कृषीसाठी हवामान आणि त्यामधील पाऊस हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. कृषी विज्ञानानुसार बहुतेक पिके, फळपिके यांचे उत्पन्न ठराविक हवामानातच साधले जाते. तसेच विशिष्ट हवामानामुळे काही कीडरोगांचे प्रमाणही अचानक वाढते.
हवामानाबाबतची निरीक्षणे व नोंदी प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येही सापडतात. तिसऱ्या शतकातील ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ या ग्रंथामध्ये शेतीउपयुक्त असणाऱ्या पावसाच्या नोंदी व मापन केलेले आढळते. पाचव्या शतकात पाणिनीने ‘गोष्पद’ या एककामध्ये पर्जन्याचे मोजमाप केलेले आढळते. त्या वेळी पाऊस मोजण्यासाठी ठराविक आकाराचे कुंड बांधले जात. त्यामध्ये जमा झालेले पाणी ‘द्रोण’ या साधनाने मोजल्याचे कौटिल्याच्या नोंदींमध्ये आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये झुडुपे वाढलेल्या पडीक जमिनीवर १६ द्रोण (सुमारे ६३४ मिमी) महाराष्ट्रातील भूभागात साडेतेरा द्रोण (सुमारे ५३५ मिमी) आणि उज्जन (तत्कालीन अवंतीनगरी) परिसरात २३ द्रोण (सुमारे ९११ मिमी) एवढा पाऊस पडत होता असे नमूद केले आहे. सहाव्या शतकामध्ये वराहमिहिराने ‘बृहद्संहिता’ या ग्रंथामध्ये हवामान आणि पावसाची भाकिते छंदोबद्ध पद्धतीने लिहिलेली आढळतात.
सतराव्या शतकामध्ये जगातील पहिला तापमापक गॅलेलिओ गॅलिली या शास्त्रज्ञाने तर टॉरिसीली या शास्त्रज्ञाने हवेचा दाबमापक तयार केला. त्यानंतरच्या शतकात, सन १७१९मध्ये तत्कालीन जयपूर संस्थानचे महाराज सवाई राजा जयसिंह यांनी उज्जन येथे वराहमिहीर यांच्या सिद्धांतानुसार जंतरमंतर या वेधशाळेची उभारणी केली. त्यांनीच पुढे जयपूर, दिल्ली, मथुरा, वाराणसी येथेही वेधशाळा उभारल्या. आजही या वेधशाळांमधून सम्राटयंत्र, भित्तीयंत्र, दिगंश यंत्र, शंकू यंत्र, नाडीवलय यंत्र यांद्वारे अत्यंत आश्चर्यकारक वैज्ञानिक माहिती मिळते.
पुढे भारतातील पहिली आधुनिक वेधशाळा १७९३ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई येथे उभारली. १८२३ मध्ये मुंबई येथे, १८२९ मध्ये कोलकाता येथे आणि १८३६ मध्ये तिरुवअनंतपूरम येथे स्थापन झालेल्या वेधशाळांमधून हवामानविषयक नोंदी घेण्यास सुरुवात झाली. हवामान संशोधनामध्ये प्रगती झाली ती १८७५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय हवामान खात्यामुळे. सध्या अद्ययावत व प्रगत (रडार, कृत्रिम उपग्रह, सुदूर संदेशवहन इ.) तंत्रज्ञानामुळे हवामानाबाबत अचूक नोंदी घेणे शक्य झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा