डॉ. यश वेलणकर
मनात येणाऱ्या विचारांचा परिणाम म्हणून औदासीन्य येते, तसेच मंत्रचळ होऊ शकतो. मानसशास्त्रात याला ‘ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी)’ म्हणतात. हा एक प्रकारचा चिंतारोग आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात व्यक्तीच्या मनात एखादा त्रासदायक विचार पुन:पुन्हा येत राहतो आणि त्या विचारानुसार कृती होत नाही तोपर्यंत तिला अस्वस्थ वाटत राहते. ती कृती केली की अस्वस्थता काही वेळ कमी होते. पण पुन्हा थोडय़ाच वेळात तो विचार डोके वर काढतो. असा एकच विचार पुन्हा पुन्हा येण्याची त्या व्यक्तीला जणू काही सवयच लागून जाते. तुम्ही तुमच्या कुटुंबात किंवा मित्रमंडळीत असा एखादा मंत्रचळ असलेला माणूस पाहिलेला असू शकतो. तो हात धुऊन जेवायला बसतो आणि लगेच पुन्हा हात धुवायला जातो. करोनाच्या साथीच्या वेळी असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून हा त्रास वाढला आहे.
तसे आपण सर्वच जण थोडेसे मंत्रचळी असतो. आपण दाराला कुलूप लावून चालायला लागतो, पण चार पावले गेल्यानंतर आपल्या मनात शंका येते- कुलूप नीट लागले आहे की नाही? आपण परत येऊन कुलूप ओढून पाहतो. असे एकदा झाले तर ठीक आहे, पण हा त्रास असलेली व्यक्ती चारचार वेळा पुन्हा पुन्हा येऊन कुलूप ओढून पाहते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होऊ लागतात. विचारामुळे येणारी अस्वस्थता हे या त्रासाचे मुख्य लक्षण असते. कुलूप नीट लागलेले नाही, त्यामुळे चोरी होईल हा विचार त्या व्यक्तीच्या मनात वारंवार येत राहतो, अस्वस्थता वाढवत ठेवतो. आपले परत येऊन कुलूप पाहणे हे कुलूप लावताना सजगता नसल्याने होते. ओसीडी हा आजार झालेल्या माणसात सजगता नसतेच, पण विचारांचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे दुसऱ्या वेळीही कुलूप पाहताना दुसरेच विचार मनात येतात आणि कुलूप ओढून पाहिले याची मनात नोंद होत नाही. काही व्यक्तींना आपण कोणती कृती करतो आहोत, याचेही भान नसते. आपण बाथरूममध्ये स्वच्छता करीत आहोत, हे एक तास झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येते. जंतूंची भीती म्हणून काही जण अंतर्वस्त्रांनाही इस्त्री करतात. आपली कृती हास्यास्पद आहे, हे त्यांना समजत असते; पण ती केल्याशिवाय चैन पडत नाही. ही विचारांची गुलामी मानसोपचाराने कमी होऊ शकते.
yashwel@gmail.com