हॅलोजन हे मूलद्रव्यांचे कुटुंब क्षारांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. या कुटुंबाचा सदस्य असणाऱ्या क्लोरिनपासून बनलेला, अगदी प्राचीन काळापासूनचा सुपरिचित क्षार म्हणजे नेहमीचे  ‘मीठ’ – सोडियम क्लोराइड! हॅलोजन गटातील सर्वात प्रथम शोधले गेलेले मूलद्रव्य हेसुद्धा क्लोरिनच. हे मूलद्रव्य १७७४ साली कार्ल शील या स्वीडिश वैज्ञानिकाने शोधले. पायरोल्युझाइट (मँगेनीज डायऑक्साइड) या खनिजावर म्युरिअ‍ॅटिक (हायड्रोक्लोरिक) आम्लाची क्रिया झाल्यानंतर त्यातून एक हिरवट वायू बाहेर पडल्याचे कार्ल शीलला दिसून आले. आम्लधर्मी असणारा हा वायू, वस्तूचा रंग घालवीत असल्याचे निरीक्षण शीलने नोंदवले. आम्लधर्मी पदार्थात ऑक्सिजनच्या अणूचा समावेश असलाच पाहिजे, या तत्कालीन समजुतीपायी हा वायू म्हणजे एखादे ऑक्सिजनयुक्त आम्ल असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली. अखेर क्लोरिनचे स्वतंत्र अस्तित्व मान्य होण्यास इंग्लिश संशोधक हंफ्री डेव्ही याचे १८१० साली रॉयल सोसायटीला सादर केले गेलेले निष्कर्ष महत्त्वाचे ठरले.

इ.स. १८११ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ बर्नार्ड कुत्र्वा याला, सागरी वनस्पतींपासून पोटॅशियम क्लोराइड मिळवण्याच्या प्रयत्नात आयोडिनचा शोध लागला. सागरी वनस्पती जाळल्यानंतर मिळणाऱ्या राखेत असणाऱ्या, पाण्यात विरघळणाऱ्या घटकांशी सल्फ्युरिक आम्लाची रासायनिक क्रिया झाल्यावर जांभळ्या रंगाचा वायू निर्माण झाल्याचे त्याला दिसून आले. अत्युच्च तापमानालाही या वायूचे विघटन होत नसल्याने, हा जांभळ्या रंगाचा पदार्थ म्हणजे मूलद्रव्य असल्याचे नक्की झाले. यानंतर, १८२६ साली आंत्वान-जेरोम बालार्द या फ्रेंच रसायनतज्ज्ञाने सागरी मिठागरातील मिठाचे स्फटिकीभवन झाल्यानंतर मागे राहणाऱ्या द्रावणात क्लोरिन वायू सोडल्यावर, या द्रावणाला लालसर-नािरगी रंग येत असल्याचे दिसून आले. हा रंग ब्रोमिनमुळे येत असून, समुद्राच्या पाण्यातील मॅग्नेशियम ब्रोमाइडपासून हे ब्रोमिन तयार झाले होते.

क्लोरिन, आयोडिन आणि ब्रोमिन या तिन्ही मूलद्रव्यांच्या क्षारनिर्मितीच्या क्षमतेवरून या मूलद्रव्यांचा गट ‘हॅलोजन’ म्हणजे क्षार निर्माण करणारा गट म्हणून ओळखला जाऊ लागला. याच कुटुंबातले, निसर्गात उपलब्ध होणारे चवथे मूलद्रव्य होते ते फ्लुओरिन. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आन्री म्वासां याला १८८६ साली पोटॅशियम फ्लुओराइडच्या विद्युत अपघाटनाद्वारे (इलेक्ट्रॉलिसिस) फ्लुओरिन हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश मिळाले. या शोधाने आन्री म्वासां याला १९०६ सालचे, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवून दिले.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

Story img Loader