समुद्रविज्ञानात (ओशनोग्राफी) अनेक पारिभाषिक शब्द वापरात आहेत. पाण्याची खोली, पाण्यात पोहोचणारा प्रकाश, जमिनीचा उतार यानुसार हे शब्द तयार झालेले आहेत. ज्या ठिकाणी जमीन संपते व सागरी पाण्याचा काठ असतो तो सागर किनारा. याला सागर तटीय (लिट्टोरल) भाग म्हणतात. दररोज सागरास भरती व ओहोटी येते. सर्वाधिक भरती रेषा आणि ओहोटी रेषा यामधील भागास ‘उत्तलीय’ (नेरिटिक) असे म्हणतात. या उथळ सागराची खोली सुमारे २०० मीटपर्यंत असते. याची लांबी जमिनीच्या उतारानुसार कमी-अधिक असते. किनाऱ्याजवळील ज्या भागावर उत्तलीय सागरी पाणी असते त्यास ‘भूखंड मंच’ (काँटिनेंटल सेल्फ) असे म्हणतात. जमिनीजवळच्या भागास उत्तलीय भाग तर भूखंड मंचापासून दूर असलेल्या भागास ‘सागरी’ किंवा ‘महासागरी’ असे म्हणतात.
महासागरात प्रकाश पृष्ठभागापासून किती खोलीवर पोहोचतो त्यानुसार उपविभाग किंवा प्रदेश केलेले आहेत. उदा. जलपृष्ठभाग ‘जलपृष्ठीय’ (पेलॅजिक) या नावाने ओळखला जातो. हा सर्वात वरील प्रदेश, येथे भरपूर प्रकाश असतो. पाण्यात पोहोचणारा प्रकाश त्यातील गढूळपणा किंवा नद्यांतून वाहून आलेला गाळ यावर अवलंबून असतो. महासागरी प्रदेशात प्रकाश २०० मीटपर्यंत प्रवेश करतो. याला ‘उपजलपृष्ठीय’ (इपिपेलॅजिक) म्हणतात.
याखालील ‘मध्यजलपृष्ठीय’ (मीझोपेलॅजिक) भाग. याची खोली २०० मीटरपासून एक हजार मीटपर्यंत असते. यास ‘अल्पप्रकाशी’ (डिस्फोटिक) असे म्हणतात. मध्यजलपृष्ठीय भागाच्या खाली ‘अप्रकाशी’ भाग असतो यास ‘गभीरजलीय’ म्हणतात. याची खोली एक हजार मीटरपासून चार हजार मीटपर्यंत असते. या भागात कधीही प्रकाश पोहोचत नाही म्हणून यास ‘अप्रकाशी’ (अफोटिक) असे नाव आहे. वरील प्रत्येक विभागात तेथील परिस्थितीनुसार विभिन्न प्रकारे अनुकूलित झालेली जीवसृष्टी आढळते.
जमिनीच्या उताराप्रमाणे मध्यजलपृष्ठीय व गभीरजलीय भाग ‘अगाध प्रदेश’ असे ओळखले जातात. अगाध प्रदेश बहुधा सागरतळाचा प्रदेश असतो. सागरतळाची सरासरी खोली चार हजार वा थोडी अधिक असते. या प्रदेशाचे दुसरे नाव ‘तलस्थ’ (तळाशी असलेला). सागरातील खोल दऱ्या याहून खोल असतात. याला ‘सागर गर्ता’ (हॅडल) किंवा ‘पाताळ क्षेत्र’ असेही म्हटले जाते. पाताळ क्षेत्राची खोली सहा ते दहा हजार मीटरच्या आसपास असण्याची शक्यता वर्तविली जाते. या खोलीवर जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशांत महासागरात अशा गर्ता आढळतात.
– डॉ. मोहन मद्वाण्णा
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org