डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com
‘मी’ मेंदूचा गुलाम नसून स्वामी आहे. ‘मी’ मनातील भावना बदलल्या, की मेंदूतील रसायने बदलू शकतात. या ठिकाणी ‘मी’ म्हणजे कोण, असा प्रश्न निर्माण होतो. तत्त्वज्ञानाची चर्चा न करता या ‘मी’ला
साक्षीभाव- ‘ऑब्झर्व्हिंग सेल्फ’ म्हटले जाते. ध्यानावर आधारित परदेशात वापरले जाणारे मानसोपचार आणि आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सा यांचे ध्येय हा साक्षीभाव विकसित करणे हेच असते. आधुनिक मानसोपचार पद्धतींमध्ये ‘ऑब्झर्व्हिंग सेल्फ’ ही संज्ञा एकविसाव्या शतकात वापरली जाऊ लागली असली, तरी या संकल्पनेचा उपयोग पूर्वीपासून होत आहे. सामान्यत: ‘मी’ हा शब्द शरीर आणि मन यांसाठी वापरला जातो. ‘मी उंच आहे’ असे माणूस म्हणतो, त्यावेळी तो ‘शरीरा’ला ‘मी’ म्हणत असतो. ‘मी उदास आहे’ असे म्हणतो, त्यावेळी ‘मना’ला ‘मी’ म्हणत असतो. ‘मी’मध्ये शरीर आणि मन यांचा सहभाग होत असला, तरी ‘मी’ म्हणजे केवळ शरीर-मन नाही. ‘मी सहा वर्षांची असताना नागपूरमध्ये राहायचे’ असे चाळिशीची स्त्री सांगते, त्यावेळी तिचे लहानपणी होते ते शरीर बदललेले असते. लहान असताना जे महत्त्वाचे वाटते, ते आता वाटत नाही; म्हणजे मनदेखील बदललेले असते. पण ‘मी’ तीच आहे, हा भाव कायम असतो. या भावालाच साक्षीभाव म्हणतात. मी माझ्यातील कौशल्ये आणि मर्यादा पाहतो, त्यावेळी साक्षी असतो. साक्षीभाव नसेल तर आत्मभान शक्य नसते. म्हणजेच ‘साक्षीभाव’ हा शब्द आध्यात्मिक वाटत असला, तरी त्यामध्ये कोणतेही गूढ नाही. ती शुद्ध मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणूनच मानसोपचारात तिचा उपयोग करून घेतला जातो. हा भाव विकसित झाला, की उदासी असताना ‘मी उदास आहे’ असे न म्हणता, ‘माझे मन उदास आहे’ अशी स्वत:शी नोंद करता येते. मग उदासी प्रयत्नपूर्वक बदलता येते किंवा ती किती वेळ राहते ते पाहू या, असे म्हणून तिचा वर्तनावर होणारा परिणाम टाळता येतो. पण हे शक्य होण्यासाठी उदासी नसताना मनातील विचार आणि भावना त्यांना प्रतिक्रिया न करता पाहण्याचा सराव आवश्यक असतो. रोज स्मरण होईल त्या वेळी असा सराव केला की साक्षीभाव विकसित होतो. तो विकसित झाल्याशिवाय ‘मेंदूचे स्वामी’ होता येत नाही!