर कंपनीने स्काय ट्रीच्या दर्शक चंद्रशाळेतून दिसणाऱ्या दृश्याची थ्रीडी आधीच पाहिली होती. या उचिदाबद्दल पुन्हा कधी तरी. स्काय ट्री ६३४ मीटर उंचीचा खलिफा बुर्जनंतरचा उंच टॉवर, पण कम्युनिकेशनमधील सर्वात उंच. मग त्याला बनवायला किती टन स्टील लागलं, किती दिवस लागले ही माहिती उपलब्ध आहे, ती कशाला सांगू?
टॉवरवरून नेहमी म्हणतात तसं विहंगम वगैरे दृश्य दिसतं. सुऽऽर्रकन वर जाणाऱ्या लिफ्ट आहेत. दोन डेक्स आहेत, पण खरी गंमत तो टॉवर टोक्यो-जपानमध्ये असण्यात आहे.
शाळेच्या ट्रिपा आणि ‘अखिल टोक्यो वयोवृद्ध संघटनांचे’ हजारो सदस्य तिथे आले होते. त्यांच्या भाषेत खूप हास्यविनोद करीत होते. मुलंही खिदळत होती, पण सारं काही शिस्तीत, रांगेत उभं राहून, घुसाघुशी न करता, व्हीआयपींची स्वतंत्र रांग नाही. तिकीट काढल्याबरोबर रांगेत किती वेळ उभं राहावं लागेल याचा अचूक अंदाज सांगतात. लिफ्टमध्ये शिरताना आणि बंद करताना जपानी सुंदरी त्रिवार लवून आरीगातो (थँक्यू) म्हणत होती. आम्ही पहिल्या डेकवर पोचल्यावर एक सहाध्यायी थांबलेली दिसली. आम्ही पार्किंग लॉटमध्ये सायकली ठेवल्या होत्या. ही पट्टी कॅमेरा तिथेच विसरली! तिथे गर्दी म्हणजे आपल्या रेल्वे स्टेशनवर असते तशी!! मग सुरक्षारक्षकाशी बातचीत, त्याला कळेना ही रडकुंडीला का आली? कॅमेरा तर सुरक्षित असेल. तीस-चाळीस हजारांचा कॅमेरा तसाच लटकलेला होता. त्याची कोणीही चोरी केली नव्हती. लक्षात आलं असतं तर जमा केला असता, तसा नव्हता म्हणून जपान्यांनीच माफी मागितली.
स्काय ट्रीपेक्षा या प्रामाणिकपणाने अधिक उंची गाठली असं वाटलं.
टॉवर ‘मुसाशी’ मु (६) सा (३) शी (४) या उपनगरात आहे म्हणून त्याला मुसाशी टॉवर असं म्हणतात. मग वाटलं हीच उंची का निवडली? अर्थात काही अभियांत्रिकी आणि स्थापत्य कारणं नक्कीच आहेत, पण जपानवर (हिरोशिमा-नागासकी) अणुबॉम्ब पडले, त्यांचा मूळ स्फोट ६३४ मीटरवर झाला, असं म्हणतात. त्या विध्वंसाला जपाननं बांधलेलं हे स्मारक आहे. ही अंदर की बात. तिथे ना त्या गोष्टीचा उल्लेख, ना आक्रोश. जगातला उंच टॉवर बांधून वाहिलेली ही खरी श्रद्धांजली आहे, हेच खरं.
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com